नांद्री विकास मंचची प्रेरणादायी वाटचाल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

अमळनेर प्रतिनिधी(दिनकर पवार)
रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेल्या नांद्री येथील तरुण सुपुत्रांनी आपल्या जन्मभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक सुंदर पुढाकार घेतला आहे. अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर एकत्र येत या तरुणांनी 'नांद्री विकास मंच'ची स्थापना करत गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडला.
याच संकल्पाचा भाग म्हणून, देशात सुरू असलेल्या 'सेवा सप्ताहा'चे औचित्य साधून ३ ऑक्टोबर रोजी मंचाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद शाळा, नांद्री येथील सुमारे ४० गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शालेय उपयुक्त साहित्य आणि खाऊचे वाटप केले.शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा
अशी भावना व्यक्त करताना मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही याच शाळेत घडलो आणि आज बाहेरच्या जगात उभे आहोत. लहानपणी शिक्षकांनी दिलेली शिकवण होती की, “आपण किती शिकलो यापेक्षा आपल्या शिक्षणाचा समाजाला किती उपयोग होतो हे महत्त्वाचे आहे. त्याच विचाराने प्रेरीत होऊन आम्ही गावातील शेती, पाणी, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने काम करणार आहोत."
यापुढे जलसंधारण आणि ग्रामविकासाचा ठोस निर्धार करत
गावात निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मंचाने पुढचे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. येत्या काळात सीएसआर फंड, लोकवर्गणी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून नाला खोलीकरण व पाणलोट बंधारे बांधण्याचे उपक्रम राबवणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
धावपळीच्या आणि स्वार्थी युगात आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकत्र आलेल्या या तरुणांचा हा उपक्रम केवळ स्तुत्यच नाही, तर इतर गावांतील तरुणांसाठीही एक नवा आदर्श आणि प्रेरणा देणारा ठरत आहे.
यांची होती उपस्थिती
नंदू नाईक, मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे, शाळा समिती अध्यक्ष राहुल ठाकूर, माजी उपसरपंच सुनील चौधरी, सुखदेव पाटील, संदीप रोकडे, हिम्मत चौधरी गुरुजी, उमेश ठाकरे, माजी सरपंच स्वाती चौधरी, देवेंद्र चौधरी, उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र मराठे, नांद्री विकास मंचचे अध्यक्ष योगेश कुमावत, ज्येष्ठ मार्गदर्शक भानुदास चौधरी, शरद ठाकरे, हिरालाल माळी, नंदलाल चौधरी, सचिव तेजपाल ठाकूर, लक्ष्मण महाजन, बापूजी नाईक, महाजन ताई, भारती मोरे मॅडम,
व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , ...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...