तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला देवगांव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला देवगांव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने 14 सप्टेंबर 2025 रोजी तालुकास्तरीय हिंदी राष्ट्रभाषा निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस मोठा गट (इयत्ता 8वी ते 10वी) अशा दोन विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सुमारे 40 हून अधिक विद्यार्थ्यांनी लेखनकौशल्याची चमक दाखवली.
लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी “मेरा भारत महान” हा विषय देण्यात आला होता, तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना “राष्ट्र निर्माण में राजभाषा हिंदी का महत्व” या विषयावर लेखणी फिरवायची संधी मिळाली.
नियमावलीनुसार लहान गटासाठी किमान 150 ते 200 शब्दांचा, तर मोठ्या गटासाठी 400 ते 500 शब्दांचा निबंध लिहिणे बंधनकारक होते. स्पर्धकांनी निबंध फक्त हिंदी भाषेतच, तसेच ए-फॉर साईजच्या पेपराच्या एका बाजूला लिहावा अशी अट होती.
या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन हिंदी परीक्षा प्रमुख आय. आर. महाजन यांनी केले, तर मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे शिक्षक एस. के. महाजन व एच. ओ. माळी यांनी विशेष परिश्रम घेत सहकार्य केले.
स्पर्धेतील सर्व निबंध तपासणी शालेय स्तरावर हिंदी विषयाचे शिक्षक करतील. त्यानंतर प्रत्येक शाळेतून निवडलेले प्रथम क्रमांकाचे निबंधच मंडळाकडे पाठवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत भाग घेतला. देशभक्तीचे विचार, राष्ट्रभाषेबद्दलची जाणीव आणि लेखनाची ओढ त्यांच्या निबंधातून प्रकर्षाने जाणवत होती. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या भाषाशक्तीबरोबरच राष्ट्रप्रेमही उजागर झाले. निकाल जाहीर होण्याची आतुरता विद्यार्थ्यांत व शिक्षकांत सर्वत्र दिसून येत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थी हिंदी भाषेत लेखन व चिंतन करताना दिसावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष सौ. योगश्री पाटील, सचिव नारायण चौधरी, कोषाध्यक्ष सौ. प्रतिभा जाधव तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी आवाहन केले आहे.

