भारतरत्नापेक्षा ज्यांच्या विचाराने विश्वरत्न घडले असे महापुरुष म्हणजे तात्यासाहेब जोतिबा फुले !!!
![]()
भारतरत्नापेक्षा ज्यांच्या विचाराने विश्वरत्न घडले असे महापुरुष म्हणजे तात्यासाहेब जोतिबा फुले !!!
जगात विवेकाची, तर्काची, विज्ञानाची गरज भासली त्यावेळी वेगवेगळ्या महापुरुषांनी क्रांती केलेली दिसून येते. ग्रीक देशातील सॉक्रेटिस, गॅलिलिओ असो किंवा भारतातील चार्वाक, गौतम बुद्ध असोत. समाजाची वाटचाल सत्याच्या दिशेने जाण्यासाठी वेगवेगळ्या देशातील काही चिकित्सक विचार करणाऱ्या महापुरुषांनी जगाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे. अशाच विचारावर काम करणारे महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक तात्यासाहेब ज्योतीराव फुले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतातील गौतम बुद्धांच्या विचाराची ज्योत भारतात पुन्हा रुजवली. छत्रपती राजे शिवराय यांच्या विचाराने जगणारा समाज पुन्हा उभा केला. पुरोहितांनी निर्माण केलेला धर्मांध उन्माद मोडून काढला. सत्यावर आधारित विचार समाजाला दिला. समाजाला वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची दिशा दिली. अशा महान पुरुषाचा जन्म पुणे येथे ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्या काळात भारतात मनुस्मृतीवर आधारित विचारसरणी रुजवली गेली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला शिक्षण घेता येत नव्हते. केवळ उच्चवर्णीय लोकांना तसेच भट ,पुरोहित वर्गाला शिक्षण मिळत होते. अशा काळात अस्पृश्यांना शिक्षण घेण्याची अलिखित बंदी होती. जातिवादाचा बोलबाला होता. कर्मकांड पराकोटीला पोहचले होते. पुरोहितांनी मागील काळात राजे छत्रपती शिवाजी यांना सुद्धा शूद्र घोषित केले होते म्हणून त्यांना राज्यभिषेक करण्यासाठी सोन्याच्या मोहरा देऊन काशीच्या पुरोहिताला बोलावून राज्याभिषेक करावा लागला होता. इंग्रजांच्या काळात मिशनरींच्या काही शाळा सुरू झालेल्या होत्या. त्या सुद्धा सर्वसामान्य लोकांसाठी खुल्या नव्हत्या. मिशनरी शाळांचा उद्देश स्वधर्माचा प्रचार करणे हा होता. पुण्यामध्ये महात्मा फुलेंना लहानपणी स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत त शिक्षण घ्यावे लागले. लिजिट साहेब या ख्रिश्चन साहेबाच्या शिफारशीने व मुंशी बेग यांच्या गोविंद रावांना सांगितल्यावर शिक्षण पूर्ण झाले. पुण्यामध्ये मित्राच्या लग्नाच्या वराती मधून महात्मा फुले यांना बाहेर काढल्यामुळे पुण्यामध्ये असलेली जातीयता लक्षात आली. समाजाचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की समाजात शूद्र, अतिशूद्र मानण्याच्या प्रथा आहेत. निसर्गात एकाच पद्धतीने मानवाचा जन्म होतो तरी माणसांमध्ये भेद केला जात होता. महात्मा फुले यांनी इंग्रजी शाळेत असताना विदेशातील मार्टिन ल्युथर व थॉमस पेन या विचारवंताच्या पुस्तकांचा अभ्यास केला. भारतात मात्र जाती जातींच्या भिंती उभ्या राहिलेल्या होत्या. मानवतेचा पाया ढासळलेला होता. महिलेला तर समानतेमध्ये कुठेच स्थान नव्हते. समाजाचा अभ्यास केल्यावर त्यांना असे लक्षात आले की महिला कर्मठ रुढीच्या बळी पडल्या आहेत. महात्मा फुलेंनी भारताचा प्राचीन इतिहास अभ्यासला त्यामध्ये हिरण्यकश्यपू हया महानायकाला आर्यांनी राक्षस संबोधले होते. बळीराजावर अन्याय झालेला होता. शेतीला सुगीचे दिवस आणणारा बळीराजा याला कपटाने मारल्याचे इतिहासातून लक्षात आले. खंडेराव हा मूळ भारतीयांचा आदर्श होता. राजे छत्रपती शिवाजी यांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते. अशा राजाची शिवजयंती साजरी करण्याचे पहिले काम रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून महात्मा फुले यांनी केले. गुलामीच्या जाच्यात खितपत पडलेल्या महिलांना बाहेर काढण्याचे काम महात्मा फुलेंनी मुलींसाठी १८४८ ला पुण्यात भिडे वाड्यात केले. शिक्षण हेच कर्मकांडातून मुक्त होण्याचे साधन आहे हे त्यांनी त्याकाळी ओळखले. भारतात सर्वसामान्यांसाठी म्हणजे बहुजनांसाठी त्यात कुणीही असो त्यांच्यासाठी एकूण पुणे व त्या परिसरात १८ शाळा सुरू केल्या. महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शाळांना काही पुरोहित वर्गाने विरोध केला. शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक मिळू दिला नाही. महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिकवून शिक्षिका केले. फातिमा शेख, मुक्ता साळवे अशा प्रगल्भ विचाराच्या मुली महात्मा फुलेंच्या शाळेत शिक्षण घेऊन पुढे आल्या. फातिमा शेख ही सुद्धा पुढे शाळेची शिक्षिका बनली. महात्मा फुले हे मानवतावादी विचाराचे नायक होते. आपण मानव असून एकमेकांमध्ये समानता आणू शकत नाही याची त्यांना खंत होती. समाजातील अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम मनुस्मृतीच्या विचाराने चालणाऱ्या प्रथांवर विचाराने, लेखणीने प्रहार केला. समाज प्रगल्भ होण्यासाठी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. पुरोहितांची शोषण करण्याची पद्धत आपल्या विचाराने मोडीत काढली. महात्मा फुलेंनी देशाला प्रबोधनाची मशाल दिली. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले या शील संपन्न, चारित्र्यवान, निर्भीड, निस्वार्थी, दानशूर जोडप्याने चिकित्सक विचार दिला. स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याच गोष्टी केल्या नाही. संपूर्ण आयुष्य समाजासाठी, देशासाठी वाहिले. आज समाजाची शैक्षणिक सामाजिक आर्थिक प्रगती दिसते आहे ती महात्मा फुले यांनी लावलेल्या शिक्षणाच्या गुढीने झालेली आहे. महात्मा फुले यांनी शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. त्यांनी केलेल्या सेंद्रिय शेतीबद्दल इजराइल देशाने बोध घेऊन कमी पाण्यावर शेती विकसित केली. महात्मा फुले यांचा विचार हा सत्याचा विचार होता. जे बोलाल ते सत्य बोला. खोटे बोलू नका. त्यांचे विचार मानव मुक्तीचे विचार होते. कोणत्या समाजावर, माणसांवर अन्याय करू नका. सर्व निर्मिकाची लेकरे आहेत, प्रेमाने, बंधुतेने रहा हा मौलिक विचार महात्मा फुलेंनी दिला. जग प्रबोधनाच्या विचारावर चालत आहे. आपला देश या विचारावर चालावा ही अपेक्षा महात्मा फुलेंची होती. आपल्या शत्रूंवर प्रेम करणारा करुणेचा सागर महात्मा फुले होते. सत्याच्या विचारासाठी खोट्या प्रलोभनांना तात्यासाहेब बळी पडले नाही. कर्मठ समाजाकडून भरपूर त्रास झाला परंतु सत्याचे विचार रुजविण्यात महात्मा फुले यशस्वी झाले. महात्मा फुले यांच्या लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्यामुळे अनेक लोकांना भारतरत्न हे किताब मिळाले. भारतरत्न च्या किताबा पेक्षा विश्वरत्न शोभेल असे महान काम तात्यासाहेब महात्मा फुले यांनी केलेले आहे. त्यांना कुणाच्या किताबाची गरज नाही. तात्यासाहेब महात्मा फुलेंनी दिलेला चिकित्सक, विवेकी, सत्यशोधक विचार हाच भारताला महान बनवू शकतो. आजही भौतिकशास्त्रात संशोधन करणाराची वानवा भारताला भासत आहे. कारण भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करण्याची वृत्ती वाढू दिली जात नाही. भारतात असलेल्या सर्वात जास्त शेतकरी वर्गाची दुर्दशा भयानक आहे. त्यामुळे महात्मा फुलेंनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ शेतकऱ्यांसाठी लिहिलेला आहे. जगाचा पोशिंदा कर्जबाजारी, लाचार झालेला आहे. त्याने पिकवलेला माल भांडवलदार, व्यापारी विकून अमाप पैसा कमवीत आहे. शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. सरकार भारतात विकणारा माल विदेशात न पाठवता. विदेशातून तोच माल आयात करीत आहे. शेतकऱ्याला शेतीसाठी बी , बियाणे, खते, औषधी चढ्या भावाने घ्यावी लागते. शासनाचे त्यावर काहीच नियंत्रण नाही. त्यामुळे शेती परवडत नाही. महात्मा फुले यांचे विचार देशाला तारक ठरणारे आहे. अशा थोर महात्म्याच्या स्मृतिदिनाला शिक्षक सन्मान दिवस तथा शिक्षक दिन म्हणून साजरा झाला पाहिजे. तात्या साहेबांनी शिक्षणाची मोकळी केली नसती तर आज सुद्धा भारतात बहुजन शिक्षण घेऊ शकले नसते. आज पुन्हा भारताला उच्च शिक्षणासाठी अमाप पैसा लागत असल्याने बहुजन उच्च शिक्षणात भविष्यात दिसणार नाही अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. सर्वसामान्य व्यक्ती पैसा भरल्याशिवाय नोकरीला लागत नाही ही मोठी दुरावस्था झाली आहे. सर न्यायाधीशांमध्ये मागासवर्गीय न्यायाधीश सापडणे कठीण झाले आहे. लोकसेवा आयोगाविना सचिवांची भरती होणे. हे बहुजनांवर अन्याय करण्यासारखे आहे. प्रगत भारत, प्रगल्भ भारत घडवायचा असेल तर महात्मा फुलेंचे विचार जीवनात रुजवावे लागतील तरच खऱ्या अर्थाने आम्ही सत्यशोधक होऊ शकतो.. तात्यासाहेब महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाला अभिवादन
अतिथी संपादक
एस.एच.भवरे
मराठी लाईव्ह न्युज चॅनल अमळनेर

