अवघड परिस्थितीत मुलांसाठी जे केलं ते खरंच कौतुकास्पद — उपनिरीक्षक समाधान गायकवाड ,जागतिक एचआयव्ही/एड्स जनजागृती पंधरवाड्यानिमित्त गांधीलीपुरा येथे महिलांसाठी विशेष मेळावा; आदर्श मातांचा सन्मान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
![]()
अवघड परिस्थितीत मुलांसाठी जे केलं ते खरंच कौतुकास्पद — उपनिरीक्षक समाधान गायकवाड
जागतिक एचआयव्ही/एड्स जनजागृती पंधरवाड्यानिमित्त गांधीलीपुरा येथे महिलांसाठी विशेष मेळावा; आदर्श मातांचा सन्मान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
एक डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या जागतिक एचआयव्ही/एड्स जनजागृती पंधरवाड्यानिमित्त अमळनेर येथील गांधीलीपुरा परिसरात वेश्याव्यवसायिक महिलांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एचआयव्ही/एड्स विषयक जनजागृतीसोबतच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या मुलांना उच्चशिक्षित करून आदर्श निर्माण करणाऱ्या मातांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सी. यू. पाटील, ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथील एचआयव्ही समुपदेशक अश्वमेघ पाटील, एआरटी समुपदेशक जयेश मोरे, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेरच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील तसेच श्रीमती रेणू प्रसाद उपस्थित होते.
उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. महिलांना कायदेविषयक माहिती देत आरोग्याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच महिलांनी स्वतः शिक्षणाची ओढ निर्माण करून सामाजिक परिवर्तनाचा भाग व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांनी वारांगणातील महिलांच्या मुलांनी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे मार्गदर्शन केले. तहसील कार्यालयामार्फत शिधापत्रिका, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र आदी आवश्यक कागदपत्रांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
ग्रामीण रुग्णालय अमळनेरच्या आयसीटीसी विभागातील समुपदेशक अश्वमेघ पाटील यांनी जागतिक एड्स जनजागृती पंधरवाड्यानिमित्त एचआयव्ही/एड्स व गुप्तरोगांबाबत सविस्तर माहिती देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मार्गदर्शन केले. यावेळी समुपदेशक दीपक शेलार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे हेही उपस्थित होते.
आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेरच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना, अवघड परिस्थितीचा सामना करत महिलांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी केलेले प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अशा महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य असून त्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत समाजाच्या आरोग्याचीही जपणूक करीत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राकेश महाजन, तौसिफ शेख, यास्मिन शेख, वंदना पावरा, आनंद पगारे, सीमा शेख आणि संध्या नागरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, सकाळच्या सत्रात सर्व महिलांसह त्यांच्या मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्य तपासणी करून मुलांना प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले.



