नम्रतेने माथा टेकावा अशा गुरुच्या चरणी लीन पितृतुल्य प्रा. डॉ. बी. आर. जोशी (पुणे)
![]()
नम्रतेने माथा टेकावा अशा गुरुच्या चरणी लीन
पितृतुल्य प्रा. डॉ. बी. आर. जोशी (पुणे)
हिरक महोत्सवाच्या उंबरठ्यावर उभे असलेले धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालय एकेकाळी आदिशक्तींनी भारलेले मंत्रीभूत झालेले तेजोमयी गुरुवर्यांनी परिमळाचा बगीचा फुलविला होता. धुळ्यासारख्या अविकसीत भागात ज्ञानदाराचे कार्य केले. शहरातील कष्टकऱ्यांची पोरं आणि ग्रामीण भागांतून आलेले विद्यार्थी हे तत्कालीन गुरुवर्यांचे केंद्रबिंदू होते. विद्यावर्धिनीच्या प्रथम बॅचमधील तत्कालीन प्राध्यापकांपैकी प्रथम प्राचार्य नानासाहेब वैद्य, प्रा. प्र.दा. दलाल, पितृतुल्य ल.भा. कुरकुरे, प्रा. डॉ. न.म. जैन, प्रा. के. मा. देशपांडे, प्रा. पी.एन. मुळे, प्र. न. देशपांडे, प्राचार्य जे. जी. खैरनार या सर्व प्राध्यापकांनी धुळ्यात राहणे पसंत केले. उर्वरीत बरेचशे प्रा. ह.श्री. शेणोलीकर, प्रा. ना. द. शिरोळकर, प्रा. व.गो.बोकरे, प्रा. डॉ. बी. आर. जोशी यांनी पुणे येथे स्थायिक होणे पसंत केले. दोघे-तिघे अपवाद वगळता स्थापनेच्या प्रथम बॅचचे गुरुजन आज हयात नाहीत.
परवा एका कार्यक्रमानिमित्त पिंपरी-चिंचवड येथे गेलो होतो. ही संधी साधून प्रा. डॉ. बी.आर. जोशी सर यांच्या पुणे येथील नवी पेठेतील घर शोधले. आधी दूरध्वनी केला होता म्हणून सर अक्षरश: दरवाजा बाहेर येऊन बापाने मुलाची वाट अशी पहात थांबले होते. सरांसोबत तासभर गप्पा झाल्या. गतस्मृतींची उजळणी झाली. वयाच्या 92 व्या वर्षीही सरांचे मन प्रसन्न होते. सर म्हणजे चैतन्याचा झरा, ज्ञान सागर, त्यांचे बोलणेच थांबू नये वाटत होते. वर्गातल्या स्मृती जाग्या झाल्या. सरांचे पुत्रवत विद्यार्थी प्रेमाचा मी लाभार्थी आहे. पहिल्या बॅचचे सर्वच प्राध्यापक ग्रामीण भागासह शहरातील गरीब विद्यार्थ्यांना त्या काळात चार-चार महिने पगार होत नसतांनाही तोडक्या पगारातून मदत करून शिक्षणासाठी प्रोत्साहीत करत त्यात जोशी सर अग्रणी होते. सर मानसनिती, समाजविज्ञान शाखेचे प्राध्यापक, क्लीष्ट विषय अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत. अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले सर असंख्य पुस्तकांचे ते लेखक आहेत. विद्यावर्धिनीत उपप्राचार्य म्हणून कामगिरी बजावत असतांना एन.सी.सी.चे कमांडट म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होतो. 92व्या वर्षीही त्यांच्या लेखनात विश्राम नाही. असं कुणी तरी म्हटलयं की, ‘‘एखाद्या रुग्णावर उपचार करतांना डॉक्टरची चुक झाली तर तर रुग्ण दगावतो. आरोपीची बाजू मांडतांना वकील चुकला किंवा न्याय देतांना न्यायाधीश चुकले तर निरपराध व्यक्ती फासावर जाईल; पण या देशाचा-राष्ट्राचा कणाअसलेली पिढी घडविणारा शिक्षक चुकला तर एक पिढीच गारद होईल.’’ असं तत्कालीन शिक्षकांच्या पिढीला पुरेपुर भान होते म्हणून त्यांनी आपली सेवा बजावंताना सेवेशी, कर्तव्याशी भान राखले होते. म्हणूनच जोशी सरांसारख्या त्यांच्या शैक्षणिक तालमीत तयार झालेल्या सुप्रसिद्ध कादंबरीकार दिलीप भावसार, एल.आय.सी.चे निवृत्त अधिकारी, निवृत्त फौजी, गरीबीशी प्रखर संघर्ष करीत शिक्षण घेतलेले मधुकर एच. पाटील, पोस्टाचे निवृत्त अधिकारी विजयसिंग डी. गिरासे यांच्यासारखे असंख्य विद्यार्थी सरांचे घर शोधून त्यांची भेट घेत त्यांच्या चरणी लीन होतात. प्रा. डॉ. बी. आर. जोशी सरांशी झालेली माझी भेट परमेश्वराच्या भेटीपेक्षा कमी नव्हती. नम्रतेने माथा टेकावा असे पवित्र चरण आता राहिलेत तरी किती आणि कोठे? सरांचे चरण स्पर्श करून व प्रा. स्व. भाग्यरेखा जोशी ताई यांच्या प्रतिमेला वंदन करीत बाहेर पडलो. सर इमारतीच्या खाली प्रवेशद्वारापर्यंत सोडायला आले. मला निरोप देऊन पाठमोरे झालेले सर पहात असतांना मी डोळ्यातले अश्रू रोखू शकलो नाही आणि जड पावलांनी मी वाट धरली.
पितृतुल्य बी.आर. जोशी सरांशी आता पुन्हा कधी भेट होईल माहित नाही. मात्र त्यांच्या चरणस्पर्शाने मला नक्की उभारी मिळाली.
केला उन्नत हा माथा, दान करूनिया ज्ञान…
त्यांच्या चरणी झुकता, मज झाले समाधान…
असे दिव्यत्वाची जेथे, उभी साक्षात प्रचिती…
तेव्हा मनालाही वाटे, माथा झुकवावा किती…..
– गो. पि. लांडगे,


ज्येष्ठ पत्रकार, धुळे
मो. 94227 95910

