खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमोर आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर चर्चा; शिष्टमंडळाने निवेदन
![]()
खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमोर आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर चर्चा; शिष्टमंडळाने निवेदन
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) –
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या हक्कांसाठी शिष्टमंडळाने खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमोर निवेदन सादर केले. यावेळी युनियनचे सरचिटणीस श्री. रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात कल्पना भोई, सुनंदा पाटील, भारती नेमाडे, कविता नेमाडे आदींनी सहभाग घेतला.
निवेदनात मुख्य मागण्या अशा होत्या की आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते लागू करावेत, महागाईनुसार मानधनात भरघोस वाढ करावी, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन आरोग्य विभागात समयोजन करावे, सेवा निवृत्ती वय 60 ऐवजी 65 वर्षे करावे, सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावे, ऑनलाईन कामासाठी मोबाईल, डेटा रिचार्जसह आवश्यक साधने पुरवावीत, कंत्राटी कर्मचारी म्हणून सन 2023 पासूनचा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा, तसेच आजारपण आणि प्रसूतीसाठी भरपगारी रजा लागू करावी.
शिष्टमंडळाने निवेदनातील सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा केली असून, यावर केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्यासोबत लवकरच अधिवेशन काळात बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मा. मंत्री महोदयांनी आश्वासन दिले.
सरचिटणीस श्री. रामकृष्ण बी. पाटील यांनी सांगितले की, या बैठकीत युनियनच्या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून योग्य तो प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

