‘ऑपरेशन क्लीन-अप’ : अमळनेर पोलिसांचा गुन्हेगारीवर बुलडोझर! अवैध धंद्यांवर घाला; गुटखा, हातभट्टी दारू, कट्टा जप्त, फरार आरोपी गजाआड
![]()
‘ऑपरेशन क्लीन-अप’ : अमळनेर पोलिसांचा गुन्हेगारीवर बुलडोझर!
अवैध धंद्यांवर घाला; गुटखा, हातभट्टी दारू, कट्टा जप्त, फरार आरोपी गजाआड
अमळनेर प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे पोलिसांनी व्यापक कोबिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेत अवैध गुटखा, गावठी दारू, शस्त्रसाठा जप्त करण्यासह अनेक फरार आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये खळबळ उडाली असून शहरात पोलिसांचा धाक अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे २.३० ते सकाळी ७.०० या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, अमळनेर उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच आरसीपी प्लाटूनच्या जवानांसह मोठा फौजफाटा पाच स्वतंत्र पथकांमध्ये विभागून शहरातील विविध भागात धडक तपासणी करण्यात आली.
कारवाईदरम्यान अवैध गुटखा साठवणूक व विक्री प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून ५२ हजार ५०० रुपयांचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.
दारुबंदी कायद्याअंतर्गत आठ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १२ हजार लिटर कच्चे रसायन, २ हजार ९५० लिटर गावठी हातभट्टीची दारू तसेच सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
याशिवाय विविध न्यायालयांनी जारी केलेल्या ७ पकड वॉरंटांची बजावणी करून आरोपींना अटक करण्यात आली, तर ९ जामिनी वॉरंटांचीही अंमलबजावणी करण्यात आली.
पोलीस अभिलेखावरील ११० सराईत आरोपींची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी ७० आरोपी पोलिसांना मिळून आले असून त्यांची चौकशी करून इंट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच अमळनेर पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या १२ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
दरम्यान, अमळनेर व चोपडा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एक गावठी कट्टा, दोन मॅगझीन आणि दोन मोबाईल जप्त केले असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विशेष कोबिंग ऑपरेशनमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसण्यास मदत होणार असून, अशा प्रकारच्या धडक मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

