निवेदनाची तात्काळ दखल; प्रभाग १७ मधील रस्ते-गटारी दुरुस्तीला सुरुवात!
![]()
निवेदनाची तात्काळ दखल; प्रभाग १७ मधील रस्ते-गटारी दुरुस्तीला सुरुवात!
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील रस्ते व गटारींच्या दुरुस्तीच्या मागणीची अमळनेर नगरपरिषदेने तात्काळ दखल घेत कामाला सुरुवात केली आहे. झामी चौक, रामदेवजी बाबा चौक ते शिवाजीनगर, तसेच शिरूड नाका परिसरातील रस्ते व गटारींच्या दुरुस्तीबाबत कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रताप (आबासाहेब) शिंपी यांनी दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांना निवेदन दिले होते.
या निवेदनाद्वारे प्रभागातील विविध समस्या नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत संबंधित कामाला सुरुवात झाल्याने प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त करत माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांचे आभार मानले असून, समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्याच्या पाठपुराव्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, प्रताप शिंपी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांचे आभार मानले असून, प्रभागातील उर्वरित समस्यांकडेही प्रशासनाने लक्ष देऊन त्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

