“सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण  अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी
1 min read

“सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी

Loading

सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण

अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान आयोजित शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ आमदार मा. अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या उद्घाटनप्रसंगी विचारपीठावर आमदार अनिल पाटील, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, प्रमुख अतिथी म्हणून हरी भिका वाणी (संचालक, खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर), सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना विक्रांत पाटील, माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील, महात्मा फुले विचारमंचाचे संपर्क प्रमुख महेंद्र महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी आमदार अनिल पाटील म्हणाले :
“हि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळ प्रयत्नशील आहे. येथे अभ्यासू व्यक्तींच्या विचारांची मेजवानी मिळते. डॉ. जोशी यांच्या नेतृत्वाखालील कार्यसंघ अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो. मराठी साहित्य संमेलनाची जबाबदारी अमळनेरवर आली, ही मोठी अभिमानाची बाब आहे. व्याख्यानमालेसारखे उपक्रम सध्याच्या सामाजिक परिस्थितीत अत्यावश्यक आहेत. लवकरच सांस्कृतिक भवनाची उभारणी करण्याचे प्रयत्न सुरू राहतील.”
प्रस्ताविक करताना डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले :
“अकरा वर्षांपासून ही व्याख्यानमाला निरंतर सुरू आहे. आज ती वटवृक्षात रुपांतरित झाली आहे. अमळनेरला दोन वेळा साहित्य संमेलनाचा मान लाभला आहे. येथे लोकसंगीतास विशेष प्राधान्य देण्यात आले. अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून गौरव मिळाला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. लवकरच मराठी वाङ्मय मंडळ ७४ वर्षे पूर्ण करणार आहे.”

माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील म्हणाले :
“शारदीय व्याख्यानमालेमुळे अमळनेरकरांना आणि वाचनप्रेमींना साहित्यिक मेजवानी मिळते. या मंडळाने वर्षभर अनेक उपक्रम राबविले आहेत.”
शारदीय व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी, २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, मुंबई यांनी “एका संगीतकाराची मुसाफिरी – किस्से, गाणी आणि अनुभव” या विषयावर रसिकांशी संवाद साधत अविस्मरणीय सुरेल मैफल सादर केली.

संगीताचा प्रवास आणि अनुभव
आपल्या सुमधुर शैलीत बोलताना त्यांनी भारत हा गोष्टींचा आणि गाण्यांचा देश असल्याचे सांगितले. संगीत आणि कथा सांगण्याची परंपरा ही भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “छंद हे वेदांचे पाय आहेत” असे सांगून त्यांनी श्रोत्यांना संगीत आणि कवितेतील नात्याची गोडी उलगडून दाखवली.

कविता आणि गाणी – रसिकांसाठी मेजवानी
त्यांनी “सुर मावळतो मी कसा” हे सुरेश भट लिखित गाणे सादर केले. तसेच बागवे सरांची “वासाचा पहिला पाऊस” ही कविता गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. “लाभले आम्हास लाभले भाग्य मराठी” हे गीत सादर करताना हॉलमधील वातावरण भारावून गेले.

कवितेचे महत्त्व अधोरेखित
“कविता समजल्याशिवाय तिला चाल देऊ नका. कवितेचे विविध टप्पे उलगडत असतात आणि गाण्यातून त्यांची खरी जाणीव होते,” असे सांगत त्यांनी काव्य आणि संगीत यातील नाते स्पष्ट केले.

रसिकांची उपस्थिती
या सुरेल संध्याकाळीसाठी मराठा मंगल कार्यालयात अमळनेरकर साहित्यप्रेमी, विद्यार्थी, कलाकार आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाणी, किस्से आणि अनुभवांच्या माध्यमातून कौशल इनामदार यांनी रसिकांना एक आगळीवेगळी अनुभूती दिली.
व्याख्यानमालेचे आयोजन मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे, जगदीश कुलकर्णी यांनी केले आहे.
सुत्रसंचालन व आभार प्रा. श्याम पवार सर व स्नेहा एकतारे मँडम यांनी मानले.

 

चौकट

सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे (ठाणे) व अरुण म्हात्रे (ठाणे) यांच्या “काव्यसंध्या – सुमधुर मराठी कवितांचा सुंदर कार्यक्रम” या बहारदार काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व रसिकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *