नियोजित वधू-वरांची अतिउत्साही समाजकार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका! सर्वाना एकाच मापात तोलू नका- धनंजय सोनार
![]()
नियोजित वधू-वरांची अतिउत्साही समाजकार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका!
सर्वाना एकाच मापात तोलू नका- धनंजय सोनार
अमळनेर प्रतिनिधी- जोडपे दिसले रे दिसले की लफडे समजून तुटून पडायची वृत्ती फोफावत असून काही अतिउत्साही कार्यकर्ते बेकायदा पोलिसिंग करीत असल्याचा प्रकार वाढत आहे, असाच एक प्रकार आज सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांनी आज रोजी हाणून पाडत एका जोडप्याची सुटका केली.
शहरातील एका उपहारगृहातून अल्पोपहार करून धुळे येथील तरुण व तरूणी बाईकवर मनुदेवी जायला निघाले होते. लफडे आहे असे समजून येथील काही तरुणांनी त्यांचा पाठलाग करीत देवळी रस्त्यावर अडवत त्यांचा मोबाईल हिसकून घेत तुमच्या आईवडिलांना बोलवा म्हणत छळ चालविला असताना आमचे लग्न ठरले आहे व मनुदेवी दर्शनाला जात असल्याचे सांगितले, विनवण्या केल्या, पण मंडळी पोलीस असल्याच्या थाटात ऐकत नसल्याने प्रकरण हाताबाहेर जात असताना सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांनी वाहन थांबवून हस्तक्षेप केला. दोघांच्या कुटुंबाशी बोलणे झाले. ते त्यांचा विवाह ठरला असून घरच्यांच्या परवानगीनेच देवदर्शनाला जात असल्याने श्री सोनार यांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांची त्यांनी कानउघाडणी करीत पोलिसांना पाचारण करण्याचे सांगताच या स्वयंघोषित समाजसेवकांनी पळ काढला. व तरुण तरुणी मनुदेवीला रवाना झाले. लव्ह जिहाद, लफडे, प्रेमविवाहास विरोध म्हणून तुटून पडण्याची वृत्ती बळावत असून अशी बेकायदा पोलिसिंग थांबली पाहिजे, यातून गैर प्रकार देखिल घडू शकतात म्हणून सर्वाना एकाच नजरेने पाहू नये असे आवाहन धनंजय सोनार यांनी केले आहे.

