लोकशाही, संविधान आणि पक्षांतर : तुळशीदास भोयटेंच्या लेखणीचा निर्भीड प्रवास
![]()
लोकशाही, संविधान आणि पक्षांतर : तुळशीदास भोयटेंच्या लेखणीचा निर्भीड प्रवास
—————
काल प्रकाशन झालेलं आणि आज वाचून पूर्ण केलेलं ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोयटे यांचं ‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ हे पुस्तक हातातून खाली ठेवल्यानंतर मनात अनेक विचारांची गर्दी झाली. पुस्तक वाचून पूर्ण झालं, पण त्यातून निर्माण झालेले प्रश्न आणि अस्वस्थ करणारे विचार मात्र अजूनही मनात सुरू आहेत. कारण हे पुस्तक केवळ राजकारणावर भाष्य करत नाही; ते आपल्या लोकशाही व्यवस्थेकडे, संविधानाकडे, राजकीय पक्षांकडे आणि सर्वसामान्य मतदाराच्या विश्वासाकडे पुन्हा एकदा गंभीरपणे पाहायला भाग पाडतं.
तुळशीदास भोयटे हे केवळ ज्येष्ठ पत्रकार नाहीत. गेली तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता करताना त्यांनी अनेक पत्रकार घडविले, अनेकांना दिशा दिली आणि स्वतःच्या तत्त्वमूल्यांशी कोणतीही तडजोड न करता पत्रकारिता कशी करता येते, याचा आदर्श निर्माण केला. माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांसाठी ते एक अवलिया व्यक्तिमत्त्व आहेत. एखाद्या विषयावर राजकीय भाष्य करताना कोणाची भीडभाड ठेवायची नाही, कोणाच्या दबावाला झुकायचं नाही आणि जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणायचं, ही त्यांची पत्रकारितेची भूमिका राहिली आहे.
म्हणूनच ‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ हे पुस्तक वाचताना त्यातील विषय जितका महत्त्वाचा वाटतो, तितकाच त्यामागचा माणूस समजून घेणंही महत्त्वाचं वाटतं. कारण हे लेखन केवळ अभ्यासातून आलेलं नाही; ते अनुभवातून आलेलं आहे. राजकारण जवळून पाहिलेल्या, राजकीय घडामोडींचे अनेक चढ-उतार प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि समाजाच्या नाडीवर बोट ठेवून पत्रकारिता केलेल्या व्यक्तीच्या लेखणीतून आलेलं हे भाष्य आहे.
पुस्तकाचा विषय वरवर पाहता साधा आणि सरळ आहे,पक्षांतर, पक्षफुटी, बंडखोरी आणि सत्तेच्या राजकारणातील बदलती मूल्यव्यवस्था. पण या साध्या वाटणाऱ्या विषयाचा भोयटे यांनी घेतलेला आवाका विलक्षण व्यापक आहे. पक्षाला लागलेली स्वार्थाची कीड, सत्तेसाठी होणारी पक्षफुटी, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा, पैशाचा प्रभाव आणि त्यातून मतदाराच्या विश्वासाला बसणारा धक्का या सगळ्यांचा त्यांनी चिकित्सक वेध घेतला आहे.
अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’नंतर महाराष्ट्राच्या राजकीय लेखनाच्या इतिहासात जर एखाद्या पत्रकाराने राजकारणाच्या अंतरंगावर इतकं प्रभावी आणि निर्भीड भाष्य केलं असेल, तर त्या रांगेत तुळशीदास भोयटे यांचं नाव निश्चितपणे घ्यावं लागेल. ‘सिंहासन’ने राजकारणातील सत्तासंघर्षाचं साहित्यिक चित्र उभं केलं; भोयटे यांनी प्रत्यक्ष राजकीय वास्तव, पत्रकारितेचा अनुभव आणि संविधानिक संदर्भ यांच्या आधारे आजच्या राजकारणाचं चिकित्सक विश्लेषण केलं आहे.
या पुस्तकाची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. ‘ममताची ममता आटली, तृणमूल काँग्रेस फुटली’ अशा शीर्षकातून पश्चिम बंगालच्या राजकारणातील घडामोडींचाही त्यांनी वेध घेतला आहे. महाराष्ट्रात पक्षफुटी म्हटलं की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेनेतील फुटीचा संदर्भ समोर येतो. पण भोयटे यांचा प्रश्न त्यापेक्षा मोठा आहे. शरद पवारांपासून ममता बॅनर्जींपर्यंत पक्षफुटीच्या राजकारणाची विविध रूपं काय आहेत? त्यामागची कारणं कोणती? आणि या फोडाफोडीच्या राजकारणाचा समाजमनावर नेमका काय परिणाम होतो? या प्रश्नांचा त्यांनी सखोल विचार केला आहे.
शरद पवारांपासून एकनाथ शिंदे यांच्यापर्यंतच्या राजकीय घटनांचे संदर्भ देताना त्यांनी पक्षबदलाच्या राजकारणामागील मानसिकता आणि सत्ताकारणाचा अभ्यास केला आहे. हे लेखन कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात उभं राहत नाही. उलट, पक्षफुटीच्या संपूर्ण राजकारणाकडे लोकशाहीच्या व्यापक चौकटीतून पाहण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे हे पुस्तक एखाद्या राजकीय पक्षाचं समर्थन किंवा विरोध करण्यापलीकडे जातं आणि प्रश्न थेट लोकशाहीच्या आरोग्याचा बनतो.
या पुस्तकाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणाचा घेतलेला संदर्भ. हे भाषण अनेकांना परिचित आहे. मात्र आजच्या राजकारणाशी, समाजकारणाशी आणि लोकशाहीच्या वर्तमान स्थितीशी त्याचा संबंध काय आहे, हे तुळशीदास भोयटे यांनी अत्यंत आखीव,रेखीव आणि शास्त्रीय पद्धतीने समोर आणलं आहे. संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नसून त्यामागे लोकशाही, समता, जबाबदारी आणि नैतिकतेची मूल्यव्यवस्था आहे, हे या विवेचनातून प्रकर्षाने जाणवतं.
अध्यक्ष, सभापती आणि पक्षांतराच्या प्रकरणांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया, त्यांची घटनात्मक जबाबदारी, पक्ष कुणाचा आणि तो कसा ठरवला जातो, यासंदर्भातील कायदेशीर प्रश्न यांचाही पुस्तकात सविस्तर विचार आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाच्या एस. आर. बोम्मई प्रकरणासारख्या न्यायालयीन संदर्भांपासून पक्षफुटीच्या परिणामांपर्यंत अनेक पैलू भोयटे यांनी समोर आणले आहेत. त्यामुळे पुस्तकाचं स्वरूप केवळ राजकीय भाष्यापुरतं राहत नाही; त्याला घटनात्मक आणि कायदेशीर आधारही मिळतो.
मुळात प्रश्न फक्त पक्ष फुटण्याचा नाही. पक्ष फुटला की सामान्य कार्यकर्त्याचं काय होतं? वर्षानुवर्षे ज्या पक्षासाठी त्याने काम केलं, ज्या विचारांसाठी त्याने संघर्ष केला, त्या पक्षाचीच दिशा बदलली किंवा नेतृत्वाने वेगळी वाट धरली, तर त्या तळागाळातील कार्यकर्त्याच्या मनात काय घडतं? या भावनिक आणि सामाजिक परिणामांकडेही भोयटे यांनी लक्ष वेधलं आहे. सत्तेच्या समीकरणांमध्ये वरच्या स्तरावर होणाऱ्या हालचालींचा सर्वात मोठा परिणाम अनेकदा तळागाळातील कार्यकर्त्याला सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती त्यांनी प्रभावीपणे मांडली आहे.
राजकारण जर स्वार्थासाठी, पैशासाठी आणि सत्तेसाठी केलं जाऊ लागलं, तर त्याचा लोकशाहीवर काय परिणाम होतो, हा या पुस्तकाचा मध्यवर्ती प्रश्न आहे. राजकीय पक्ष हे केवळ निवडणूक जिंकण्याची यंत्रणा नसून विचार, तत्त्व आणि जनतेशी असलेली बांधिलकी यांची संस्थात्मक अभिव्यक्ती असतात. ही मूल्यव्यवस्था ढासळली तर लोकशाहीचा आत्माच कमकुवत होतो, याची जाणीव पुस्तकाच्या प्रत्येक पानावरून होते.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यातही अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. डॉ. नरेंद्र जाधव यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत, न्यायमूर्ती अभय ओक यांच्यापासून ज्ञानेश महाराव यांच्यापर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुस्तकाचं कौतुक केलं. ही दाद केवळ पुस्तकाच्या विषयाला मिळालेली नाही, तर त्या विषयाकडे पाहण्याच्या लेखकाच्या दृष्टिकोनालाही मिळालेली आहे.


प्रकाशन सोहळ्यात मी तुळशीदास भोयटे यांच्या पत्नी अॅड. अनिता बाफना जी यांच्याशी बोलत होतो. त्यांच्या बोलण्यातून मला तुळशीदास भोयटे नावाचा माणूस किती झपाटलेला आहे, याची जाणीव झाली. आम्ही पत्रकारितेत रस असणारे त्यांच्या मित्रपरिवारातील लोक त्यांना झपाटलेला पत्रकार म्हणून पाहतोच; पण त्यांच्या सहजीवनातील अनुभवातून त्यांच्या पत्नीच्या शब्दांतून जाणवणारं हे झपाटलेपण आणखी वेगळं आणि अधिक खोल होतं. पत्रकारिता ही त्यांच्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय नाही; ती त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, हे त्या संवादातून प्रकर्षाने जाणवलं.
तत्त्वमूल्यांशी तडजोड न करता सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणारा हा माणूस आहे. स्वतःच्या मनाविरुद्ध कुणी चुकीचं करत असेल तर केवळ संबंध किंवा सोयीपोटी त्याला स्वीकारायचं नाही, ही भूमिका त्यांनी आयुष्यभर जपली. पत्रकारितेत स्वतःला मोठं करण्यापेक्षा पत्रकारिता मोठी करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. अनेक पत्रकारांना घडवणं, त्यांना संधी देणं आणि पुढची पिढी तयार करणं, ही त्यांच्या कार्याची मोठी बाजू आहे.
माध्यम क्षेत्रातील अनुभवी माणूस जेव्हा टीव्हीचा बूम बाजूला सारतो आणि हातात पेन घेतो, तेव्हा त्याच्या लेखणीमध्ये त्या अनुभवाचा साठा उतरतो. तुळशीदास भोयटे यांच्या ‘भाजप कशी जिंकली’ आणि ‘२०२४ भाजप कशी जिंकली’ यांसारख्या पुस्तकांनी त्यांच्या राजकीय विश्लेषणाची ताकद यापूर्वीच दाखवून दिली आहे. ‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ हे त्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचं पाऊल आहे.
पत्रकारितेतील तत्त्वमूल्यं बाजूला सारली जात आहेत असं जाणवलं, तेव्हा त्यांनी ‘मुक्तपीठ’ सारखं स्वतंत्र माध्यम उभं केलं. स्वतंत्र पत्रकारिता ही केवळ सांगण्याची गोष्ट नाही, ती प्रत्यक्ष जगता येते, हे त्यांनी कृतीतून दाखवलं. त्यामुळे आज ते पत्रकारांसाठी केवळ ज्येष्ठ सहकारी नाहीत, तर एक ऐकवण, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहेत.
या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा वाटाही तितकाच महत्त्वाचा आहे. तुळशीदास भोयटे यांनी विषयाला शब्द दिले, विचारांना दिशा दिली; तर हिंगलासपूरकर यांनी या पुस्तकाच्या निर्मितीत जीव ओतला आहे. पुस्तक अत्यंत देखणं, प्रभावी आणि वाचकाला आपलंसं वाटेल अशा पद्धतीने साकारलं आहे.
सुदेश हिंगलासपूरकर आणि ग्रंथाली हे महाराष्ट्राच्या वाचन आणि विचारसंस्कृतीतील एक महत्त्वाचं नाव आहे. ग्रंथाली हे केवळ प्रकाशनसंस्था नाही; ते एक चालतं,बोलतं विचारपीठ आहे. या विचारपीठातून अनेक लेखक घडले, अनेक विचार महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आणि वाचनसंस्कृतीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम झालं. त्यामुळे या पुस्तकाला उत्तम शब्दबद्धता, उत्तम विचार, उत्तम संदर्भ आणि उत्तम निर्मिती अशी चौफेर ताकद लाभली आहे.
या पुस्तकाची किंमतही वाचकांना परवडेल अशी ठेवण्यात आली आहे. ३५० रुपये किंमत आणि २११ पानं असलेलं हे पुस्तक गंभीर विषय असूनही वाचकाच्या आवाक्यात आहे. न्यायमूर्ती अभय ओक यांची प्रस्तावना आणि पाठराखण पुस्तकाला वैचारिक आणि घटनात्मक संदर्भाची आणखी एक महत्त्वाची बाजू मिळवून देते.
पुस्तकाचं पहिलं प्रकरण ‘आयाराम-गयाराम : गोष्ट मतदारांच्या विश्वासघाताची’ इथून सुरू होतं आणि शेवटचं प्रकरण ‘वैधता आणि नैतिकता’ इथपर्यंत पोहोचतं. ही दोन टोकं पाहिली तरी पुस्तकाचा संपूर्ण प्रवास लक्षात येतो. एका बाजूला मतदाराच्या विश्वासाशी होणारा विश्वासघात आणि दुसऱ्या बाजूला राजकारणातील वैधता व नैतिकतेचा प्रश्न. या दोन टोकांच्या दरम्यान भारतीय लोकशाहीच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांचा लेखकाने घेतलेला वेध आहे.
उद्याच्या काळात एखादा पक्ष फुटला तर सरकारची भूमिका काय असावी? शासनाने काय करावं? कायद्याची भूमिका काय असावी? सभापती आणि अध्यक्षांनी कोणत्या मर्यादेत निर्णय घ्यावा? पक्षाची वैधता कशी ठरवावी? आणि या सगळ्या राजकीय उलथापालथीचा समाजमनावर काय परिणाम होतो? या प्रश्नांपासून ते तळागाळातील कार्यकर्त्याच्या भावनिक आणि सामाजिक वेदनेपर्यंत अनेक पैलू पुस्तकात मांडले आहेत.
म्हणूनच हे पुस्तक हातात घेतल्यानंतर ते खाली ठेवणं अवघड होतं. कारण प्रत्येक प्रकरण पुढचा प्रश्न उभा करतं आणि प्रत्येक संदर्भ आपल्याला आपल्या वर्तमानाकडे पुन्हा पाहायला भाग पाडतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक विचारांपर्यंत आलेली मूल्यपरंपरा आणि आजच्या सत्ताकारणातील बदलती मूल्यव्यवस्था यांच्यामधला संघर्ष या पुस्तकातून जाणवतो. हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे.
तुळशीदास हे नाव घेतलं की मला नेहमी ‘दास’ या शब्दाचा अर्थ आठवतो,स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी जगणारा माणूस. तुळशीदास भोयटे हे खरंच त्या अर्थाने इतरांच्या कल्याणासाठी झपाटलेलं व्यक्तिमत्त्व आहे. इतरांचं भलं झालं पाहिजे, पत्रकारांना संधी मिळाली पाहिजे, नव्या पिढीने घडत राहिलं पाहिजे आणि समाजाच्या प्रश्नांना आवाज मिळाला पाहिजे, या भावनेतून त्यांनी आयुष्यभर काम केलं. पुस्तकांमधून, वृत्तपत्रांमधून, विविध दूरचित्रवाहिन्यांमधून आणि ‘मुक्तपीठ’सारख्या स्वतंत्र माध्यमातून त्यांनी स्वतःपेक्षा विचार मोठा केला. आज त्यांच्या हाताखाली, त्यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या धडपडीतून घडलेली शेकडो माणसं महाराष्ट्राच्या पत्रकारितेत वेगवेगळ्या ठिकाणी उभी आहेत. तुळशीदासजी स्वतः एका ठिकाणी थांबले नाहीत; ते त्यांनी घडवलेल्या प्रत्येक माणसामध्ये दिसतात. त्यांच्या झपाटलेपणात प्रसिद्धीचा मोह नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची निर्मळ तळमळ आहे. म्हणूनच ‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ हे पुस्तक त्यांच्या लेखणीची ओळख तर आहेच; पण त्यांच्या निर्मळ मनाचाही आरसा आहे. तत्त्वांशी तडजोड न करता, माणसासाठी आणि लोकशाहीसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या या अवलिया पत्रकाराला मनापासून सलाम आणि मनःपूर्वक अभिनंदन!
त्यांनी केवळ एक पुस्तक लिहिलेलं नाही; त्यांनी आजच्या राजकारणाला आरसा दाखवला आहे. आणि ग्रंथालीने या आरशाला उत्तम आकार, देखणी निर्मिती आणि वाचकांच्या हातात पोहोचण्याजोगं प्रभावी रूप दिलं आहे.
‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ हे पुस्तक राजकारण समजून घेऊ इच्छिणाऱ्यांनी, पत्रकारांनी, विद्यार्थ्यांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी आणि लोकशाहीच्या भवितव्याबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचावं, असं मला मनापासून वाटतं.
कारण शेवटी प्रश्न पक्ष कोणता, नेता कोणता किंवा सत्ता कुणाची याचा नाही.
प्रश्न हा आहे,लोकशाही कुणासाठी आणि किती काळ टिकवायची?
याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रवासात तुळशीदास भोयटे यांचं हे पुस्तक निश्चितच एक महत्त्वाचा टप्पा ठरतं.
पुस्तक परीक्षक
संदीप रामराव काळे
पत्रकार मुंबई
———

