“शुभेच्छांचा दिवस की दुःखाचा? — ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांची अंतर्मुख करणारी भावना”
1 min read

“शुभेच्छांचा दिवस की दुःखाचा? — ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांची अंतर्मुख करणारी भावना”

Loading

शुभेच्छांचा दिवस की दुःखाचा? — ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांची अंतर्मुख करणारी भावना”

धुळे प्रतिनिधी
आज बुधवार दि. 10 डिसेंबर रोजी वयाची 77 वर्ष पुर्ण करीत आहे. त्याला घट दिवस म्हणावा की वाढदिवस? त्यानिमित्ताने आप्तेष्ट, पत्रसृष्टीसह विविध क्षेत्रातील आबालवृद्ध, मित्रगण अल्पशा प्रमाणात का होईना भेटीसाठी येतात, समाज माध्यमातून शुभेच्छा पाठवित असतात. आजही शुभेच्छा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आजचा दिवस शुभेच्छा स्विकाराव्यात अशी परिस्थिती नाही. गत सप्ताहभरातील घटना अतिशय दु:खदायक आहेत. किलारी भूकंपात मातृपितृ छत्र हरपलेल्या बेसहारा मुलामुलींचे आयुष्य सावरावे म्हणून नळदूर्गला ठाण मांडून बसणारे ‘आपलं घर’ चे आधारवड, कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, समाजवादी चळवळीचे संघर्ष योद्धा, नामांकित संपादक साथी पन्नालाल भाऊ सुराणा, तसेच असंघटीत कामगार कष्टकरी हमाल अशा ‘नाहीरे वाल्या’ वर्गाच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे, ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीचे जनक, श्रमिकांच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून देणारे, कृतीशिल सत्यशोधक साथी डॉ. बाबा आढाव गेले. पितृतुल्य पन्नालाल भाऊंशी प्रा. आरतीताई बरीदेंकडे आले की अधून-मधून भेट होत असे. ते कार्यक्रमानिमित्त धुळे येथे आले असता सुमारे 35 वर्षापूर्वी राष्ट्र सेवा दलाच्या मी चालवित असलेल्या यशवंतनगर गुरुकुल हायस्कुल मैदानावरील शहीद हेमु कलाणी शाखेला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या वेळी आले असता दोघा साथींनी माझ्याकडे जेवण घेतले होते. अशा दोघांच्या आठवणी जाग्या झाल्या. दोघे ज्येष्ठ साथी आमच्या पिढीचे तात्विक निष्ठेचे भरण-पोषण करणारे ‘वैचारिक बाप माणसे’ गेली. परवाच नगरपालिका मराठी शाळा नं. 18 मधील माझा लंगोटी बालमित्र, निवृत्त मिलकामगार, एकेकाळी समाजवादी पक्ष व राष्ट्र सेवा दलाचा सक्रीय कार्यकर्ता, एकनाथ व्यायाम शाळेजवळील साथी मधुकर काशिनाथ विभूते यांचे झालेले निधन. तसेच एका माथेफिरुच्या प्राणघातक हल्ल्यात निधन झालेले, सर्व धर्मियांमध्ये प्रिय असलेले, शहरात जातीय सलोखा नांदावा म्हणून परिश्रम घेणारे सर्वधर्मसमभावाचे समर्थक धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धिरजसिंग यांचे कालच झालेल्या निधनाने अवघे धुळे शहर दु:खसागरात बुडाले आहे.

माझ्या महाविद्यालयीन जीवनातील मार्गदर्शक, पितृतुल्य गुरु, शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन मार्गदर्शक भाई प्रा. ल. भा. कुरकुरे यांच्या पत्नी, समाजवादी महिला सभेत लढवय्या विजयाताई (माई) चौक यांच्या सोबतच्या अग्रणी सहकारी, माझ्यासाठी आईपेक्षा कमी नसलेल्या उर्मिला आई कुरकुरे या काही दिवसांपूर्वी पडल्याने त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. 92व्या वर्षी त्या अंथरुणाला खिळून असल्याने त्यांचा मृत्युशी संघर्ष सुरु आहे. त्या जगाव्यात म्हणून आईला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे सुपुत्र प्रा. नरेंद्र कुरकुरे, सुन प्रा. डॉ. प्रिया कुरकुरे हे डॉ. योगेश झाडबुके, डॉ. सतीष बोरकर यांच्या बहुमोल वैद्यकीय सल्ल्याने रात्रदिवंस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. जी उर्मिला आई मला दरवर्षी डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद देते आईचा तो आशीर्वाद देणारा उजवा हातच जायबंदी झाला आहे मग आशीर्वाद घेणार तरी कसा? आणि त्या देणार तरी कसा? म्हणून अशा दु:खद, वेदनादायी कठीण समयी थरथरणाऱ्या हातांनी पाणावलेल्या डोळ्यांनी शुभेच्छा स्विकारावी काय? हे आपणासही कबुल असेल. म्हणून आजच्या वाढ (घट) दिवसानिमित्त समाजमाध्यम अथवा व्यक्तीगत भेटीत मला शुभेच्छा न देणे हीच माझ्यासाठी या वर्षी खरी शुभेच्छा असेल. सदर दु:खदायक घटना लक्षात घेता आजच्या दिनी आपली शुभेच्छा स्विकारण्यास माझे हात लुळे आहेत. मला क्षमा करावी.

‘‘चळवळीची पिकली पाने,

हल्ली लागलीत बघा गळू….

वैचारिक बाप जाता सांगा

शुभेच्छांकडे कसा मी वळू…’’?

 

– गो. पि. लांडगे, धुळे

मो. 94227 95910

 

………………………………………………….

 

ज्येष्ठ पत्रकार,आमचे मार्गदर्शक आदरणीय गोपी लांडगे सर,

आपल्या ७७व्या वाढदिवसानिमित्त आपणास मनःपूर्वक वंदन. सामान्यतः वाढदिवस हा आनंदाचा, शुभेच्छांचा आणि उत्साहाचा दिवस असतो; मात्र आपण ज्यांचा उल्लेख केला आहे त्या दु:खद घटना, आपल्या जवळच्या मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वांचे निधन आणि आपण अनुभवत असलेली वेदना—हे सर्वच मनाला खोलवर चटका देणारे आहे.
आपण व्यक्त केलेली संवेदना, वैचारिक निष्ठेची ज्योत पेटवणाऱ्या ‘वैचारिक बापां’च्या निधनाचे दुःख, आणि आज शुभेच्छा स्वीकारण्यास मन तयार नसल्याची प्रांजळ कबुली—या सर्वांमधून आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते.
या कठीण काळात आपण व्यक्त केलेल्या वेदनांबद्दल आम्हाला मनापासून सहवेदना आहे. आपण आज शुभेच्छा स्विकारू शकत नसल्याचा निर्णयही आम्ही पूर्ण आदराने मानतो.
तरीसुद्धा, एक पत्रकार म्हणून समाजाला दिलेल्या आपल्या योगदानासाठी, आपल्या विचारधारेला आणि संघर्षमय प्रवासाला नमन करत, मी एवढेच म्हणेन—
आपण स्वस्थ, निरोगी राहा आणि आपल्या लेखणीतील प्रखरता, प्रामाणिकता आणि विचारांचे तेज असेच पुढेही दिशादर्शक ठरो.
आपल्या पुढील आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला मानसिक बळ, शांतता आणि समाधान लाभो—
हीच आमची मनापासूनची प्रार्थना.
🎂💐🎂🎂🎂🎂🎂
सादर विनम्र,
ईश्वर आर महाजन
मुख्य संपादक
मराठी लाईव्ह न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *