टीईटी अन्यायग्रस्त शिक्षकांना शासनाने न्याय द्यावा सर्व शिक्षक संघटनांची एकमुखी मागणी

जळगाव प्रतिनिधी
टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) प्रकरणात प्रामाणिकपणे परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर अन्याय होऊ नये, तसेच दोषींवरील कारवाई आणि प्रामाणिक शिक्षकांच्या हिताचे संरक्षण यामध्ये स्पष्ट भेद करून शासनाने अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.
शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी, जळगाव येथे टीईटी अन्यायग्रस्त शिक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष श्री. जे. के. पाटील शैक्षणिक व्यासपिठाचे सचिव शिक्षक नेते श्री एस डी भिरुड सरयांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीस जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष श्री. आर. एच. बाविस्कर, संभाजी आप्पा पाटील, जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष श्री. ललित चौधरी, सरचिटणीस श्री. आर. ए. पाटील, जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, श्री. एस. के. पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष श्री. शैलेश राणे, संचालक श्री. भावेश अहिरराव, श्री. सचिन पाटील, श्री. डिगंबर पाटील, श्री. डी ए पाटील, डॉ. संजय निकम, श्री. भगतसिंग पाटील, भुसावळ माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष श्री. नरेंद्र दोडके, यावल पतपेढीचे अध्यक्ष श्री. किरण झांबरे, भुसावळ माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष श्री. गोपाळ पाटील, संचालक श्री. गोपाळ महाजन, तज्ज्ञ संचालक श्री.अजित पाटील,नितीन महाजन,गिरीश भंगाळे,आतिश मेघे नितीन पाटील,संभाजी अस्वार गणेश बच्छाव ,संदीप भंगाळे तसेच औरंगाबाद खंडपीठातील विधी तज्ज्ञ ॲड. जितेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय होऊ नये
बैठकीचे प्रास्ताविक टीईटी अन्यायग्रस्त शिक्षक श्री. प्रवीण धुंदले यांनी केले. सन २०१८-१९ च्या टीईटी परीक्षेसंदर्भातील प्रकरणात काही मोजक्या व्यक्तींशी संबंधित कथित गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाही परिणामांना सामोरे जावे लागत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
काही शिक्षकांनी प्रामाणिकपणे परीक्षा देऊन पात्रता प्रमाणपत्र मिळविले असतानाही संबंधित न्यायालयीन निर्णयामुळे त्यांच्या प्रमाणपत्रांवर परिणाम झाल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. गैरप्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यास हरकत नसली, तरी त्याचा फटका प्रामाणिक शिक्षकांना बसू नये. प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार करून पात्र आणि प्रामाणिक शिक्षकांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ॲड. जितेंद्र पाटील यांचे कायदेशीर मार्गदर्शन
बैठकीत औरंगाबाद खंडपीठातील विधी तज्ज्ञ ॲड. जितेंद्र पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना टीईटी प्रकरणासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन केले. शिक्षकांनी आपल्या विविध शंका आणि अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. तसेच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल का, स्वतंत्र रिट याचिका दाखल करण्याची शक्यता आहे का आणि पुढील कायदेशीर लढा कोणत्या दिशेने न्यावा, यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबींचा अभ्यास करून योग्य मार्गाने पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
सर्व संघटना एकत्रितपणे लढा उभारणार
या प्रश्नावर केवळ एखाद्या संघटनेने नव्हे, तर सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता बैठकीत व्यक्त करण्यात आली. शासनाला एकत्रित निवेदन सादर करून अन्यायग्रस्त शिक्षकांची बाजू प्रभावीपणे मांडण्याचा निर्णय घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस माध्यमिक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटना, कलाध्यापक संघटना आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
**प्रामाणिक शिक्षकांच्या सेवेला आणि त्यांच्या भविष्याला बाधा येऊ नये, प्रत्येक प्रकरणात न्याय्य विचार व्हावा आणि दोषींवरील कारवाई करताना निरपराध शिक्षकांवर अन्याय होऊ नये, हीच या बैठकीतून व्यक्त झालेली सर्व संघटनांची प्रमुख भूमिका होती. टीईटी अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व संघटना एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी ला...
डि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्...
अमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागा...
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...