साहित्यिक आपल्या माध्यमातील प्रतिमेचे रवंथ करीत बसतो. : प्रा. डॉ.आशुतोष पाटील* [ डॉ.अतुल सरोदे लिखित ” खेड्यातले यडे ” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न ]
![]()
*साहित्यिक आपल्या माध्यमातील प्रतिमेचे रवंथ करीत बसतो. : प्रा. डॉ.आशुतोष पाटील*
[ डॉ.अतुल सरोदे लिखित ” खेड्यातले यडे ” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न ]
” साहित्यिक माध्यमातील आपल्या प्रतिमेचे रवंथ करीता राहतो ! प्रसिद्धीचा हव्यास नसणं हे चांगल्या कवीचं लक्षण आहे. साहित्यिकाने लेखन साधना करतांना अंतर्मुख होऊन स्वयंमूल्यमापन करणे नितांत गरजेचे आहे. ” असे मार्मिक प्रतिपादन सुप्रसिद्ध समिक्षक प्रा.डॉ.आशुतोष पाटील ( क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, जळगाव ) यांनी केले.
श्री.गजानन हार्ट अँड आय हॉस्पिटल जळगाव प्रायोजित साहित्य पुरस्कार वितरण सोहळा अंतर्गत प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव येथे आय. एम. ए. हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ.आशुतोष पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी साहित्यिक अरुण बी.पाटील ( निवृत्त प्राध्यापक ), डॉक्टर अतुल सरोदे ( सावदा ), साहित्यिक श्रीधर नांदेडकर ( छत्रपती संभाजी नगर ), कादंबरीकार विद्याताई पोळ – जगताप , कवि रवि कोरडे ( जळगाव मेटे – छत्रपती संभाजी नगर ) ज्येष्ठ कवी, बाळकृष्ण पाटील ( चोपडा ), संयोजक डॉक्टर विवेक चौधरी ( हृदयरोगतज्ज्ञ, जळगाव ) व पुरुजित चौधरी ( सरपंच ऑफ द ईयर पुरस्कार प्राप्त उपसरपंच ग्रामपंचायत, डांभुर्णी ), डॉ. प्रियदर्शनी सरोदे , डॉ.सौ.अंजली चौधरी, ( प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ ), सौ. पल्लवी चौधरी ( माजी सभापती, पं.स.यावल ), मान्यवर साहित्यपिठावर उपस्थित होते.
प्रारंभी केशवसुत पुरस्कार प्राप्त कवी स्व.गणेश चौधरी व स्व.दिवाकर चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण मान्यवर व कुटुंबियांनी केले. प्रास्ताविकात डॉ.विवेक चौधरी यांनी साहित्यिकांनी एका कलाकृतीत गुंतून राहू नये असे मार्मिक आवाहन केले. प्रमुख अतिथींचे यथोचित स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथींचा परिचय पुरुजित चौधरी यांनी केला.
डॉ.अतुल सरोदे लिखित ” खेड्यातले यडे ” ( लेवा गणबोलीतील कविता ) कविता संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक श्रीधर नांदेडकर ( प्रकाशक, तुला प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर ) यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर स्व.गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता सन – २०२४ संग्रह पुरस्कार कवी रवी कोरडे ( जळगाव मेटे ) यांना समिक्षक प्रा. डॉ.आशुतोष पाटील यांच्या हस्ते व स्वर्गीय दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी सन – २०२४ पुरस्कार विद्या ताई पोळ – जगताप ( सातारा ) यांना डॉ. अतुल सरोदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारार्थी कवी रवी कोरडे व विद्याताई पोळ – जगताप यांनी मनोगत व्यक्त केले .
लेवा गणबोलीचे कवी डॉ.अतुल सरोदे मनोगतात म्हणाले की, ” प्रत्येक पेशंटचे दुखणे आणि दुःख ऐकून आतमध्ये टचं होतं परिणामी नकळत कवितेची बीज रुजतात अन् फुलतात ! सरोदे यांनी ‘ खेडयातले यडे ‘ ही विनोदी चिंतनशील कविता सादर करुन श्रोत्यांना हसून लोटपोट केले. वृद्ध मातापित्यांच्या सेवा करतांना शारीरिक आणि मानसिक / भावनिक सेवासुश्रूतेचे कर्तव्य मुले व सुनांनी कसे निभवावे याचे विनोदी अंगाने नकळत वैचारिक इंजेक्शन्स देऊन प्रबोधन केले.
समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात साहित्यिक अरुण पाटील म्हणाले की, ” अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुलभूत अधिकार आहे. सत्य आणि सामाजिक वास्तव लेखकाने निर्भिडपणे मांडले पाहिजे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीचंद धनगर ( मु.जे. महाविद्यालय , जळगाव ) १ आभार प्रदर्शन पुरुजित चौधरी यांनी केले.कार्यक्रमास ‘ खेड्यातले यडे ‘ काव्य संग्रहास आशीर्वचनपर शुभेच्छा लेखन करणारे मा.नीळकंठ गायकवाड ( माजी डाएट प्राचार्य ), डॉ.एस.एस.राणे ( अध्यक्ष, विद्यार्थी सहाय्यक सामिती ), शशिकांत हिंगोणेकर ( पूर्व विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर ), वाय.एन. ठोसरे ( माजी शिक्षणाधिकारी ), चरित्रलेखक प्रभातदादा चौधरी,ज्येष्ठ कवी डॉ.अरविंद नारखेडे, प्रकाश किनगावकर , अशोक कोतवाल, प्रा.महेंद्र सोनवणे, ज्येष्ठ चित्रकार एल.झेड.कोल्हे ( खेड्यातले यडे काव्य संग्रहाचे मुखपृष्ठकार व स्केचिस्ट ), आर्टिस्ट जितेंद्र सोळुंके, विजय लुल्हे ( जिल्हाध्यक्ष , डॉ.कलाम पुस्तक भिशी , जळगाव ) ,पत्रकार तुषार वाघुळदे , रेणूका झांबरे , कवयित्री शीतल पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर रसिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.

