विद्यार्थ्यांमध्ये करुणा आणि सामाजिक बांधिलकी वाढीसाठी महात्मा फुले हायस्कूल देवगांवमध्ये ‘करुणा क्लब’ स्थापन
![]()
विद्यार्थ्यांमध्ये करुणा आणि सामाजिक बांधिलकी वाढीसाठी महात्मा फुले हायस्कूल देवगांवमध्ये ‘करुणा क्लब’ स्थापन
अमळनेर प्रतिनिधी
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव, ता. अमळनेर, जि. जळगांव येथे कोरोना क्लब संदर्भातील सविस्तर माहिती देतांना महाराष्ट्र राज्याचे समन्वयक भुपेशभाई चरण यांनी विद्यार्थ्यांच्या सध्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकला.
भुपेशभाई यांनी सांगितले की, आजकाल विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होत आहे, अभ्यासाऐवजी सोशल मिडिया, गेम याकडे त्यांचे लक्ष अधिक केंद्रीत होत आहे. आधी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करत असत, तर पालक शिक्षकांना पाठिंबा देत असत. परंतु आजकाल विद्यार्थी शिक्षणास विरोध करतात आणि पालकही शिक्षकांच्या शिक्षेवर तक्रार करतात. त्यामुळे शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष राहणे कमी झाले आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की, पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत मुलांवर संस्कार व्हायचे, पण आज विभक्त कुटुंबात ते मिळणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पशुपक्षी, प्राणी यांच्याप्रती दया, सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठी ‘करुणा क्लब’ महत्त्वपूर्ण आहे. क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये देशातील सामाजिक बांधीलकीची भावना जोपासली जाते.
कार्यक्रमात मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एस. विंचूरकर यांनी सहविचार सभेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर. महाजन, एस.के. महाजन, एच.ओ. माळी यांनी भुपेशभाई यांचा सत्कार केला. मुंदडा हायस्कूलचे शिक्षक गोकुळ बोरसे व सुनील पाटील सुद्धा उपस्थित होते.
महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील व संभाजी पाटील उपस्थित होते. महात्मा फुले हायस्कूलने विद्यार्थ्यांना करुणा क्लबचे सदस्य बनण्याची प्रेरणा दिली आणि भविष्यातील सामाजिक बांधिलकी वाढीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

