जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बाम्हणे शाळेत समता-संवेदनेची प्रभावी जाणीवजागृती
1 min read

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बाम्हणे शाळेत समता-संवेदनेची प्रभावी जाणीवजागृती

Loading

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बाम्हणे शाळेत समता-संवेदनेची प्रभावी जाणीवजागृती

अमळनेर प्रतिनिधी –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाम्हणे येथे 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आणि समता सप्ताह साजरा करण्यात आला. समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या विशेष लोकजागृती कार्यक्रमाने गावात संवेदनशीलता, समानता आणि दिव्यांग बांधवांविषयी आदराची भावना निर्माण केली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रार्थनेनंतर प्रभात फेरीने करण्यात आली. फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी दिव्यांग हक्क व समावेशक शिक्षणाविषयी प्रभावी घोषणा देत गावात जागृती निर्माण केली. प्रभात फेरीत शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग देत एकात्मतेचा सुंदर संदेश दिला.
शाळेच्या प्रांगणात फेरी सभेत रूपांतरित झाली आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. वैशाली संदीप पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर लुई ब्रेल आणि हेलन केलर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळ्यात शाळेतील दिव्यांग शिक्षिका सौ. दिपाली बुवा मॅडम तसेच दिव्यांग विद्यार्थिनी कु. जागृती मंगेश पाटील (कर्णबधिर) व तिच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सत्काराने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि दिव्यांगांच्या जिद्दीला सर्वांनी सलाम केला.
कार्यक्रमात विशेष शिक्षक श्री. किशोर राजधर पाटील (केंद्र शाळा शहापूर) यांनी लुई ब्रेल आणि हेलन केलर यांच्या प्रेरणादायी कार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसोबत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पनाशक्तीने विविध संदेश फलकांवर उभे केले.
मिष्ठान्न भोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. नंदलाल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. बुवा मॅडम यांनी मान्यवरांचे आभार मानून केले.
बाम्हणे शाळेतील हा उपक्रम समता, सहानुभूती आणि सर्वसमावेशक शिक्षणाची दिशा दाखवणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *