शब्दजादूगार सुनील धनगर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी , शिक्षण व समाजप्रबोधन क्षेत्राचा गौरव
![]()
शब्दजादूगार सुनील धनगर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी
शिक्षण व समाजप्रबोधन क्षेत्राचा गौरव
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – महाराष्ट्रातील तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, प्रभावी वक्तृत्वाने समाजमन मोहून टाकणारे आणि ‘शब्दजादूगार’ म्हणून राज्यभरात ओळख निर्माण केलेले प्रख्यात युवावक्ते सुनील धनगर यांनी आपल्या कार्याची आणखी एक तेजस्वी नोंद करून ठेवली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे त्यांना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (Human Resource Management) या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसह सामाजिक योगदानालाही यामुळे नवा आयाम प्राप्त झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुनील धनगर संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या माध्यमातून युवकांना प्रेरित करत, समाजप्रबोधनाची ज्योत प्रखरतेने उजळवत आहेत. त्यांची वक्तृत्वकला, विचार मांडण्याची शैली, लोकांशी जोडून घेण्याची क्षमता आणि सामाजिक प्रश्नांवरील संवेदनशील दृष्टिकोन यांमुळे ते सर्वत्र लोकप्रिय ठरले आहेत. विशेषतः युवकांना सकारात्मक दिशा देण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे व्यापक कौतुक होत असते.
सध्या ते पुण्यातील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. व्यवस्थापन, शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, संवादकला आणि नेतृत्वगुण या क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून अनेक विद्यार्थ्यांसाठी ते मार्गदर्शक, गुरू आणि प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.
सुनील धनगर यांच्या पीएच.डी. पदवीप्राप्तीमुळे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाची लहर पसरली आहे. विविध संघटना, विद्यार्थी, श्रोते आणि अनुयायी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाला “ज्ञान, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीची फलश्रुती” असे म्हटले जात आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अमळनेर तालुक्यासह संपूर्ण राज्याचा मान उंचावला आहे.


