खानदेशच्या कन्येची राज्यभर झेप… विज्ञान क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा झेंडा उंचावला!
![]()
खानदेशच्या कन्येची राज्यभर झेप… विज्ञान क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा झेंडा उंचावला!
धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशासाठी अभिमानाचा क्षण ठरलेली एक प्रेरणादायी घटना आज मुंबई येथे घडली. एच. आर. पटेल माध्यमिक विद्यालय, शिरपूर येथे शिक्षण घेत असलेल्या कु. प्रांजल योगेश गिरासे हिने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर राज्यस्तरावर उज्ज्वल यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
आज दिनांक १२मे २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रांजल हिला सन्मानित करण्यात आले. डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित
“Aspiring Young Junior Scientist Awards 2026”
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावत तिने धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशाचे नाव अभिमानाने उंचावले.
मूळ चौगाव, ता. शिंदखेडा जि. धुळे येथील रहिवासी असलेली प्रांजल सध्या इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असून अत्यंत कमी वयात तिने विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. “ग्रामीण भागातूनही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करता येतात,” हे तिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
प्रांजल ही कै. जयसिंग ओंकार गिरासे यांची नात असून माजी उपसभापती शिरपूर येथील श्री. जगतसिंग आंदनसिंग राजपूत यांची नात आहे. तसेच श्री. योगेश जयसिंग गिरासे (HR Manager, Rama Phosphate) यांची कन्या व श्रीमती मनिषा राजपूत (Teacher, H. R. Patel Shirpur) यांची पुतणी आहे. कुटुंबातील उत्तम संस्कार, शिक्षणाची आवड आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच तिने हे अभूतपूर्व यश मिळवले असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे तिच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत भारतातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था
Indian Space Research Organisation (ISRO)
कडून तिला ३ दिवसांच्या विशेष शैक्षणिक भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विज्ञान व संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब मानली जात आहे.
आज प्रांजलचे यश हे केवळ एका विद्यार्थिनीचे यश नसून संपूर्ण खानदेशातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीप ठरत आहे. मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
कु. प्रांजल योगेश गिरासे हिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

