महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंदिरा गांधी विद्या मंदिरात ज्ञान–प्रेरणेची दीपोत्सवमयी पर्वणी!  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा नव्या पिढीला जागर –विविध उपक्रमांनी शाळा दुमदुमली
1 min read

महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंदिरा गांधी विद्या मंदिरात ज्ञान–प्रेरणेची दीपोत्सवमयी पर्वणी! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा नव्या पिढीला जागर –विविध उपक्रमांनी शाळा दुमदुमली

Loading

महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंदिरा गांधी विद्या मंदिरात ज्ञान–प्रेरणेची दीपोत्सवमयी पर्वणी!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा नव्या पिढीला जागर –विविध उपक्रमांनी शाळा दुमदुमली

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर, अमळनेर येथे ज्ञान, प्रेरणा आणि सामाजिक जागृतीने भरलेले बहुविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, अभ्यासाबद्दलची जिद्द आणि सामाजिक समतेची प्रेरणा रुजवण्याच्या उद्देशाने दिवसभर उपक्रमांचा मनोहर मेळा रंगला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कोमल गजानन पाटील आणि चेतना पंकज कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले, यामुळे वातावरण अधिक मंगलमय झाले.
यानंतर उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत बाबासाहेबांच्या थोर वैचारिक कार्याचा मागोवा घेत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. जगातील महान विचारवंतांमध्ये बाबासाहेब अग्रस्थानी का आहेत, त्यांनी 32 पदव्या किती जिद्दीने आणि परिश्रमाने प्राप्त केल्या, भारतीय संविधान घडवताना त्यांनी केलेले अथक कार्य याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
“मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही,” या ऐतिहासिक विधानामागील त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म, तसेच त्यांच्या 22 प्रतिज्ञांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या जीवनात “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” या विचारांचे स्थान काय असावे, हेही त्यांनी परिणामकारक भाषणातून पटवून दिले.
यानंतर शिक्षक पी. एम. ठाकरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित रोचक प्रश्नमंजुषा सादर केली. अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. सिद्धार्थ अहिरे, ज्योती नाथबुवा, प्रतीक्षा कुंभार, रिया धनगर, अश्विनी संदानशिव, चेतना कोळी, मानव अहिरे या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत बहुमान पटकावला.
कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले—शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी स्वतः रचलेले प्रेरणादायी बालगीत. हे गीत इंद्रायणी महिला भजनी मंडळाच्या संचालिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सचिव सौ. भारती चव्हाण यांनी आपल्या मधुर आवाजात सादर केले. गीताची ताल–लय–भावना यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षक क्षणभर मंत्रमुग्ध झाले.
या भव्य कार्यक्रमात शिक्षिका अर्चना महाजन, वंदना पाटील, सुषमा तेले, तसेच शिक्षक व्ही. डी. पाटील, डी. एस. माळी, वाय. जे. पाटील, ए. पी. जाधव यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमाची फोटोग्राफी राहुल पाटील यांनी केली.
शाळेतील हा उपक्रम केवळ स्मृतिदिनापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवणारा व त्यांना जीवनमूल्यांची नवी दिशा देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *