“आनंदी पालकत्व – मुलांच्या भावनिक विकासातून घडविलेले उज्ज्वल भविष्य” ,डॉ. वाघुळदे व डॉ. भोईटे यांचे व्याख्यान: पालकत्वातून समाजपरिवर्तनाची प्रेरणा
![]()
“आनंदी पालकत्व – मुलांच्या भावनिक विकासातून घडविलेले उज्ज्वल भविष्य”
डॉ. वाघुळदे व डॉ. भोईटे यांचे व्याख्यान: पालकत्वातून समाजपरिवर्तनाची प्रेरणा
अमळनेर शारदीय व्याख्यानमालेत पालकत्वाचे महत्व अधोरेखित
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर व प्रा. आप्पासाहेब र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प २५ सप्टेंबर रोजी मराठा मंगल कार्यालय येथे गुंफण्यात आले. या व्याख्यानमालेत “आनंदी पालकत्व – सकारात्मक दृष्टिकोन” या महत्त्वपूर्ण विषयावर विचारमंथन झाले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींमध्ये एक्सीडेंट हॉस्पिटलचे डॉ. सुमित सूर्यवंशी, डॉ. स्वप्नील चौधरी (जळगाव), मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, संदीप घोरपडे, प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी, अंबिका मंगल कार्यालय व नर्मदा रिसॉर्टचे मालक कैलास पाटील, प्रा. किरण माळी व नेमाडे सर यांचा सहभाग होता. व्याख्याते यांचा परिचय अजय केले यांनी करून दिला. यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्याख्यात्यांचा व व्याख्यानमालेस उदारहस्ते मदत करणाऱ्या देणगीदारांचा पुष्पगुच्छ व स्नेहवस्त्र देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्य व्याख्याते इंजि. सुधीर वाघुळदे (जळगाव) यांनी आपले विचार मांडताना पालकत्वाचा गाभा स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की पालकत्व बाहेर कुठे शोधायचे नसून ते प्रत्येकामध्येच असते. आई-वडिलांच्या भूमिकांमध्ये वेळोवेळी फरक पडतो; काही वेळा बापाने प्रेमळ व्हावे लागते तर काही प्रसंगी मुलाला आईची जास्त गरज असते. पालकत्व अनेक प्रकारचे असते आणि त्यात सकारात्मकता व नकारात्मकता या दोन्ही बाजूंचा योग्य प्रकारे उपयोग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
व्याख्यात्यांनी “सफल, सफळ, संपूर्ण” या तीन शब्दांचा अर्थ मुलांना समजावून देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. पालकत्वातूनच आई-वडिलांना प्रेम, समाधान, जिव्हाळा व आनंद लाभतो, तसेच पालकत्वाची खरी अनुभूती दैनंदिन आयुष्यातील उदाहरणांतून जाणवते. त्यांनी नमूद केले की समाजाच्या मुळाशी पालकत्व आहे. म्हणूनच सुदृढ पालकत्व घडविणे म्हणजेच सुदृढ समाज घडविणे होय.
यावेळी व्याख्यात्यांनी उपस्थित श्रोत्यांना विचारले की आपले शहर कसे असावे? त्यात आरोग्यदायी वातावरण, नातेसंबंध वृद्धिंगत करणारी सकारात्मकता, आनंद, स्वच्छता, नैतिकता, व्यसनमुक्त जीवनशैली, उत्तम शिक्षण व व्यवसायाच्या संधी असाव्यात. आणि यामागचे मूळ कारण पालकत्वात आहे, असे प्रतिपादन करत त्यांनी आनंदी पालकत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. राहुल भोईटे यांनी पालकत्वाचे महत्त्व अधोरेखित करताना विचार मांडले की –
आज आपण पालक म्हणून जे काही आहोत ते आपल्या भूतकाळाचा परिणाम आहे. समाजातील परंपरा, वारसा व रूढी आपण जसाच्या तसा पुढे नेत असतो; पण त्यात आवश्यक त्या बदलांची गरज आहे. जर एखादी गोष्ट चुकीची वाटली तर तिची जबाबदारी आपण आई-वडिलांवर टाकतो, दोषारोप करतो. परंतु खरी गोष्ट अशी आहे की, पालक म्हणून आपल्यालाच सुधारणा घडवून आणाव्या लागतात.
ते पुढे म्हणाले की, अनेकदा आपल्या आई-वडिलांविषयी आपल्याला काही अपूर्णता जाणवते, काही त्रुटी दिसतात. मात्र त्या अपूर्णतेतूनच आपल्याला चांगले पालकत्व कसे असावे, पुढील पिढीला कोणते संस्कार द्यावेत याची जाणीव होते. म्हणूनच पालकत्व ही सतत सुधारणा, आत्मपरीक्षण व सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे नेण्याची प्रक्रिया आहे.
या प्रेरणादायी व्याख्यानामुळे श्रोत्यांमध्ये पालकत्वाबद्दल नवीन दृष्टिकोन निर्माण झाला असून समाजपरिवर्तनासाठी पालकत्व हीच खरी गुरुकिल्ली असल्याचा ठसा उमटला.
डॉ भोईटे म्हणाले कि
पालकत्वातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे मुलांशी भावनिक कनेक्शन ठेवणे. मुलांशी फक्त सांगणे, शिकवणे किंवा नियम लादणे पुरेसे नसते; त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या मनातील भावना, विचार, भीती आणि आनंद समजून घेणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा पालक मुलांशी वेळ घालवतात, त्यांचे बोलणे संयमाने ऐकतात आणि त्यांच्या छोट्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहतात, तेव्हा मुलांच्या मनात विश्वासाची वीट बसते, जी त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी आधारभूत ठरते.
शिवाय, मुलाला स्वतः व्यक्त होऊ देणे हे पालकत्वाचे दुसरे महत्त्वाचे अंग आहे. अनेकदा पालक “आम्ही सांगतो तेच योग्य” या दृष्टिकोनातून मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु मुलाला व्यक्त होऊ दिल्यास त्याच्या विचारांना मोकळीक मिळते, आत्मविश्वास वाढतो, आणि तो चुका करून शिकण्यास सक्षम होतो. मुलामध्ये सकारात्मकता, आत्मभान व जबाबदारीची जाणीव निर्माण होते, तर पालक-मुलांचे नातेही अधिक मजबूत होते.
पालकत्वात संतुलन राखणे आवश्यक आहे. मुलांशी मैत्रीपूर्ण नाते ठेवणे महत्त्वाचे असले तरी योग्य मार्गदर्शन देखील आवश्यक आहे. खूप बंधने घालणे किंवा पूर्ण मोकळीक देणे दोन्ही टोकाचे प्रकार आहेत; मुलांच्या वय, परिस्थिती व स्वभावानुसार संतुलन साधल्यासच ते योग्य पालकत्व ठरते. अशा पद्धतीने मुलांना व्यक्त होण्याची संधी दिल्यामुळे ते समाजात आत्मविश्वासाने वावरतात, स्वतःच्या विचारांवर ठाम राहतात आणि इतरांचा सन्मान करतात. या प्रक्रियेतूनच आनंदी पालकत्वातून सुदृढ, सकारात्मक आणि आत्मनिर्भर समाजाची निर्मिती होते.
शेवटी डॉ भोईटे पालकत्वाबाबत प्रॅक्टिकल दृष्टिकोन सांगतात. मुलांच्या नैसर्गिक विकासासाठी अनुभव, निरीक्षण, आणि संवाद महत्वाचा आहे; डिजिटल तंत्रज्ञानाने त्यांचा नैसर्गिक विकास अडथळा निर्माण करू शकतो. पालकांनी स्वतःच्या चुका स्वीकारून मुलांशी प्रेमपूर्वक वागावे; ‘परफेक्ट’ पालक होण्याचा दबाव टाळावा असे सांगितले.
व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे, जगदीश कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाचेउत्कृष्ट सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य मंडळाचे पदाधिकारी भैय्यासाहेब मगर,अजय केले यांनी केले.




