नाशिक पोलिसांची दमदार कारवाई! 24 तासांत अनोळखी हत्येचा गुन्हा उघड — बिहार व उत्तरप्रदेशातून आरोपी जेरबंद एसपी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलिसांची अत्यंत वेगवान तपास मोहीम यशस्वी
![]()
नाशिक पोलिसांची दमदार कारवाई! 24 तासांत अनोळखी हत्येचा गुन्हा उघड — बिहार व उत्तरप्रदेशातून आरोपी जेरबंद
एसपी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलिसांची अत्यंत वेगवान तपास मोहीम यशस्वी
नाशिक प्रतिनिधी
नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वासुदेव देसले, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलीस स्टेशनने 24 तासांच्या आत खुनासारखा गंभीर गुन्हा उघड करत दोन आरोपींना बिहार व उत्तरप्रदेश राज्यातून अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे.
दिनांक 29/11/2025 रोजी रात्री 19.53 वाजता नाशिक तालुका पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 207/2025 भा.द.वि. 2023 चे कलम 103 (1), 238, 61(ब), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोवर्धन शिवारातील फाशीच्या डोंगराजवळ निर्जनस्थळी एका अनोळखी व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुकलेल्या रक्तामुळे ओळख पटविणे अशक्य झाले होते. धारदार हत्याराने डोक्यावर, तोंडावर व पायावर वार करून आरोपींनी त्याची निर्दयीपणे हत्या केली होती.
घटनास्थळाची पाहणी करून पोलिस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक यांनी दोन तपास पथके तात्काळ तयार केली. अंबड व सातपूर एमआयडीसी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज, कंपनी मॅनेजर, बांधकाम साईटवरील मजूर यांचा तपास वेगाने सुरू करण्यात आला. स्वतः नाईक मॅडम यांनी एक पथक घेऊन घटनास्थळाजवळ हद्दीत तपास सुरू केला.
29/12/2025 रोजी तपास पथकाने एमआयडीसीतील विविध कंपन्यांना मृतदेहाचे फोटो पाठवले. त्यानंतर ऋषिकेश अनिल पांडे (रा. सातपूर) याने मृत व्यक्तीची ओळख पटविली. मृताचे नाव —
अरविंद उर्फ पप्पू पशुपतीनाथ पांडे (वय 40), रा. सातपूर, मूळ रा. बडकीस नदीया, ता. आरा, जि. भोजपूर, बिहार.
तपासादरम्यान गुप्त माहिती मिळाली की मृत व्यक्ती 28/11/2025 रोजी दारू दुकानात दिसला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत व्यक्तीस मंजय पंडीत व धर्मेंद्र पंडीत (रा. बिहार) यांनी मोटरसायकलवर घेऊन जाताना दिसले.
वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस पथक बिहारला रवाना करण्यात आले. सततच्या शोधानंतर आरोपी मंजय केशव पंडीत यास त्याच्या राहत्या घरी अटक करण्यात आली. कोर्टाने 7 दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर त्याने गुन्ह्यातील चाकू, मोटरसायकल, रक्ताचे कपडे असा महत्त्वपूर्ण माल मुद्देमाल दिला.
यानंतर माहिती मिळाली की प्रमुख आरोपी धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती (वय 26), मुळ रा. रायपूर, ता. छपरा, जि. सारन, बिहार हा वृंदावन (उत्तरप्रदेश) येथे पळून गेला आहे. त्वरित आदेशानुसार दुसरी टीम वृंदावनला रवाना झाली आणि कसोशीने शोध घेऊन आरोपीस पकडण्यात यश आले. कोर्टाने त्याला 3 दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.
या संपूर्ण कारवाईत खालील अधिकाऱ्यांचे विशेष योगदान राहिले —
श्रीमती मृदुला नाईक (प्रभारी अधिकारी, नाशिक तालुका पोलीस स्टेशन)
सपोनी दिपक बिरारी, पोहवा गायकवाड, पोहवा निलेश मराठे, मपोहवा चव्हाण, पोशि हरी शिंदे, अरुण रहेरे, पोशि पानझाडे, आडके, पाटील, सानप
तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोहवा बहिरम व पोहवा गिलबी यांचेही उल्लेखनीय योगदान राहिले.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी अत्यंत तत्परतेने, अचूक तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि राज्याबाहेरील शोध मोहिमेच्या जोरावर 24 तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणत दोन्ही आरोपींना जेरबंद करून उत्कृष्ट कामगिरीचे उदाहरण घालून दिले आहे.

