“३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हतनूर प्रकल्पातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण संपुष्टात; मंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनाने दिलासा”
1 min read

“३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हतनूर प्रकल्पातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण संपुष्टात; मंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनाने दिलासा”

Loading

“३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हतनूर प्रकल्पातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण संपुष्टात; मंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनाने दिलासा”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
निम्न तापी प्रकल्प कार्यालयासमोर संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी आमरण उपोषणास बसलेल्या ७४ वर्षीय शेतकरी उमराव भाऊराव बोरसे यांच्या आंदोलनाचा सहाव्या दिवशी यशस्वी शेवट झाला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या दालनात या प्रश्नावर बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण सोडण्यात आले.
हातेड खुर्द, बुधगाव, अनवर्दे खु. शिवारातील शेतकरी गेल्या ३० वर्षांपासून अप्पर तापी प्रकल्प हतनूर अंतर्गत संपादित जमिनीचा पारदर्शक मोबदला मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. न्याय मिळत नसल्याने उमराव बोरसे यांनी १० सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून हालचाल न झाल्याने मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थांनी निम्न तापी प्रकल्प कार्यालय परिसरात जमून आंदोलन तीव्र केले.
कार्यकारी अभियंता य. म. कडलग यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, सरपंच सुनिल पाटील तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य सुनील पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कायदेशीर बाजू उलगडून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मंत्री महोदयांच्या दालनात भेटून प्रश्न मार्गी लावला जाईल, असे ठोस आश्वासन मिळाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आले.
या आंदोलनाला उर्वेश साळुंखे, गुलाबराव बोरसे, मनीषा बोरसे, रेखाबाई बोरसे, कविता बोरसे, जगतराव बोरसे, श्रीराम बोरसे, सुनील बोरसे, महेश बोरसे, रवींद्र बोरसे, धनंजय साळुंखे, नाना तिरमले, शुभम तिरमले, महेश पवार, शशिकांत बोरसे, अरुण बोरसे, शरद नन्नवरे, पांडुरंग बोरसे यांच्यासह शेकडो अन्यायग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *