अमळनेरची नगरपरिषद निवडणूक : सत्ता कोणाची? सत्ता बदलणार की विचार बदलणार? नेत्यांची धावपळ, उमेदवारांची गर्दी… अमळनेर मतदारांच्या न्यायालयात! “उमेदवारांची फौज, आश्वासनांचा पाऊस — निर्णय एकाच बटनावर!” नगराध्यक्ष पदावर एकच प्रश्न — ‘विकास कोण करणार?’ नावाची नाही, कामाची निवड करा अशी होतेय चर्चा
![]()
अमळनेरची नगरपरिषद निवडणूक : सत्ता कोणाची? सत्ता बदलणार की विचार बदलणार?
नेत्यांची धावपळ, उमेदवारांची गर्दी… अमळनेर मतदारांच्या न्यायालयात!
“उमेदवारांची फौज, आश्वासनांचा पाऊस — निर्णय एकाच बटनावर!”
नगराध्यक्ष पदावर एकच प्रश्न — ‘विकास कोण करणार?’ नावाची नाही, कामाची निवड करा अशी होतेय चर्चा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषद निवडणूक—फक्त सत्ता मिळवण्याची स्पर्धा नाही, तर शहराच्या भविष्याचा निर्णायक क्षण आहे. यंदाची निवडणूक आणखी महत्त्वाची का आहे याचे कारण म्हणजे नगराध्यक्ष पद हे लोकनियुक्त आणि अनुसूचित जमाती (ST) राखीव असल्याने शहरातील राजकीय आकडेमोड बदलली आहे. या पदासाठी अनेक चेहरे समोर येत असताना नेते, कार्यकर्ते, समर्थक आणि सत्ताकेंद्रे यांच्यात हालचाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमळनेर शहरात मिटींग, वॉर्ड भेटी, सोशल मीडिया मोहीमा, कार्यकर्त्यांचे जमाव यांना अक्षरशः उधाण आले आहे. अनेक वर्ष प्रभागात दिसत नसलेले काही उमेदवार अचानक “माझे लोक, माझा प्रभाग” म्हणत मतदारांच्या घरी पोहोचले आहेत. अशा उमेदवारांविषयी सामान्य नागरिक विचारतो—पाच वर्षे कुठे होता?
राजकीय समीकरणे — संघर्ष स्पष्ट
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रत्यक्ष प्रचारात उतरून शिवधनुष्य उचलले आहे. नेत्यांना सोबत घेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.
दुसरीकडे विद्यमान आमदार अनिल पाटील हे देखील कार्यकर्ता मेळावे, प्रभाग भेटी आणि रणनीती आखत सक्रिय आहेत.
माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील, साहेबराव धोंडू पाटील आणि इतर पदाधिकारी कोणाची उमेदवारी मंजूर करणार याकडे शहराची नजर आहे.
या सर्वांपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे —
या स्पर्धेत प्राधान्य ‘अमळनेरच्या विकासाला’ आहे की ‘गटबाजीच्या राजकारण्यांना’?
समस्या आजही तशाच…
प्रत्येक निवडणुकीत विकासाचे आश्वासन दिले जाते, पण प्रश्न मात्र कायम आहेत—
रस्त्यांची दयनीय अवस्था,गटारींची गैरसोय
ओपन स्पेसचे अतिक्रमण व दुर्लक्ष
घरपट्टी कराचा वाढलेला भार,पाणीपुरवठ्याचा अनिश्चित वेळापत्रक, रस्त्यांचे तीन तेरा झाले आहेत प्रभागातील. दुचाकी, फोरविलर चालवणे कठीण झाले आहे .यासाठी अमळनेर शहरातील वाहन धारकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवले आहेत याचे कारण म्हणजे प्रभागातील रस्ते चांगले नाहीत…
मतदारांच्या मनात एकच भावना — वचनं नको, काम दाखवा.


अमळनेर प्रशासनाची तयारी
या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्ण सज्ज झाले आहे. 18 प्रभागांसाठी 36 जागा आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र मतदान आयोजित केले आहे. एकूण 89,751 मतदार मतदान करणार असून यासाठी 97 मतदान केंद्रे तयार केली आहेत. उमेदवारी अर्जांसाठी वन विंडो प्रणाली ठेवण्यात आली आहे. निवडणूक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि तक्रारविरहित करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
मतदारांची बदलती मानसिकता
पूर्वी मतदार भावनिक होऊन मतदान करत. आता परिस्थिती बदलत आहे—
मतदार ‘प्रज्ञावंत’ झाले आहेत.
ते विचारतात—“कोण आमच्या प्रभागात काम करणार?”
मतदार आज गट किंवा पक्षाकडे न पाहता काम करणाऱ्या व्यक्तीकडे पाहत आहेत. अमळनेरमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीत अशी जाणीव जाणवत आहे की—
मतदान म्हणजे भविष्याचा करार. सौदेबाजी नव्हे.
हा निवडणूक निकाल काय सांगणार?
या निवडणुकीत ‘कोण जिंकणार’ हा प्रश्न महत्त्वाचा आहेच.
परंतु यापेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे—
मतदार कोणत्या प्रकारचे नेतृत्व निवडणार?
काम करणाऱ्याला संधी मिळेल का? की फक्त गटांचे राजकारण परत येईल?
शहराचा कणा असलेल्या नागरिकांनी आता विकासाला मत द्यावे, गटबाजीला नाही. सत्तेची चूक झाली तरी पुढच्या पाच वर्षांची किंमत अमळनेरवासीयांना मोजावी लागते.
सत्ता कोणाची होणार हे पुढील काळ ठरवेल…
पण अमळनेरचा विकास कोण करणार हे मतदारांनी आजच ठरवायचे आहे.

