अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा निर्धार मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी गावोगावी, वॉर्डावॉर्डात जनजागृती करा; जिल्हा समन्वयक हिम्मत सिंह यांचे आवाहन

अमळनेर, प्रतिनिधी :
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाची माहिती देण्यासाठी आणि अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने अमळनेर येथील टाऊन हॉलमध्ये गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जळगाव जिल्हा समन्वयक हिम्मत सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. मतदार यादीतील त्रुटी शोधून त्या दूर करण्यासाठी गावोगावी आणि वॉर्डावॉर्डात जाऊन जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दला पाटील, जळगाव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सुलोचना वाघ, अॅड. रजक शेख, कृषिभूषण सुरेश पीरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील आणि माजी काँग्रेस शहराध्यक्ष लोटन चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी महाराष्ट्रासह देशातील सद्य राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर विविध वक्त्यांनी आपली मते मांडली. मतचोरीचे आरोप, निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर), बेरोजगारी, पेपरफुटीची प्रकरणे, एसआयआर रद्द करण्याची मागणी, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आणि महाराष्ट्रातील दुष्काळ अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
डॉ. पूनम सोनवणे यांचा सत्कार
अमळनेर शहर महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष डॉ. पूनम सोनवणे यांचा जिल्हा समन्वयक हिम्मत सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या नियुक्तीमुळे महिला संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
राहुल गांधी यांच्या कार्याची माहिती
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम भाग) अध्यक्ष अँड. अविनाश भालेराव यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या परिस्थितीत होत असलेले बदल आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाकडून केल्या जाणाऱ्या कामांची सविस्तर माहिती दिली. तसेच १ नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त काँग्रेसप्रेमींनी दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
मतदार यादीच्या पडताळणीवर भर
प्रमुख पाहुणे हिम्मत सिंह यांनी मतचोरीचे आरोप आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाची अंमलबजावणी करताना प्रत्येक गावात आणि प्रत्येक वॉर्डात जाऊन मतदार यादीची तपासणी करावी, यादीत कोणत्या मतदाराचे नाव नाही किंवा कोणत्या नोंदीत त्रुटी आहेत, याचा शोध घेऊन संबंधित पातळीवर पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पक्षाचे काम करतांना राहुल गांधी यांच्या ‘डरो मत’ या संदेशाचे पालन करून निर्भयपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ईव्हीएमसंदर्भातील मुद्दे राहुल गांधी टप्प्याटप्प्याने जनतेसमोर आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन गजेंद्र साळुंखे यांनी केले. या सभेला ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, प्रताप पाटील, भगवान संदान शिव, दिलीप साहेबराव पाटील, तुषार संधानशिव, के. व्ही. पाटील, ताराचंद सूर्यवंशी, डॉ. रवींद्र पाटील, गोकुळ पाटील, प्रवीण पाटील, सईद तेली, राजू चंडाले, सुभाष शिंदे, पितांबर पाटील, आरिफ बागवान, तौसीब तेली, रोहिदास पाटील, श्रीराम पाटील, राकेश पवार, पी. वाय. पाटील, बन्सीलाल भागवत, अॅड. गिरीश पाटील, सादर बागवान आणि उमेश संदानशिव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाच्या माध्यमातून मतदार यादीची पडताळणी, मतदारांच्या हक्कांविषयी जागरूकता आणि संघटनात्मक कामाला गती देण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...
महिला पत्रकारितेच्या संवर्धनाचा संकल्प; लातूर अधिवेशनाचा उत्...