कर्तृत्व, संस्कार आणि त्यागाचा अखंड दीप विझला…, कै. सौ. हेमलता आत्माराम पवार : एका आदर्श सूनबाई, शिक्षिका, आई आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली
![]()
कर्तृत्व, संस्कार आणि त्यागाचा अखंड दीप विझला…
कै. सौ. हेमलता आत्माराम पवार : एका आदर्श सूनबाई, शिक्षिका, आई आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली
“काही व्यक्ती आयुष्य जगत नाहीत, त्या आयुष्य घडवतात… स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगतात. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती हरवत नाही, तर एका कुटुंबाचा आधारवड, संस्कारांचा दीप आणि मायेची सावली कायमची निघून जाते.”
अशाच विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या कै. सौ. हेमलता आत्माराम पवार (६५) यांचे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी रात्री ९.२० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबासह कळमसरे गाव, नातेवाईक, मित्रपरिवार आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याने जोडलेल्या प्रत्येकाच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या जीवनाचा प्रवास हा केवळ एका स्त्रीचा प्रवास नव्हता; तो संघर्ष, त्याग, शिक्षण, संस्कार, कुटुंबवत्सलता आणि मानवतेच्या अखंड सेवाभावाचा प्रेरणादायी इतिहास होता.
संपन्न माहेरातून संघर्षमय संसारात…
१० जानेवारी १९६१ रोजी जन्मलेल्या हेमलताताईंचे माहेरचे नाव जिजाबाई पितांबर साळुंखे. त्यांचे वडील सरकारी सेवेत तलाठी असल्याने माहेरची सामाजिक व आर्थिक परिस्थिती अत्यंत सुस्थितीत होती. त्यांनी एसएससी उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षणाची वाट न सोडता पुढे डी.एड., बी.एड., एम.ए. अशी उच्च शिक्षणे पूर्ण केली. निवृत्तीनंतरही ज्ञानाची ओढ कायम ठेवत त्यांनी ज्योतिषशास्त्रात पदवी संपादन केली.
मात्र नियतीने त्यांच्यासाठी वेगळेच कार्य राखून ठेवले होते.
अठरा विश्व दारिद्र्यातही उभा राहिला आशेचा दीप
२३ मार्च १९७६ रोजी मौजे सारंखेडा येथे सामाजिक परंपरेनुसार त्यांचा विवाह आत्माराम यादव पवार यांच्याशी झाला. सासरी आल्यावर त्यांना अत्यंत दारिद्र्य, अशिक्षित आणि मोठ्या संयुक्त कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली. अनेक दीर-नणंद, रोजंदारीवर जगणारे कुटुंब, शेतमजुरीवर चालणारा संसार आणि असंख्य अडचणी… पण या सर्वांवर मात करण्याचा त्यांनी निश्चय केला.


उच्चशिक्षित असूनही त्यांनी कधीही अहंकार बाळगला नाही. ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि कुटुंबातील ज्येष्ठांचा सन्मान याला त्यांनी आयुष्यभर सर्वोच्च स्थान दिले. डोक्यावरचा पदर कधी ढळू दिला नाही आणि सासरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपलेसे केले.
स्वतः शिकल्या… आणि संपूर्ण कुटुंबालाच शिक्षणाचा वारसा दिला
सासरी आल्यावर त्यांनी स्वतःचे शिक्षण थांबू दिले नाही. माहेरच्या विरोधालाही न जुमानता पतीच्या सहकार्याने १९७८-७९ व १९७९-८० मध्ये डी.एड. पूर्ण केले. पुढे आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिर, धुळे येथे उपशिक्षिका म्हणून रुजू झाल्या.
परंतु नोकरी मिळाली म्हणजे स्वतःपुरते आयुष्य नव्हते. त्यांनी घरातील दीर, नणंद, नातेवाईक यांना धुळ्यात आणून स्वतःच्या छोट्याशा भाड्याच्या घरात ठेवले, त्यांचे शिक्षण केले, संस्कार दिले आणि स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांना घडवले.
आठ ते दहा दीरांना शिक्षण देऊन सरकारी नोकरीपर्यंत पोहोचविणे, त्यांची लग्ने स्वतःच्या मुलांप्रमाणे करणे, अनेक नणंदांच्या संसाराची जबाबदारी सांभाळणे, चाळीशीपूर्वी ३५ ते ४० कन्यादानात मोलाचा सहभाग घेणे—हे सर्व त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता केले.
आज त्या कुटुंबातील ११ ते १२ कुटुंबे सरकारी सेवेत असून सुखी, समाधानी जीवन जगत आहेत, हा त्यांच्याच त्यागाचा आणि दूरदृष्टीचा जिवंत पुरावा आहे.
माणुसकीची शिदोरी आयुष्यभर जपली
हेमलताताईंच्या आयुष्यात ‘आपले’ आणि ‘परके’ असा भेद कधीच नव्हता. गावातून धुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांनी आपल्या घरचा डबा दिला, धीर दिला, आधार दिला. अनेक गरजू विद्यार्थ्यांना राहण्याची, शिकण्याची व्यवस्था केली.
प्रा. डॉ. वासुदेव राजाराम पाटील यांच्यासारख्या विद्यार्थ्याला आईची माया देत त्याच्या शिक्षणात साथ देणे, त्याची बुद्धिमत्ता ओळखून त्याला उभे करणे, अशा असंख्य घटना आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.
त्यांच्या आयुष्याचा खरा धर्म होता—माणुसकी.
आदर्श सून… आदर्श आई… आदर्श शिक्षिका
हेमलताताईंनी तीनही मुलांना उत्तम संस्कार आणि उच्च शिक्षण दिले.
– दीपक आत्माराम पवार – सहाय्यक वनसंरक्षक, पुणे.
– भटू आत्माराम पवार – शिक्षक, नगर परिषद शिक्षण मंडळ, दोंडाईचा.
– सौ. प्रीती विकास दाभाडे – सुशिक्षित आणि संस्कारवंत कन्या.
त्यांच्या सुना डॉ. जयश्री दीपक पवार (एमबीबीएस, एमडी), जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे यांनी सासूला आईचे स्थान देत शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. सात नातवंडांवर त्यांनी संस्कारांची अमूल्य शिदोरी दिली.
अकाली अंत… पण अमर ठरलेले कर्तृत्व
४ एप्रिल २०२६ रोजी त्यांना ब्रेन ट्युमरचे निदान झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार, शस्त्रक्रिया आणि पुढील वैद्यकीय सेवा करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, प्रकृती सुधारत असल्याची आशा निर्माण झाली; मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. रेडिएशन उपचार सुरू असतानाच प्रकृती खालावली आणि अखेर १२ जुलै २०२६ रोजी रात्री ९.२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने संपूर्ण पवार कुटुंब अक्षरशः पोरके झाले. ज्या व्यक्तीने सर्वांना एकत्र बांधले, प्रत्येकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहिले, त्या मायेच्या सावलीचे छत्र कायमचे हरपले.
त्यांच्या आयुष्याचा खरा वारसा…
कै. सौ. हेमलता पवार यांनी कधी प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही, उपकारांची भाषा केली नाही, स्वतःच्या कर्तृत्वाचा गाजावाजा केला नाही. त्यांनी माणसे जोडली, शिक्षणाची मशाल पेटवली, कुटुंब घडवले आणि समाजात आदर्श निर्माण केला.
आज कळमसरे गावात पवार कुटुंबाचा जो सन्मान आहे, त्यामागे आत्माराम पवार यांच्या कष्टाइतकेच हेमलताताईंचे त्याग, संयम, प्रेम आणि संस्कार यांचे मोठे योगदान आहे.
त्यांनी जगलेले आयुष्य हे प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणा, प्रत्येक कुटुंबासाठी आदर्श आणि प्रत्येक समाजासाठी माणुसकीचा धडा आहे.
त्यांचे कर्तृत्व काळाच्या ओघात विसरले जाणार नाही. त्यांनी दिलेले संस्कार, उभे केलेली माणसे आणि निर्माण केलेला आदर्श हाच त्यांचा खरा स्मारक ठरेल.
भावपूर्ण श्रद्धांजली!
परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि पवार परिवारास हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच संत गजानन महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना.
– शब्दांकन :
श्री. ईश्वर आर. महाजन
संपादक –मराठी लाईव्ह न्युज
मो.9860352960


