शिवसेना डावलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पराभवाची चव — वाघांचा इशारा , शिवसेनेचा दमदार मेळावा
![]()
शिवसेना डावलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पराभवाची चव — वाघांचा इशारा
शिवसेनेचा दमदार मेळावा
अमळनेर प्रतिनिधी: तालुक्यात उबाठा गटाची शिवसेना संपली असे अनेकांना वाटले होते मात्र आजची गर्दी पाहून अनेकांना धडकी भरली असेल. सेनेची ताकद कमी असली तरी अनेकांचे राजकारण बिघडवण्याची ताकद अमळनेरच्या शिवसेनेमध्ये आहे. ज्याने त्याने अमळनेर तालुक्यात शिवसेनेला डावलून राजकारण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याना पराभवाचा धक्का खावा लागला हा इतिहास आहे याची जाणीव ठेवावी असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी अमळनेर येथे टाऊन हॉल मध्ये झालेल्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना दिला.
आगामी जिल्हापरिषद ,पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीची व्ह्यूव रचना करण्यासाठी सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. वाघ पुढे म्हणाले की विकासाचा फक्त गवगवा केला जात आहे. सर्वसामान्य नागरिक सुविधांपासून वंचित आहे. जनतेचे आरोग्य धोक्यात आहे. तालुक्यातील निम्मे पेक्षा जास्त पाणी पूरवठा योजना अद्यापही अपूर्ण आहेत. नवीन रस्ते होत असले तरी अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. सामान्य जनतेचा कैवारी पक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना हा एकच पर्याय जनतेपुढे उरतो. शिवसैनिक स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे तर जनतेच्या सुखासाठी लढतो. शिवसैनिकानो सज्ज व्हा आणि आपली ताकद दाखवा असेही आव्हान त्यांनी कार्यकर्त्याना केले.
उपनेत्या शुभांगी पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका केली. शब्द न पाळणारे हे करंटे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा करून व्यापाऱ्यांना पोसणारे सरकार आहे. अमळनेर तालुक्याला अवकाळीच्या मदतीतून वगळण्यात आले. तुम्हाला वगळण्याची ताकद आता मतदानातून दाखवा असे आवाहन केले. जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील म्हणाले की आगामी निवडणुका साम ,दाम ,दंड ,भेद सर्व नितीचा वापर करून , जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय लढवल्या जातील शिवसैनिकानो तुम्ही फक्त सतर्क राहा असे आवाहन केले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी , पियुष गांधी , महिला आघाडी प्रमुख महानंदा पाटील , जयदीप पाटील ,रमेश पाटील , संपर्क प्रमुख कारभारी आहेर , उपजिल्हा प्रमुख नितीन निळे यांची भाषणे झालीत.
मेळाव्यास तालुका प्रमुख राजेंद्र मराठे , नरेंद्रसिंग ठाकोर , देवेंद्र देशमुख , चंद्रशेखर भावसार , बाळासाहेब पवार , मोहन भोई , विलास पवार , युवसेना प्रमुख गोकुळ कोळी ,बाळासाहेब पाटील , रवींद्र पाटील , महिला आघाडीच्या मनीषा परब , उज्वला कदम , ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह तालुक्यातील शिवसेना प्रेमी हजर होते.

