पूरग्रस्तांच्या न्यायासाठी काँग्रेसची आक्रमक भूमिका; तातडीच्या पंचनामे व आर्थिक मदतीची प्रशासनाकडे जोरदार मागणी   अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर
1 min read

पूरग्रस्तांच्या न्यायासाठी काँग्रेसची आक्रमक भूमिका; तातडीच्या पंचनामे व आर्थिक मदतीची प्रशासनाकडे जोरदार मागणी अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

Loading

पूरग्रस्तांच्या न्यायासाठी काँग्रेसची आक्रमक भूमिका; तातडीच्या पंचनामे व आर्थिक मदतीची प्रशासनाकडे जोरदार मागणी

अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

अमळनेर प्रतिनिधी :
दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर शहर व तालुक्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत नागरिक, शेतकरी, व्यापारी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधितांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने प्रशासनाकडे केली आहे.
या पार्श्वभूमीवर दि. २ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. बोरी नदीच्या उत्तरेकडील रेल्वे पुलापासून दक्षिणेकडील माळी मढी परिसरापर्यंत, संताजी नगर, मार्केट कमिटीमागील भाग तसेच शहरातील विविध वस्त्यांमध्ये जाऊन नुकसानीचा आढावा घेण्यात आला.
पाहणीदरम्यान रियाझ मौलाना यांच्या वीटभट्ट्याचे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. नदीकाठावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, डाळी, कपडे, अंथरुण-पांघरुण यासह दैनंदिन वापराच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले. घरांमध्ये गाळ साचल्याने अनेक कुटुंबांसमोर जेवण, निवारा आणि स्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही धान्य पाण्यात भिजल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात दुर्गंधी पसरल्याचे पाहणीत आढळले. तसेच प्रसाद नगर, भालेराव नगर, संताजी नगर, गलवाडे रोड, ताडेपूरा, पहिलाड आदी भागांतील नागरिकांचेही पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
नाल्यांच्या काठावरील अतिक्रमणे आणि पावसाळ्यापूर्वी नाल्यांची प्रभावी साफसफाई न झाल्याने पाणी रस्ते, घरे आणि वस्त्यांमध्ये शिरल्याचे काँग्रेसने निदर्शनास आणून दिले. या परिस्थितीसाठी नगरपालिकेच्या दुर्लक्षाकडेही लक्ष वेधण्यात आले.
तालुका व शहरातील सुमारे १२०० ते १५०० कुटुंबे या पुरामुळे बाधित झाली असून, अनेक ठिकाणी शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. घरांची पडझड, शेतरस्त्यांची दुरवस्था, काही रस्ते खचणे तसेच पशुधनाचेही नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पूरानंतर शहर व ग्रामीण भागात साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, डेंग्यू, मलेरिया तसेच त्वचारोगांचा धोका वाढला असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. नागरिकांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सेवाभावी संस्थांनीही मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी, नगरपरिषद अमळनेर यांना निवेदन सादर करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, प्रा. शाम पवार, मगन वामन पाटील, पी. वाय. पाटील यांनी पूरग्रस्तांच्या समस्या मांडल्या.
तहसीलदार यांना निवेदन देताना डॉ. रवींद्र पाटील, रोहिदास कापडे, कन्हैयालाल कापडे, अधिकार पाटील, लोटन चौधरी, तुषार संधान शिव यांनी शेतकरी व पूरग्रस्तांच्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली.
मुख्याधिकारी, नगरपरिषद यांच्याकडे राजेंद्र भिकन पाटील, डॉ. प्रकाश सोनवणे, ॲड. रज्जाक शेख, लोटन पाटील, सुधाकर भैसे, कैलास पाटील यांनी बोरी नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या मांडल्या. यावेळी राजू भाट, साईद तेली, तोशिब तेली, शालिग्राम पाटील आणि पितांबर पाटील उपस्थित होते.

पूरग्रस्तांना तातडीने न्याय मिळावा, नुकसानग्रस्तांचे पंचनामे त्वरीत पूर्ण करून आर्थिक मदत जाहीर करावी आणि आरोग्य व स्वच्छतेच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, अशी ठाम मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *