वाळू माफियांचा तालुक्यात धुमाकूळ – निवेदनानंतर महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई, पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपी तुरुंगात!
![]()
वाळू माफियांचा तालुक्यात धुमाकूळ – निवेदनानंतर महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई, पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपी तुरुंगात!
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यात वाळू माफियांनी उन्मत्तपणाची परिसीमा गाठल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वाळू चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप घोरपडे आणि तालुका अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी यांनी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. या निवेदनाची गंभीर दखल घेत महसूल विभागाने क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण यंत्रणा सतर्क केली व तत्काळ कारवाईसाठी पथके रवाना केली.
तलाठ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचताच वाळू माफियांनी अचानक जीवघेणा हल्ला चढवला. पथकातील कर्मचाऱ्यांवर धक्काबुक्की, धमक्या देत त्यांनी शासकीय पथकाची वाहने बळजबरीने ताब्यात घेत पळवून नेली. जीवाच्या आकांताने कसाबसा सुटून आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात संपूर्ण आपबीती सांगितली. त्यांच्या या कथनानंतर प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थितीची गंभीरता ओळखून जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच डीएसपींशी संपर्क साधत जलद हालचाल सुरू केली.
तत्काळ पोलीस-महसूल संयुक्त मोहिम उघडण्यात आली. कारवाईच्या वेगवान चक्रात संबंधित जेसीबी चालक, वाहनमालक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली. काहींना तडीपार करण्याची कार्यवाहीही वाऱ्याच्या वेगाने पूर्ण करण्यात आली. या कारवाईनंतर तालुक्यात काही प्रमाणात धडकी भरल्याचे दिसून आले.
मात्र, आश्चर्य म्हणजे ही कारवाई तालुक्याच्या मुख्य ठिकाणी सुरू असतानाच त्याच रात्री धुळे हद्दीकडून कंचनपूर मार्गे वाळू माफियांची लूटमार निर्धास्तपणे सुरू होती. एवढी मग्रुरी, एवढी बेफिकिरी आणि कायद्याचा भीतीविरहित राक्षसी आत्मविश्वास नेमका कुठून येतो? हा प्रश्न ग्रामस्थांमध्ये तीव्र स्वरूपात उपस्थित केला जात आहे.
यामागे स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींची अनास्था, काहींची हातबलता किंवा निवडणूक काळात उधळलेल्या पैशाची भरपाई करण्यासाठी गुन्हेगारी मार्गांना दिलेला आशीर्वाद असू शकतो, अशी चर्चा जनतेत सुरू आहे. या कर्करोगासारख्या वाढणाऱ्या काळ्या धंद्यामुळे गावोगावी गुंडगिरीची नवीन पिढी तयार होत आहे. बेरोजगारी आणि राजकीय छत्रछाया यामुळे ही समस्या अधिकच विक्राळ बनत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी या वाढत्या माफिया राजवटीवर कठोर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने सातत्यपूर्ण आणि कडक मोहिम राबवावी, अशी मागणी केली आहे.
उपविभागीय अधिकारी भंगाळे सर तहसीलदार सुराणा व सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी रेती उत्खननाबाबत रेती माफियांवर कठोर कारवाई संदर्भात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे व काँग्रेसचे अध्यक्ष बी.के सूर्यवंशी यांनी प्रशासनाचे अभिनंदन व्यक्त केले आहे..


