लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर तालुक्यात प्रतिमा वितरण उपक्रम , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचा पुढाकार; शासकीय, निमशासकीय कार्यालये व संस्थांना प्रतिमा सप्रेम भेट
![]()
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर तालुक्यात प्रतिमा वितरण उपक्रम
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचा पुढाकार; शासकीय, निमशासकीय कार्यालये व संस्थांना प्रतिमा सप्रेम भेट
अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती राज्यभर शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांमध्ये अधिकृतपणे व आदरपूर्वक साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक (आधार) पाटील यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शासनाच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि प्रत्येक कार्यालयात लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा सन्मानाने स्थापित करून जयंती साजरी करता यावी, या उद्देशाने त्यांनी तालुक्यातील विविध शासकीय व सामाजिक संस्थांना स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमा सप्रेम भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी, प्रशासनातील दूरदृष्टीपूर्ण निर्णयांसाठी तसेच अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणासह विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे योगदान मोलाचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमाची सुरुवात अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, प्रांताधिकारी कार्यालय तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांना प्रत्यक्ष भेट देऊन स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमा प्रदान करून करण्यात आली. यावेळी अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे व अन्य सहकारी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यातील सर्व प्रमुख शासकीय अधिकारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्थांना स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमा सप्रेम भेट म्हणून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रतिमेसोबत अशोक पाटील यांनी संबंधित कार्यालये व संस्थांना एक पत्रही दिले असून, त्यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात, सन्मानाने आणि आदरपूर्वक साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि लोकनेत्यांच्या कार्याचा गौरव जतन करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे तालुक्यातील विविध स्तरांतून स्वागत होत असून, सभापती अशोक पाटील यांच्या या स्तुत्य पुढाकाराचे सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.


