पंचवटीतील गोठ्याला भीषण आग; १८ गाईंचे प्राण वाचविणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

नाशिक, प्रतिनिधी : पंचवटी परिसरातील एका गोठ्याला २८ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने गोठ्यातील जनावरांचा जीव धोक्यात आला होता. या संकटाच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी धाव घेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव आहेर आणि पशुधन पर्यवेक्षक डॉ. दिपक पाटील यांनी केलेल्या धाडसी प्रयत्नांमुळे अनेक मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविण्यात यश आले.
या आगीत १८ गाई सुमारे ६० टक्के भाजल्या, तर दुर्दैवाने दोन गाईंचा मृत्यू झाला. मात्र, आगीच्या धुराचे साम्राज्य आणि ज्वाळांचा धोका असतानाही डॉ. वैभव आहेर व डॉ. दिपक पाटील यांनी प्रसंगावधान राखत गोठ्यात अडकलेल्या जनावरांची सुटका केली. त्यानंतर जखमी जनावरांवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या तत्परतेमुळे उर्वरित गाईंना सुरक्षित वाचविणे शक्य झाले.
धाडस आणि कर्तव्याची दखल
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नाशिक शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री. बाबुलाल भाऊ तांबडे यांच्या वतीने डॉ. वैभव आहेर आणि डॉ. दिपक पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या धाडसाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सत्कारप्रसंगी बोलताना बाबुलाल भाऊ तांबडे म्हणाले की, “संकटाच्या काळात केवळ मूक प्रेक्षक न बनता मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली, ते माणुसकी आणि शासकीय कर्तव्याचे उत्तम उदाहरण आहे. डॉ. वैभव आहेर व डॉ. दिपक पाटील यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष सेवकांचा सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या या धाडसी कार्याचा नाशिककरांना अभिमान आहे.”
“कर्तव्य आणि माणुसकीचा धर्म निभावला”
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. दिपक पाटील यांनी सांगितले की, “आम्ही केवळ आमचे कर्तव्य आणि माणुसकीचा धर्म निभावला. या संपूर्ण प्रसंगात माझे गुरुजन डॉ. वैभव आहेर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. बाबुलाल भाऊ तांबडे यांच्यासारख्या संवेदनशील नेतृत्वाने आमच्या कार्याची प्रत्यक्ष दखल घेऊन दिलेली कौतुकाची थाप समाजाप्रती असलेली आमची जबाबदारी आणि वैद्यकीय सेवा देण्याची ऊर्जा आणखी वाढवणारी आहे.”
आगीसारख्या अत्यंत धोकादायक परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचून जनावरांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांच्यावर उपचार सुरू करणे आणि पुढील वैद्यकीय काळजी घेणे या कामात डॉ. वैभव आहेर व डॉ. दिपक पाटील यांनी बजावलेल्या भूमिकेचे यावेळी कौतुक करण्यात आले.
या सत्कार सोहळ्यास परिसरातील नागरिक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मुक्या प्राण्यांच्या जीवासाठी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या या कार्यामुळे पशुवैद्यकीय सेवेत कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा आदर्श समोर आला आहे.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
एका चिमुकल्या जीवासाठी माणुसकीचा हात पुढे करूया… अन्वीला उपच...
अमळनेर मतदारसंघात आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेतपाणंद ...
लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद म्हणजे मेंदूच्या स्वात...
अभिव्यक्ती मंच, विरारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्व...
आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व - श्...