Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
महाराष्ट्र विशेष बातमी

महिला पत्रकारितेच्या संवर्धनाचा संकल्प; लातूर अधिवेशनाचा उत्साहात समारोप! सत्तेला प्रश्न विचारा, तंत्रज्ञान स्वीकारा; कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करा! , डॉ. कविता राणे, प्रा. डॉ. आशा देशपांडे यांचे परखड मार्गदर्शन; महिला पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटी

ईश्वर रामदास महाजन 25 Oct 2026, 15:48 1K views अपडेटेड 28 Oct 2026, 18:45 18 min read
🔧 साधने:
महिला पत्रकारितेच्या संवर्धनाचा संकल्प; लातूर अधिवेशनाचा उत्साहात समारोप!    सत्तेला प्रश्न विचारा, तंत्रज्ञान स्वीकारा; कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करा!  ,  डॉ. कविता राणे, प्रा. डॉ. आशा देशपांडे यांचे परखड मार्गदर्शन; महिला पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटी

लातूर, प्रतिनिधी :

महिला पत्रकारितेला नवी दिशा, प्रतिष्ठा आणि बळ देण्यासह महिला पत्रकारांचे प्रश्न, सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन, व्यावसायिक प्रगती आणि नेतृत्वक्षमता यांना केंद्रस्थानी ठेवून लातूर येथे आयोजित व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या महिला विंगच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाचा उत्साहात समारोप झाला. अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात प्रा. डॉ. आशा देशपांडे, डॉ. कविता राणे, उद्योजक अभियंता धर्मवीर भारती आणि विभागीय प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन करून महिला पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. या अधिवेशनातून महिला पत्रकारितेच्या संवर्धनाचा, संघटनात्मक विस्ताराचा आणि बदलत्या माध्यमविश्वात महिलांना सक्षम बनविण्याचा संकल्प करण्यात आला.

औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स येथे पार पडलेल्या या अधिवेशनात महिला पत्रकारितेसमोरील आव्हाने, लोकशाहीतील माध्यमांची भूमिका, सत्तेला प्रश्न विचारण्याचे महत्त्व, डिजिटल पत्रकारिता, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आर्थिक स्वावलंबन, समान संधी आणि पुरुषप्रधान मानसिकतेचा सामना अशा विविध विषयांवर विचारमंथन झाले. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला पत्रकारांच्या सहभागामुळे अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सत्तेला प्रश्न विचारणे म्हणजे पक्षविरोध नव्हे!

अधिवेशनातील मार्गदर्शनात डॉ. कविता राणे यांनी लोकशाही व्यवस्था आणि पत्रकारितेच्या जबाबदारीवर परखड भाष्य केले. पत्रकारितेचे काम केवळ घटनांची माहिती देणे नसून, लोकशाही व्यवस्थेला प्रश्न विचारणे आणि जनतेच्या प्रश्नांचा जाब मागणे ही तिची मूलभूत जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज व्यवस्थेला प्रश्न विचारले जात नाहीत. सत्तेला प्रश्न विचारला की त्याचा अर्थ सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असल्याचा काढला जातो. त्यातून विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करून मूळ प्रश्न बाजूला सारला जातो. वास्तविक, पत्रकाराचा प्रश्न एखाद्या राजकीय पक्षाला नसतो, तर लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेल्या आणि चालविल्या जाणाऱ्या व्यवस्थेला असतो. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी ते टोलवले जात असतील, तर ही पत्रकारितेसाठी चिंतेची बाब आहे, असे डॉ. राणे यांनी नमूद केले.

सरकारी निर्णयांचे परिणाम, व्यवस्थेतील त्रुटी आणि नागरिकांच्या समस्या यांबाबत प्रश्न उपस्थित करणे हा पत्रकारितेचा अधिकार आणि कर्तव्य आहे. प्रश्नाच्या आशयापेक्षा पत्रकाराचा कथित राजकीय कल चर्चेचा विषय बनवून जनतेच्या प्रश्नांना बगल दिली जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या वेगाच्या स्पर्धेत आशय, संदर्भ आणि सखोलता हरवू नये, असा इशाराही त्यांनी दिला. अवघ्या ४० सेकंदांच्या बातमी सादरीकरणाला महत्त्व देताना विषयाचे गांभीर्य आणि वस्तुस्थिती दुर्लक्षित होण्याचा धोका आहे. सोशल मीडियावरील वेगवान माहिती आणि व्यावसायिक पत्रकारिता यांतील फरक लक्षात घेऊन माहितीची सत्यता पडताळणे, संबंधितांची बाजू जाणून घेणे आणि वस्तुनिष्ठ बातमी देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल तंत्रज्ञान आणि एआयचा स्वीकार करताना पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपली पाहिजेत. मराठी भाषेवरील प्रभुत्वासोबत इंग्रजीचे ज्ञान, नवे तांत्रिक कौशल्य आणि सतत शिकण्याची तयारी विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पत्रकारांनी टीकेमुळे निराश न होता नवे मार्ग शोधावेत आणि अधिक प्रगल्भ, अभ्यासपूर्ण व निर्भीड पत्रकारिता करावी, असा संदेश त्यांनी दिला.

पुरुषी मानसिकतेला कर्तृत्वातून उत्तर द्या!

महिला पत्रकारितेतील आव्हानांचा वेध घेताना प्रा. डॉ. आशा देशपांडे यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि महिलांच्या व्यावसायिक सक्षमीकरणावर भर दिला. काळ बदलला, माध्यमांचे स्वरूप बदलले आणि महिलांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या; मात्र पत्रकारितेतील सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग समान प्रमाणात वाढलेला नाही, असे त्यांनी नमूद केले.

विशेषतः गुन्हेगारीसारख्या आव्हानात्मक बीटवर महिला पत्रकारांची संख्या वाढण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आव्हाने आहेत म्हणून मागे राहण्यापेक्षा ती स्वीकारून पुढे जाण्याची मानसिकता महिलांनी विकसित करावी. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून बदलत्या माध्यमविश्वातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांच्या क्षमतेविषयी असलेले पूर्वग्रह आणि पुरुषप्रधान मानसिकतेचा सामना करताना खचून न जाता आपल्या कामाची गुणवत्ता, अभ्यास, निर्भीड भूमिका आणि व्यावसायिक निष्ठेच्या बळावर स्वतःला सिद्ध करावे. टीकेला केवळ शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वातून आणि यशातून उत्तर देणे अधिक प्रभावी ठरते, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

पत्रकारितेकडे केवळ आवड किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून न पाहता सन्मानजनक आणि सक्षम व्यावसायिक क्षेत्र म्हणून पाहिले पाहिजे. महिलांना आव्हानात्मक बीटवर काम करण्याची संधी, आवश्यक प्रशिक्षण, योग्य वेतन आणि प्रगतीसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माध्यम संस्थांचीही आहे. समान संधी आणि संस्थात्मक पाठबळ मिळाल्यास महिला पत्रकारितेचा आवाका अधिक व्यापक होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

आर्थिक स्वावलंबनातून महिलांना सक्षम करण्याचा संदेश

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसातील विशेष आकर्षण ठरलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार आणि उद्योजिका राजश्री पाटील यांच्या प्रकट मुलाखतींतून महिला सक्षमीकरणाचे विविध पैलू उलगडले.

सुनंदाताई पवार यांच्या मुलाखतीत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आधुनिक शेती, आरोग्य आणि ग्रामीण विकास या विषयांवर चर्चा झाली. महिलांना केवळ मदत देण्यापेक्षा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. रोजगार, कौशल्यविकास आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.

शारदा अकॅडमीच्या माध्यमातून मुलींना पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमातून ८३२ मुलींना पोलीस सेवेत जाण्यासाठी तयार करण्यात आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. गरजू मुलींचे शिक्षण, ग्रामीण महिलांना व्यवसायाशी जोडणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक परवडणारी बनविण्याचे प्रयत्नही त्यांनी मांडले. महिला पत्रकारांनी व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबत आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या राजश्री पाटील यांच्या प्रकट मुलाखतीत महिलांची स्वतंत्र ओळख, आर्थिक साक्षरता, कुटुंबाचे पाठबळ आणि नेतृत्वाच्या संधी या विषयांवर विचारमंथन झाले. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वास आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी पती अनंत पाटील, आई, आजी आणि कुटुंबीयांच्या पाठबळाचा आवर्जून उल्लेख केला.

गोदावरी बँकेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून १६ हजार बचत गटांशी जोडलेल्या सुमारे साडेचार लाख महिलांच्या रोजगार आणि सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली. महिलांना आर्थिक मदतीसोबतच आर्थिक व्यवहारांचे ज्ञान, निर्णयक्षमता आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा आत्मविश्वास मिळणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षणातून मिळालेल्या नेतृत्वाच्या संधींचा उपयोग करून महिलांनी आपली क्षमता सिद्ध करावी, असेही त्यांनी सांगितले.

महिला पत्रकारितेला संघटनात्मक बळ

अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात डॉ. आशा देशपांडे, डॉ. कविता राणे, उद्योजक अभियंता धर्मवीर भारती आणि विभागीय प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांनी महिला पत्रकारांना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महिला पत्रकारांचे संघटन मजबूत करणे, त्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाला व्यापक मान्यता मिळवून देणे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय समन्वयक आणि राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी समारोपीय भाषणात महिला विंगचे महत्त्व विशद केले. महिला पत्रकारांचे प्रश्न केवळ अधिवेशनापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी, सुरक्षिततेसाठी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी संघटनेने सातत्याने कार्यरत राहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. महिलांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ, संघटनात्मक पाठबळ आणि नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देण्यात महिला विंगची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

महाराष्ट्रातील महिला विंगच्या विभागीय अध्यक्ष रोशनी भैस यांच्यासह पाच विभागीय अध्यक्ष आणि राज्यातील ३६ जिल्हाध्यक्षांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे महिला विंगच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळणार असून, जिल्हा आणि विभागीय स्तरावर महिला पत्रकारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटित व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

नियोजनबद्ध संयोजनामुळे अधिवेशन यशस्वी

अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय संघटक तथा सर्व विंगप्रमुख रश्मी मारवाडी यांनी उत्कृष्ट संयोजन केले. आंतरराष्ट्रीय समन्वयक स्नेहा पाटील, महिला प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मी वाडेकर, लातूर जिल्हाध्यक्ष मेघना पाटील, अहिल्या कस्पटे आणि अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका सुनंदाताई पवार, प्रसिद्ध वृत्तनिवेदिका व पत्रकार फराह खान आणि लातूर जिल्हा परिषद सदस्या आशा भिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, राष्ट्रीय संघटक रश्मी मारवाडी, उपाध्यक्ष संगम कोटलवार आणि महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडिया वर्ल्ड या मुखपत्राच्या महिला पत्रकार अधिवेशन विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. महिला पत्रकारांचा संघर्ष, त्यांचे योगदान आणि माध्यमविश्वातील वाटचाल यांना या विशेषांकातून स्थान देण्यात आले.

अधिवेशनाचे सूत्रसंचालन व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. राज्यभरातून आलेल्या महिला पत्रकार, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या सहभागामुळे दोन्ही दिवसांचे वातावरण उत्साहपूर्ण राहिले.

निर्भीड पत्रकारिता आणि महिला सक्षमीकरणाचा निर्धार

लातूरच्या या दोन दिवसीय अधिवेशनाने महिला पत्रकारितेचा प्रश्न केवळ महिलांच्या वैयक्तिक संघर्षापुरता मर्यादित नसल्याचे अधोरेखित केले. समान संधी, आर्थिक स्थैर्य, सुरक्षितता, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, आव्हानात्मक बीटवर काम करण्याची संधी आणि माध्यम संस्थांचे सकारात्मक सहकार्य या बाबी महिला पत्रकारितेच्या विकासासाठी आवश्यक आहेत.

त्याचवेळी सत्तेला निर्भीडपणे प्रश्न विचारणे, राजकीय पूर्वग्रहांपासून दूर राहणे, बातम्यांची सत्यता जपणे आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही पत्रकारितेची मूलभूत मूल्ये अधिक दृढ करण्याचा संदेशही अधिवेशनातून देण्यात आला.

महिला पत्रकारांना सक्षम व्यासपीठ, संघटनात्मक पाठबळ आणि नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देत निर्भीड, जबाबदार आणि प्रगल्भ पत्रकारितेचा विस्तार करण्याचा संकल्प या अधिवेशनाच्या समारोपातून पुढे आला. लातूरमधील हे अधिवेशन महिला पत्रकारांच्या एकजुटीला बळ देणारे आणि राज्यातील महिला पत्रकारितेच्या आगामी वाटचालीसाठी प्रेरणादायी पाऊल ठरले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा निर्धार मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी गावोगावी, वॉर्डावॉर्डात जनजागृती करा; जिल्हा समन्वयक हिम्मत सिंह यांचे आवाहन पुढील बातमी →अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या चरणी भक्तिरसात न्हाऊन निघाली भजनांजली! प.पू. ह.भ.प. प्रसाद महाराजांच्या आशीर्वादाने तीन दिवसीय तीर्थयात्रा उत्साहात संपन्न;

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!