उकिरड्याचे देवपण
1 min read

उकिरड्याचे देवपण

Loading

उकिरड्याचे देवपण

मागच्या आठवड्यात मुंबईला जाण्याचा योग आला. मुंबईची महानता, तिची भव्यता अवाढव्य असली तरी तिच्या आजूबाजूच्या उप नगरा मध्ये देखील तिच्या भव्यतेची छाया उमटली आहे. त्यामुळेच लोकसंख्येचा एवढा हा भस्मासुर असतानाच जागोजागी निर्माण होणारा कचरा हा खरंतर ह्या महानगराची तसेच उप नगराची मुख्य समस्या जाणवते. कचरा कितीही’ निशिद्ध ‘मानला तरी तो निर्माण होतच असतो. हल्ली गाव परिसर स्वच्छ ठेवणे हे खरोखरच कठीण काम झाले असल्या मुळे आपल्या लोकांमध्ये कचरा हा कचराकुंडीत टाकण्यापेक्षा कचराकुंडी हीच कचऱ्याच्या ढिगा मध्ये गाडण्यासाठी आहे. असा समज असतो. त्यामुळे येणारा कचरा हा कचराकुंडी च्या चहु बाजूने विखुरला असतो .
गावा गावामध्ये नवीन वसलेल्या कॉलनी मध्ये कचरा हा शेजारी शेजारी ‘समन्वय’ साधणारा मुख्य दुवा ठरला आहे. काही झाले तरी कॉलनी मधील रहिवाशांच्या भांडणाचे मुख्य कारण हा कचराच असतो. शेजाऱ्याच्या वॉल कंपाऊंडच्या आतला झाडांचा पाला पाचोळा आपल्या प्लॉटमध्ये पडतो. त्यामुळे आपण आपल्या दारा समोरचा कचरा मागच्या प्लॉटमध्ये फेकतो .मुळात अशा बांधलेल्या कॉलन्यां मध्ये नगरपालिका ढुंकून सुद्धा पाहत नाही .त्यामुळे रस्ते ,नळ पाण्याची व्यवस्था तर नसतेच परंतु इलेक्ट्रिक पोल ची सुद्धा व्यवस्था नसते .गावा पासूनच्या अशा दूरच्या कॉलण्या मध्ये आमची कॉलनी असल्यामुळे आम्ही तिचे नावच ‘दूरदशा कॉलनी’ असे ठेवले आहे. आमच्या कॉलनी ची दुर्दशा येथेच संपत नाही .नगरपालिका आमच्यापर्यंत पोहोचत नाही. परंतु आमच्या कॉलनी चे रहिवासी सुद्धा एकमेकांकडे सहकार्याच्या भावनेने पाहत नाहीत. कॉलनी वाशीं च्यां जीवनाची व्याख्या ही साधी सरळ आहे.
“मी ,माझी पत्नी ,माझी मुलं आणि माझ्या बंगला…!”
अशीच असल्यामुळे कमीत कमी शेजाऱ्या ने आपल्या वॉल कंपाऊंड मध्ये कचरा फेकला म्हणून तो भांडण्या साठी जागा होतो .त्यामुळे आज असेच निमित्त झाले. सकाळी सकाळी श्याम दगडकर कंपाऊंडच्या भिंती आड जोरजोरात ओरडू लागला. आज पहाटेची सुप्रभात त्याच्या दगडा सारख्या टणक आवाजाने दणकून उठली. त्याच्या संतापाचे कारण रास्त होते. त्याच्या कंपाऊंडच्या आत कोणीतरी अंड्याचे टरफले फेकले होते. ज्याच्या पाच पिढ्या या शुद्ध शाकाहारी होत्या .जो स्वतःचे रक्त हे इतर नॉनव्हेज वाल्यां पेक्षा रक्तदानासाठी कसे पवित्र आहे हे पटवून सांगत असतो. त्याच्या दारा समोर ही टरफले म्हणजे अतिच झाले…! त्याचा शेजारी प्रकाश देवदार होता. त्याच्या ओरडण्याने देवदार सुद्धा आपल्या घराचे मुख्य चॅनल गेट उघडून बाहेर निघतो . खुराड्या त झाकलेल्या कोंबड्या सारखी त्याने आपली लांब मान झटकली .
“देवदार.. हे योग्य नाही. तुम्ही अंडे खायचे आणि टरफले आमच्या दारात फेकायचे..? उचला ती टरफले ..!”
श्याम दगडकर डायरेक्ट अटॅक करतो .
” मी ..अंडे खाल्ले नाही..! मी अंड्याची टरफले उचलणार नाही..”
प्रकाश देवदार ने बांग दिली. लोकमान्य टिळकांनी शेंगा खाल्ल्या नाहीत .त्यामुळे त्यांनी शाळेत शेंगांची टरफले उचललेली नाहीत. हा इतिहास त्याला माहीत असल्यामुळे प्रकाश देवदार व शाम दगडकरां मध्ये हाणामारी ची भीषण परिस्थिती निर्माण झाली. तसे आम्ही मध्यस्थीसाठी मध्ये पडलो.
“दगडकर साहेब ..अंडे हे तसे शाकाहारी असते. मटणाचे हाड अथवा कोंबडीचे पिसे टाकली असती तर ते डेंजरस होते ..!”
भांडणाची तीव्रता कमी व्हावी तसेच ‘मटणाच्या हाडा पेक्षा अंडे मऊ ‘ या भावनेने आम्ही मध्यस्थी करतो.
तशात मंद हवेची झुळूक येते. दगडकरां च्या पारिजातका च्या झाडाची फांदी हलते. आणि अलगद वरून आणखी एक अंडे खाली पडते. सर्व कॉलनीतील रहिवासी तसेच दगडकर पहात राहतो..! वस्तुस्थिती अशीच असते .पारिजातकाच्या झाडावर एक साळुंकी पक्षी चे घरटे असते. घरट्या तील अंडे हवेमुळे झाडावरून खाली पडले असते. अचानक शांतता पसरते.
तसा प्रकाश देवदार गरजतो .
“आता चष्मा लावून बघा..! अंड्याची टरफले कुठून आली..!”
अशाप्रकारे कचऱ्यामुळे आम्ही सर्व कॉलनी वासी एकत्र येत असतो. जगाच्या पाठीवर पैशाची जशी देवाण घेवाण होते. तशीच या कचऱ्याची सुद्धा देवाण घेवाण होते. माणसाची सुद्धा राख होते म्हणजेच कचरा होतो. शेजारी शेजारी राहणाऱ्या चाळकऱ्यां ना सुद्धा शेजारच्या घरात काय शिजले आहे हे कोणाच्या घरातून काय कचरा येतो यावरून त्या घरात काय शिजले हे समजते. त्यामुळे’ दाणे दाणे पे लिखा है खानेवाले का नाम ‘ अशी म्हण म्हणण्यापेक्षा ‘कचरे कचरे पे लिखा है फेकने वाले का नाम ..!’असं म्हणायला पाहिजे .
शेवटी काय तर आपण कितीही कचरा टाळण्याच्या गप्पा केल्या तरी कचरा हा अटळ आहे .श्रीमंतांच्या भरजरी कपड्या पासून ते गरिबांच्या लंगोटी पर्यंत सारे काही कचऱ्याच्या ढिगात जाते. पालापाचोळा असो वा सोन्याचे कण सारे कचऱ्यात एकत्र राहतात .
मात्र पायाखाली कचरा तुडविणार्या माणसाला सुद्धा कचऱ्याच्या ढिगावर वर्षातून एकदा दिवाळीत उकिरड्या वर दिवा लावावा लागतो. नाकारल्या जाणाऱ्या उकिरड्या ला त्यामुळेच देव पावतो.
असलं हे कचरा पुराण लवकर संपविलेलं बरं ..! काही झालं तरी हा लेख देखील छापून आल्यावर वर्तमान पत्राच्या रद्दीत म्हणजेच पर्यायाने कचरा कुंडीतच जाणार आहे… !

गोकुळ बागूल
२१, टेलिफोन कॉलनी ,पिंपळे रोड, मू.पो. ता. अमळनेर
जिल्हा जळगाव
पिन ४२५४०१ मो.९४२२२७६१४०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *