बाबासाहेब तुम्ही नसते तर उद्धरली नसती कोटी कुळे !!!!
1 min read

बाबासाहेब तुम्ही नसते तर उद्धरली नसती कोटी कुळे !!!!

Loading

बाबासाहेब तुम्ही नसते तर उद्धरली नसती कोटी कुळे !!!!

भारताच्या भव्य प्रांगणात वेळोवेळी मानवतेच्या संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी अनेक महापुरुषांनी सारे आयुष्य दुसऱ्यासाठी समर्पित केल्याचे अनेक उदाहरणे आहेत… हिरण्यकच्छप पासून बळीराजा , चार्वाक, गौतम बुद्ध, महावीर, चक्रधर ,बसवेश्वर, नामदेव, तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा फुले अशा अनेक लोकांनी आपल्या संस्कृतीला वाचवण्यासाठी स्वाभिमानाची रुजवणूक करण्यासाठी असंख्य कष्ट घेतले… त्याच परंपरेतील फुले ,शाहू परंपरेत डॉक्टर बाबासाहेब यांचे योगदान अप्रतिम आहे… आज महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो.. 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होय… निर्वाण हा शब्द पाली व संस्कृत भाषेतील शब्द आहे.. निर्वाण म्हणजे शांत, मुक्त, प्रबुद्ध अवस्था… निर +वाण म्हणजेच पूर्णपणे षडरिंपू पासून मुक्त झालेले जीवन… दुःखाच्या पलीकडे अवस्था म्हणजे निर्वाण होय… ज्या व्यक्तीला दुःखाच्या पलीकडे जाता आले… त्याला निर्वाण अवस्था प्राप्त झाली असे म्हणता येईल… महापरिनिर्वाण म्हणजेच बुद्धाच्या वाटेने जाणाऱ्या बोधिसत्वाचे निर्वाण म्हणजे महापरिनिर्वाण होय… बाबासाहेब हे बुद्धाच्या बऱ्याच अवस्था पार करत बोधिसत्वापर्यंत आलेले होते. अशा महापुरुषाचे निर्वाण होणे म्हणजे महापरिनिर्वाण होय… महा याचा अर्थ मोठे .. परि म्हणजे सर्व बाजूंनी त्याचप्रमाणे निर्वाण म्हणजे सर्व दुःखांपासूनची मुक्ती होय… बाबासाहेब आंबेडकर एक महान हस्ती होते.. अशा महापुरुषाचे निर्वाण होणे म्हणजे महापरिनिर्वाण होय… बुद्धाच्या मार्गाने जाणारे अनेक वाटसरू बुद्धांच्या काही अवस्थांपर्यंत मजल मारीत असतात त्यांची निर्वाण देखील महापरिनिर्वाण होय.. भारतातील सिंधू संस्कृती जाऊन मनुस्मृति आधारित संस्कृती निर्माण झालेली होती. अशा संस्कृतीला छेद दिल्याचे काम प्रबोधनाच्या वाटेने जाणाऱ्या महापुरुषांनी अनेक वेळा केले आहे.. भारतात विषमतेने परमोच्य सीमा गाठलेली होती… त्या विषमतेचे बीज अद्याप संपलेले नसताना भीमराव आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला महू ह्या मध्यप्रदेशातील गावी झाला… जातिभेदाने उच्च नीच दरी निर्माण केलेल्या कालखंडात अंधाराच्या सीमा कापत भीमराव आंबेडकरानी शिक्षण घेतले… प्राथमिक शिक्षण घेत असताना वर्गाच्या बाहेर बसावे लागले तरी शिक्षणाची जिद्द सोडली नाही… माध्यमिक शिक्षण साताऱ्याच्या प्रताप सिंह हायस्कूलमध्ये करून भारताच्या विषमतेला चिरत ज्ञानाचा महासागर विश्वातील ज्ञान घेण्यासाठी तडफडत होता… राजे सयाजीराव गायकवाड व छत्रपती शाहू महाराज यांच्या कृपेने भीमराव आंबेडकर विदेशातील शिक्षण घेऊ शकले… असा हा महामानव भारतातील अविवेकी समाज पाहून त्या समाजाची दिशा बदलण्याची महत्वकांक्षा ठेवून ज्ञानाची असंख्य कवाडे उघडत ज्ञानाचा प्रकाश कवेत घेत चालला होता… आपल्या पूर्वीच्या महामानवांनी केलेल्या क्रांतीचे स्मरण करून त्यांची उज्वल परंपरा पुन्हा उभी करण्यासाठी धडपडत होता… विदेशामध्ये विविध प्रकारचे सखोल ज्ञान घेत असताना आपली रमा म्हणजे रमाबाई आंबेडकर हिला किती यातनांना सामोरे जावे लागत असेल याची चिंता मनात सतावत होती… शेण्या थापून मोलमजुरी करून लेकरांचा सांभाळ करीत होती.. आपला साहेब जो आपल्या देशाचे तसेच या देशातील दीन, दलित ,वंचित, गरीब लोकांचे दुःख दूर करण्यासाठी विदेशाची वारी करीत होता… रमाईला विश्वास होता माझ्या साहेब देशाला सोनेरी दिवस आणल्याशिवाय राहणार नाही.. माता रमाईने अगदी खडतर जीवन जगून लहान मुलांची म्हणजेच आपल्या लेकरांची काळजी घेतली… साहेब विदेशात असताना असंख्य संकटे रमाईच्या पदरात रुंजी घालत होते… एकदा बाबासाहेबांची लेकरू आजारी पडून मृत्युमुखी पडले.. बाबासाहेब भारताला सर्वच प्रकारच्या गुलामीतून मुक्त करण्याचे स्वप्न पाहत होते.. मनी निश्चय केलेला होता या देशाची मी असताना दयनीय अवस्था मी होऊ देणार नाही असा चंग त्यांनी
बांधला होता… बाबासाहेबांचा मुलगा मृत्युमुखी पडलेला असताना त्याला कफनासाठी सुद्धा पैसे नव्हते… बाबासाहेब मुलाच्या मरणाच्या समयी आले… लोक त्यांना कफन साठी पैसे मागू लागले… परंतु बाबासाहेबांकडे स्वतःच्या मुलाच्या कफनासाठी पैसे नव्हते.. माता रमाईने बाबासाहेबांची अवस्था ओळखली… तिला जाणीव झाली की बाबासाहेबांच्या खिशामध्ये एक दमडी नाही … त्यावेळी घरात जाऊन स्वतःचे जुने लुगडे बाहेर आणून त्याचा वापर कफनासाठी केला… बाबासाहेबांनी आपल्या मुलासाठी लोकांकडे कफनासाठी ही हात पसरला नाही.. किती मोठा स्वाभिमान हा.. बाबासाहेबांनी आपले दुःख कुणाला सांगितले नाही.. माता रमाई ने डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांसाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेले होते… बाबासाहेब उज्वल भारताच्या भविष्यासाठी १८ अभ्यास करीत असत… विदेशात संपूर्ण दिवस वाचनालयात घालून ज्ञानाचा कळस उंच चढवीत होते… आंबेडकरांना बुद्धाच्या विचाराने झपाटून टाकले होते… मानव मुक्तीचा खरा विचार बुद्धाच्या तत्त्वज्ञानात दडलेला होता.. बुद्धांनी केलेल्या क्रांतीने जगाला विवेक, चिकित्सा, विज्ञान, बुद्धिनिष्ठता, तर्क समजला होता. इतर लोकांचे तत्वज्ञान दैव, प्रारब्ध, पाप, पुण्य, स्वर्ग ,नरक, आत्मा, परमात्मा या काल्पनिक गोष्टीत रममाण करणारी होते… बाबासाहेब हा भीमराव आंबेडकर हे हिंदू धर्मातच जन्मलेले होते.. हिंदू धर्मामध्ये जन्म होऊनही मंदिरामध्ये, शिक्षणाच्या दालनात, पाणी पिण्यासाठी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींना प्रवेश नव्हता… १९३२ च्या येवला जिल्हा नाशिक येथील सभेत बाबासाहेब आंबेडकरांनी खडसावून सांगितले की मी हिंदू धर्मात जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही… याच्याच अर्थ बाबासाहेबांनी बुद्धाच्या अप्रतिम ज्ञानाचे प्राशन केलेले होते.. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे त्यांच्या कार्याचे सूत्र होते..
बाबासाहेबांनी जगातला एक विषय बाकी ठेवला नाही की ज्या विषयाचे बाबासाहेबांना ज्ञान नाही… ज्या काळामध्ये बाबासाहेबांना शिक्षण घेण्यापासून रोखण्यात आले त्याच काळात असंख्य अडचणी दूर सारत ज्ञानपीपासू भीमराव आंबेडकर जागतिक दर्जाचा विद्वान झाला… स्वतःच्या मुलांचे पैसे अभावी जीवन खुंटले.. आरोग्यासाठी दमडी नसल्याने हाल होऊन त्यांना मरावे लागले… बाबासाहेब यांनी भारतीय दीन दुबळ्यांचा विचार केला… बाबासाहेबांना असंख्य नोकऱ्या चालून आल्या होत्या तरीही त्यांनी आपल्या भारतातील अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाचा विचार केला… बाबासाहेब सुखाने नोकरी करून भरपूर पैसा मिळवू शकले असते परंतु या स्थितप्रज्ञाने स्वतःची जीवन भारताला उद्धारण्यासाठी खर्च केले… भारताच्या संविधानासाठी सर्वांना घेऊन चालणारा एकमेव विद्वान जर कोणी असेल तर ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होत.. असा विश्वास ब्रिटिशांना होता.. त्यामुळे बाबासाहेबांना गोलमेज परिषदेत विचार मांडले आले.. सायमन कमिशन यांना भारताची दशा विशद करता आली… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांचे डॉक्टर होते.. कोणत्या पुस्तकाची शस्त्रक्रिया करायची यासाठी त्यांनी आपल्या बुद्धीचा कस लावून पुस्तकांची समीक्षा केली.. कालबाह्य विचार मांडणाऱ्या पुस्तकांचा निषेध केला.. मनुस्मृती सारख्या स्त्रियांवर व अस्पृश्यांवर अन्याय करणाऱ्या ग्रंथाला जाळले… भारताचे संविधान निर्माण करण्याचे सर्व श्रेय केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाते.. सर्वच प्रकारच्या संकल्पनांचे, कायद्यायचे सूक्ष्मज्ञान बाबासाहेबांना होते.. भारतात चाललेल्या विषमतावादी परिस्थितीचा अभ्यास होता.. त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी संविधानामध्ये बाबासाहेबानी पुरेपूर घेतली आहे.. बाबासाहेबांनी चळवळ चालवित असताना समाजाला ज्ञानवंत करण्यासाठी शिक्षणाला महत्व दिले.. बाबासाहेबांचे गुरु गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले हे होते… ज्या महापुरुषांनी सत्याला महत्त्व दिले अशा च महापुरुषांना बाबासाहेबांनी गुरु मानले.. बाबासाहेबांनी चळवळ करीत असताना कुणाकडून लाचारीने पैसे घेतले नाही… असंख्य लोक बाबासाहेबांच्या चळवळींना पैसे देण्यासाठी पुढे आले परंतु सात्विक, निस्वार्थी, परोपकारी, जाणीव असलेल्या, सामंजस लोकांचे पैसे चळवळीसाठी स्वीकारले.. शीलभ्रष्ट लोकांकडून समाज सेवेसाठी एका दमडीचा ही वापर केला नाही.. आपले सारे जीवन शीलसंपन्नतेने जगून विरोधकांना बोट ठेवायला जागाच ठेवली नाही… सर्वच क्षेत्रामधले ज्ञान असल्याने अतिउच्च प्रतीची राज्यघटना लिहून भारतीय समाजावर फार मोठे उपकार केलेले आहेत. बाबासाहेबांनी सर्व समाजाला समान न्याय दिला… समाजातल्या वाईट प्रवृत्तीला विरोध केला.. कुण्या समाजाला दोष दिला नाही. बाबासाहेबांचे स्वप्न होते की सारा भारत विज्ञाननिष्ठ बनवावा..
आपल्या समाजाने विवेक, चिकित्सा, तर्क , बुद्धिनिष्ठता या मार्गाने जावे. बाबासाहेबांनी अनेक पुस्तके लिहिली .. त्या पुस्तकाचा अद्यापही कोणी विरोध करू शकला नाही..”
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करील गुरगुरल्याशिवाय राहणार नाही..” असे बोलून शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिलेली आहे.. आम्ही शिकलो परंतु आम्हाला संघटित होता आले नाही.. काही संघटित झाले परंतु त्यांना संघर्ष करता आला नाही.. आम्ही राज्यघटनेला मानवाच्या मनामनात रुजू शकलो नाही… संविधानाला हात लावून आणायची आम्ही हात छाटू अशी भाषा करणाऱ्या लोकांना हे समजलेच नाही की संविधानाला न हात लावत आहे कमकुवत करता येईल.. खाजगीकरणामुळे मिळालेले आरक्षणही कूचकामी ठरत आहे.. बाबासाहेबांनी कायदेमंत्री असताना हिंदू कोड बिल यासारख्या बिलाने स्त्रियांना मिळालेला दुय्यम दर्जा समान करून मतदान प्रक्रियेत स्त्रियांना दादांना दिले… आज ज्या मुली शिकू शकल्या त्याचे श्रेय बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे मिळाले… भारताच्या सर्वोच्च स्थानी मागासवर्गीय महिला जाऊ शकली याचे सर्व श्रेय बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेला आहे.. बाबासाहेबांनी केलेल्या अथक परिश्रमाचे फळ सर्वांना मिळाले.. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे बरेच लोक विदेशात शिक्षण घेऊ शकले परंतु त्यांनी चळवळीकडे पाठ फिरवली.. राज्यघटनेने निर्माण केलेले कायदे आज लोक मनाप्रमाणे वापरू लागले आहेत… कायद्यांचा योग्य वापर होत नसल्याने कायद्यायची भीती राहिली नाही… सामान्य लोकांना न्याय मिळणे फारच कठीण झालेले आहे… सत्ताधीशांच्या आदेशावर न्यायपालिका ,कार्यपालिका चालत आहे अशी टीकाकार सांगतात… बाबासाहेब तुम्ही आम्हाला संविधान देऊन मुक्त स्वातंत्र्य बहाल केले.. आपले अनन्य साधारण असे उपकार सर्व भारतीयांवर आहे… बाबासाहेबांना मानवतेवर जगणारा समाज पाहायचा होता… त्यासाठीच जागोजागी बुद्धाच्या विचारांची लागवड संपूर्ण भारतात करू पाहत होते… लहानपणापासून असंख्य कष्ट घेत अविश्रांत श्रम करीत ज्ञानाचा महासागर
थकला होता… शरीर गलीत गात्र झाली होती… तरीही “बुद्ध अँड हिज धम्म”या पुस्तकाचे लिखाण चालू होते… या पुस्तकाचे प्रकाशन बाबासाहेब जग सोडून गेल्यावर झाले. आपला समाज कुणापुढे लाचार झालेला बघायचा नव्हता… भारताला ज्ञानदान देणारा देश म्हणून ओळख उभी करायची होती.. संविधानाने दिलेल्या अधिकाराबाबत त्यांनी विधान केले होते की राज्यघटना चालविणारे चांगला विचाराचे असतील तर राज्यघटना त्यांना अतिउच्च शिखरावर घेऊन जाईल.. परंतु ते लोक लायक नसतील तर राज्यघटना निरपयोगी ठरेल.. त्याचाच अनुभव आज दिसून येत आहे.
बाबासाहेबांनी तीन डिसेंबर ला आपल्या सेवेत असलेल्या शिपायाला बघण्यासाठी गेले असता.. त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.. मृत्यू हा अटळ आहे हे सत्य त्याला सांगितले.. दुःखाची भीती बाळगू नको… प्रत्येकाला एक दिवस हे जग सोडून जायचेच आहे.. त्यामुळे ती सत्य स्वीकारले पाहिजे..
बाबासाहेब बुद्ध धर्माच्या अप्रतिम विचार सरणीला वंचित, गरीब, अस्पृश्य तसेच तर्काने जगणाऱ्या कोणत्याही समाजाला बुद्धाच्या क्रांति शिवाय पर्याय नाही हे सांगत होते.. शरीर साथ देत नव्हते..
शरीराची सारी शक्ती देशाच्या उन्नतीसाठी वापरली होती.. डॉक्टर बाबासाहेब भारतीयांना असे विचार देऊन गेले की त्या विचाराची शिदोरी कधीही संपणार नाही..
सहा डिसेंबर 1956 या दिवशी रात्रीला बाबासाहेबांची प्राणज्योत मावळली… जगात कुणाच्याही अंतयात्रेला एवढी गर्दी होणार नाही तेवढी गर्दी चैत्यभूमीवर जमा झालेली होती… असंख्य जनसमुदाय टाहो फोडून रडत होता…. माया भगिनी हंबरडा फोडून रडत होत्या… स्वाभिमानाचे भाकरी ज्या महापुरुषाने खायला शिकवणे तोच जग सोडून निघून गेलेला होता… वंचितांचे अश्रू बाबासाहेबांच्या जाण्याने विरहाचे गीत गात होते… बाबासाहेबांच्या लेखणीने जगावर जादू केलेली होती… ताठ मानेने जगायला भाग पाडणारे बाबासाहेब यांचे विचार होते… आजही ज्यांच्या डोक्यात बाबासाहेबांचे विचार असतील त्यांना लाचार होण्याची वेळ येतच नाही. ज्ञानाची अप्रतिम भूक असलेला जगातला एकमेव व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब होते… बाबासाहेबांचे विचार ज्यांनी मनी रुजवले होते ते लोक चैत्यभूमी आपल्या अश्रूंना वाट करून देण्यासाठी दरवर्षी दादरला येत असतात.. अजूनही बाबासाहेब त्यांच्या विचारावर चालणाऱ्या पथिकांची वाट चैत्यभूमीवर पहात असतात…

पत्रकार
एस. एच .भवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *