“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट”  शिवसेना उभाठा गटाचे खासदार संजय राऊत यांची युती शासनावर टीकास्त्र  अमळनेेर येथे शिवसेना मेळावा संपन्न
1 min read

“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट” शिवसेना उभाठा गटाचे खासदार संजय राऊत यांची युती शासनावर टीकास्त्र अमळनेेर येथे शिवसेना मेळावा संपन्न

Loading

“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट”

शिवसेना उभाठा गटाचे खासदार संजय राऊत यांची युती शासनावर टीकास्त्र

अमळनेेर येथे शिवसेना मेळावा संपन्न

  महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती..

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
सर्वत्र अत्याचाराच्या घटना घडत असताना कायदा शिल्लक नाही. कारण सरकारच बेकायदेशीर आहे, ते काय धाक दाखवणार ? महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून महाराष्ट्रात सात दिवसात जे बलात्कार झाले याचे खापर गृहमंत्री व मुख्यमंत्री विरोधकांवर फोडत आहेत. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाला हे विरोधकांचं कारस्थान म्हणतात. यामुळे महायुती सरकारला लोकशाही मार्गाने फासावर लटकवायचे आहे असे वक्तव्य महाराष्ट्राची बुलंद तोफ, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शुक्रवार, दि. २३ रोजी अमळनेेर येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन मराठा मंगल कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर शिवसेना नेत्या ॲड. ललिता पाटील, विष्णू भंगाळे, शुभांगीताई पाटील, अस्मिता पाटील, महानंदा पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस तथा वरिष्ठ नेत्या तिलोत्तमाताई पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्याम पाटील, उद्योजक प्रशांत निकम तसेच विविध विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ॲड. ललिता पाटील यांचेसह मंचावरील मान्यवरांच्या हस्ते खासदार संजय राऊत यांचे हार घालून स्वागत करण्यात आले. ॲड. ललिता पाटील यांनी निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा मुजरा करत प्रास्ताविक केले. देशभरातील महिला अत्याचाराच्या घटनांवर प्रकाश टाकत सुरक्षेचं काय ? असा सवाल केला. महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार असो आम्ही एकजुटीने निवडून आणू असा विश्वास दिला.
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, उमेदवार हा आघाडीतील तिघांनी बसून निश्चित करायचा आहे. अमळनेर हे तुळशी वृंदावन सारखे असून या तुळशी वृंदावनात गांजा रुपी अशी रोपे उगवली. आघाडीत एकही गद्दार दिसणार नाही. याची तयारी केली आहे. मोदी व शहा हे गुजरातचे दोन व्यापारी महाराष्ट्राला लुटत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात ला नेतात. बाहेरचे येऊन महाराष्ट्राचे तुकडे करु पाहतात तर..मराठी माणसानेही वेळप्रसंगी मराठी पण विसरावे. फडणवीस म्हणजे आगलाव्या माणूस अशी उपमा देत मराठ्यांचे शिवराज्य ज्या पेशव्यांनी बुडवले त्याचे ते वंशज आहेत. पेशव्यांनी घाशीराम कोतवाल नेमले व लूट करण्याचे काम केले. तेच ते करीत आहे. ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना फोडली, ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला त्यांचेसमोर पक्ष तुमचा नाही सांगता. मोदी, शहा महाराष्ट्रात बाळासाहेबांना वंदन करण्याचे फक्त नाटक करतात. निवडणूक आयोग दबावात काम करीत आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे मात्र सुप्रीम कोर्ट वेळखाऊ पणा करीत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी ४०० पार ला ब्रेक लावण्याचे काम महाराष्ट्राने केले. आम्हाला तुरुंगात टाकले तरी आम्ही झुकलो नाही.. जे झुकले त्यांनी छत्रपतींचे नाव घेऊ नये. महाराष्ट्रात रोजगार नाही मुंबईची अवस्था भिकारी करुन टाकली. शेतकरी आत्महत्या वाढल्या. विद्यार्थी, महिला सुखी नाहीत. मोदी, शहा राज्यकर्ते नसून व्यापारी आहेत. यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या लोकांनी तयार राहावे असे आवाहन केले. कार्यक्रमास असंख्य शिवसैनिक महिला, पुरुष उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, प्रदेश सरचिटणीस तथा वरिष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील ,सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी के. डी. पाटील, बी. के. सूर्यवंशी, मा.नगरसेवक मनोज पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, चंद्रशेखर भावसार, नितीन निळे, नाना ठाकूर, साहेबराव पवार, विजय पाटील,पराग पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *