पूरग्रस्तांच्या मदतीला धावले महेंद्र पाटील; मानवतेचा हात देत उभा केला आशेचा दीप! , अमळगावातील पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; नुकसानाची पाहणी करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
1 min read

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले महेंद्र पाटील; मानवतेचा हात देत उभा केला आशेचा दीप! , अमळगावातील पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; नुकसानाची पाहणी करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन

Loading

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले महेंद्र पाटील; मानवतेचा हात देत उभा केला आशेचा दीप!

अमळगावातील पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; नुकसानाची पाहणी करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन

अमळनेर प्रतिनिधी (दिनकरराव पाटील)
अमळनेर तालुक्यासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. विशेषतः पातोंडा–अमळगाव गटातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे पातोंडा येथील पारधी वस्ती तसेच अमळगावातील काही भागात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेक कुटुंबांवर संकटाचा डोंगर कोसळला.
या कठीण परिस्थितीत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्री. महेंद्र पाटील आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ. शीतल महेंद्र पाटील यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
महेंद्र पाटील यांनी अमळगावातील पूरबाधित वस्तीत प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. त्यांनी पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून संकटाच्या काळात मानसिक आणि आर्थिक आधार दिला. तसेच प्रत्येक कुटुंबाचे झालेले नुकसान जाणून घेत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही परिस्थिती आणून देत आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
अचानक आलेल्या या मदतीमुळे अनेक पूरग्रस्तांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. संकटाच्या काळात समाजातील संवेदनशील व्यक्ती मदतीला धावून आल्याने नागरिकांनी महेंद्र पाटील आणि सौ. शीतल पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी अमळगावचे माजी सरपंच प्रवीण चौधरी, उपसरपंच जयेश कोळी, ग्रामपंचायत सदस्य गोविंदा चावरे, विनय सर, नरेंद्र चौधरी, शेखर पाटील, गुलाब कोळी, अक्षय पाटील, दशरथ पारधी, दिनेश पारधी यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेंद्र पाटील यांच्या या मानवतावादी उपक्रमाचे अमळगावसह संपूर्ण परिसरात सर्व स्तरांतून कौतुक होत असून, संकटसमयी दिलेला हा आधार पूरग्रस्तांसाठी मोठा दिलासा ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *