श्री मंगळ ग्रह मंदिरात १४वा श्री तुळशी विवाह सोहळा विधिवत व मंगलमय वातावरणात साजरा
1 min read

श्री मंगळ ग्रह मंदिरात १४वा श्री तुळशी विवाह सोहळा विधिवत व मंगलमय वातावरणात साजरा

Loading

श्री मंगळ ग्रह मंदिरात १४वा श्री तुळशी विवाह सोहळा विधिवत व मंगलमय वातावरणात साजरा

अमळनेर प्रतिनिधी: भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पवित्र परंपरेनुसार वधू-वरांच्या ब्रम्हगाठी विवाह सोहळ्यांसारख्या पद्धतीने बांधल्या जातात. या परंपरेचा जतन करण्याच्या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेने बुधवार, दि. ५ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह सोहळा अतिशय शुभ व पारंपरिक पद्धतीने आयोजित केला. यंदाचा सोहळा १४व्या वर्षी पार पडला आणि सर्व प्रकारच्या खर्चिक तामझामाला फाटा देत सनातन व साध्या पद्धतीने संस्कृतीबद्ध वातावरण निर्माण केले गेले.
सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटे शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा सुरु झाला. सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान वधू-वरराजाचे वाग्दान पूजन यजमान अनिल मराठे व मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर साडेआठ ते नऊ दरम्यान हळदीचा कार्यक्रम पार पडला. अमळनेर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र भगवान ठाकरे व दंत चिकित्सक डॉ. श्वेता राजेंद्र ठाकरे यांनी मधुपर्क पूजन केले.
साडेनऊ ते ११ दरम्यान कन्यादान व लाजा होम पार पडला, ज्यासाठी नवविवाहित नितीन सदाशिव पाटील (नंदगाव) हे सपत्निक यजमान होते. सायंकाळी पाच वाजता वराच्या वेषातील भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीची सजविलेल्या रथात व श्री मंगळ ग्रह देवाची पालखी मंदिर परिसरात उत्सव रूपात मिरवली गेली. भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्याचा आनंद घेतला.
सोहळ्याचे यजमान मनोज पाटील (कलाली) यांनी सपत्निक पालखी पूजन, हरिहर भेटीचे पूजन व मंगल आरती केली. वर- वधूच्या मामांची भूमिका माजी नगरसेवक बाळा पवार व मनोहर दीक्षित यांनी निभावली. ज्येष्ठ पुरोहित केशव पुराणिक व कर्मब्रह्मा परशुरामजी शर्मा यांनी मुख्य पौरोहित्य केले. विधीप्रमाणे मंगलाष्टक वाचन करून विधिसिद्ध कार्यक्रम पार पाडला.
सोहळ्याच्या यशासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुळकर्णी, तसेच अनेक भाविक व सेवेकरी यांनी परिश्रम घेतले. मंदिरातील सेवेकरी व वऱ्हाडींच्या रुपाने शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाली, रुढी व परंपरेचे जतन

मंगळग्रह सेवा संस्थेने दरवर्षी भव्य प्रमाणात श्री तुळशी विवाह महासोहळा साजरा केला; मात्र, यावर्षी कमी खर्चात परंपराप्रमाणे कार्यक्रम पार पाडण्यावर विशेष भर दिला गेला. १० जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पारंपरिक हिंदु संस्कृतीप्रमाणे साजरे करण्यास शपथ देण्यात आली होती, जी सर्व उपस्थितांना दिली जात आहे. त्यामुळे यंदा सोहळा साधेपणाने, परंतु पूर्णतः सनातन हिंदु धर्माच्या चाली, रुढी व परंपरेनुसार पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *