लंपी आजारामुळे अमळनेर तालुक्यातील पशुधनावर संकट
![]()
लंपी आजारामुळे अमळनेर तालुक्यातील पशुधनावर संकट
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील कळमसरे, पाडळसरे, खेडी, वासरे, तांदळी, मारवड या परिसरामध्ये पशुधनावर लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे.
गाई-म्हशी, बैल यांना या आजाराची लागण होत असून लाखो रुपयांचे जनावर मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. लंपी आजाराची सुरुवातीची लक्षणे म्हणजे जनावराच्या पायांच्या मुद्द्यात सूज येणे, अंगावर गाठी उमटणे, अंग सुजणे, प्रचंड ताप येणे आणि चारा-पाणी न घेणे अशी आहेत. त्यामुळे जनावरांची प्रकृती झपाट्याने खालावत असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.
या साथीमुळे अनेक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे जनावर दगावले आहे. पशुधन हेच शेतकऱ्यांचे मुख्य आधारस्तंभ असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.
गावोगावी या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी औषधोपचार, जनावरांचे लसीकरण आणि जनजागृती मोहिम राबविण्याची गरज आहे. अन्यथा पशुधनाच्या या भीषण संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

