डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक दीपस्तंभ -प्रा.डॉ.राहुल निकम
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक दीपस्तंभ -प्रा.डॉ.राहुल निकम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केले असून त्यांचे कार्य कोणत्याही एका विशिष्ट जाती धर्मा करता नाही तर समस्त भारतीयांकरिता आहे. बाबासाहेबांनी समाज व्यवस्थेतील सर्व घटकांपर्यंत केलेले कार्य अविस्मरणीय आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून तळागाळातील माणसाला देखील न्याय,हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत. त्यांनी निर्माण केलेले भारतीय संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे.
व्यवस्था परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. डॉ. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल संपूर्ण भारत देश त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचे कार्य समस्त भारतीयांकरिता दीपस्तंभ आहे. असे मत समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा.डॉ. राहुल निकम सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभेत प्रमुख वक्ता म्हणून बोलताना मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन एकलव्य टायगर ग्रुप आणि लालबागचा राजा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ. लीलाबाई कदम होत्या. प्रमुख मान्यवर म्हणून उपसरपंच रवींद्रनाथ कदम, प्रा.डॉ. विजय गाढे, रघुनाथ संदानशिव, आत्माराम अहिरे, मुख्याध्यापक व्ही.सी.महाले,
अतुल डोळस, हृदयनाथ मोरे, समाधान मैराळे आदी मान्यवर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांसह अन्य महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापक विजय महाले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकला. त्यांचे कार्य सर्वांसाठीच उपयुक्त असल्याचे सांगितले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ संदानशिव यांनी आपण जे काही आहोत ते फक्त डॉ,बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहोत,असे सांगत विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन अभ्यास करावा असे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजिनीयर प्रफुल्ल शिरसाट, आत्माराम अहिरे, भूपेश सोनवणे, अनिल कदम आधी मान्यवरांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन इंजिनीयर प्रफुल्ल शिरसाठ यांनी केले. अभिवादन कार्यक्रमास गावातील आणि परिसरातील ग्रामस्थ तथा विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

