खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकपदासाठी डॉ. अविनाश जोशी यांची उमेदवारी दाखल
![]()
खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकपदासाठी डॉ. अविनाश जोशी यांची उमेदवारी दाखल
अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या त्रिवार्षिक निवडणूक 2025–28 साठी मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ. अविनाश रघूराज जोशी यांनी संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला.
उमेदवारी अर्ज सादर करताना डॉ. जोशी यांच्यावर प्रेम करणारे वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेला उत्साहाचे व सकारात्मक वातावरण लाभले.
डॉ. अविनाश जोशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, वैद्यकीय व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य केले आहे. अत्यंत अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि नाविन्यपूर्ण विचारधारेचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच खानदेश शिक्षण मंडळाच्या संचालक पदासाठी त्यांची उमेदवारी ही शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
मराठी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून डॉ. जोशी यांनी मराठी साहित्य संमेलन, साहित्य चळवळीत विविध नामवंत व्याख्याते, साहित्यिक व विचारवंत यांच्या व्याख्यानमाला, परिसंवाद व सांस्कृतिक उपक्रमांचे प्रभावी आयोजन केले आहे. या सर्व उपक्रमांसाठी त्यांना मराठी वाङ्मय मंडळाचे पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय तसेच व्यापारी क्षेत्रातील बंधू-भगिनींचे नेहमीच भक्कम सहकार्य लाभले आहे.
खानदेश शिक्षण मंडळाच्या या त्रिवार्षिक निवडणुकीत डॉ. जोशी यांना मतदारांचा भरभरून पाठिंबा मिळेल, तसेच त्यांच्या माध्यमातून शिक्षण संस्थांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. अविनाश जोशी यांनी संचालक पदासाठी उमेदवारी दाखल केल्यामुळे त्यांना मानणाऱ्या वर्गात तसेच संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठी वांग्मय मंडळाचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ ,वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर, राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते..


