पावसाची आकडेवारी नको, बांधावर जाऊन पिकांची वस्तुस्थिती पाहा! , अमळनेर तालुक्यात खरीप पिके संकटात; सरसकट हेक्टरी आर्थिक मदतीसाठी काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
![]()
पावसाची आकडेवारी नको, बांधावर जाऊन पिकांची वस्तुस्थिती पाहा!
अमळनेर तालुक्यात खरीप पिके संकटात; सरसकट हेक्टरी आर्थिक मदतीसाठी काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे असमान वितरण, पावसातील मोठे खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाची एकूण आकडेवारी समाधानकारक दिसत असली तरी प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे पावसाची आकडेवारी पाहण्यापेक्षा पिकांना प्रत्यक्षात पावसाचा किती फायदा झाला, उत्पादनावर किती परिणाम झाला आणि पाऊस जमिनीत किती मुरला, याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.
यासंदर्भात काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी मा. उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांना निवेदन देत तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी आर्थिक मदत किंवा अनुदान देण्याची मागणी केली.
खरीप पिके गेल्यात जमा; शेतकऱ्यांची चिंता वाढली
निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी तालुक्यातील पाऊस, खरीप पिकांची सद्यस्थिती, पीक विमा, शेती उत्पादनातील संभाव्य घट आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी याबाबत सविस्तर माहिती दिली.
यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने खरीप पिकांच्या पेरण्या उशिरा झाल्या. त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे जेमतेम तग धरून असलेली खरीप पिके आता धोक्यात आली आहेत. आगामी पावसाबाबत हवामान विभागाचे अंदाजही फारसे आशादायक नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांची पिके तुलनेने तग धरून आहेत. मात्र तालुक्यात अशा शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांची पिके पूर्णतः संकटात सापडली आहेत.
मका, मूग, बाजरी, ज्वारी, सोयाबीनचे उत्पादन धोक्यात
तालुक्यात साधारणपणे १० ते १२ फूट उंचीपर्यंत वाढणारा मका यंदा अवघा ५ ते ६ फूट उंचीवरच राहिला आहे. कणसांची वाढही अपेक्षेप्रमाणे झालेली नसून त्यामध्ये दाणे पूर्ण भरतील की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.
मूग पिकालाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. अमळनेरच्या पश्चिम भागात बाजरीचे उत्पादन जेमतेम येण्याची शक्यता आहे. तालुक्यात ज्वारी आणि सोयाबीनची परिस्थितीही समाधानकारक नसल्याचे काँग्रेस कमिटीने निवेदनात नमूद केले आहे.
उत्तर-पूर्व भागात तापी नदीमुळे सिंचनाची स्थिती तुलनेने चांगली असली तरी कपाशीवर आतापासूनच बोंडअळी व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात तब्बल ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


पीक विम्याचा लाभही मोजक्याच शेतकऱ्यांना
पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा भरपाई मिळण्याची शक्यता होती. मात्र पीक विमा कंपनीने पावसाच्या खंडाचा निकष (ट्रिगर) काढून त्याऐवजी पिकाच्या उत्पन्नावर आधारित निकष ठेवला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे.
यावर्षी अमळनेर तालुक्यात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. बँकांकडून होणारी प्रक्रिया, विमा काढण्याचे पोर्टल, पीक विम्याच्या निकषांमध्ये झालेले बदल तसेच अन्य तांत्रिक अडचणी यामागे कारणीभूत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
३१ ऑगस्टपर्यंत पावसाचे असमान वितरण
अमळनेर तालुक्यात ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पावसाचे वितरण अत्यंत असमान राहिले आहे. अमळनेर, शिरूड, पातोंडा, मारवड, नगााव व अमळगाव मंडळांमध्ये प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण साधारण ७० ते ८९.३० टक्क्यांदरम्यान आहे. तर भरवस व वावडे मंडळांमध्ये अनुक्रमे १३०.२० टक्के व ११७.४० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात सरासरी ४७४.३० मि.मी. पाऊस झालेला असला, तरी पावसाचे वितरण योग्य पद्धतीने झालेले नसल्याने त्याचा अपेक्षित फायदा पिकांना झालेला नाही. अनेक लहान बंधारे व तलाव अद्याप कोरडे पडलेले असून, आगामी काळात गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता काँग्रेस कमिटीने व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या हातातील पैसा संपला; रब्बीची चिंता कायम
खरीप पेरणीसाठी खते, बियाणे, कीटकनाशके, मशागतीचा खर्च यावर शेतकऱ्यांच्या हातातील पैसा मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. आता रब्बी हंगामासाठी पुन्हा मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यातच महागाईने उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे.
पावसाची आकडेवारी कितीही समाधानकारक दिसत असली तरी शेती उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ कागदावरील पावसाच्या आकडेवारीच्या आधारे निर्णय न घेता प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
“वावराच्या बांधावरून जा, मगच सत्य समोर येईल!”
निवेदनात प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना करताना काँग्रेस कमिटीने म्हटले आहे की, “पाऊस किती पडला, एवढेच न पाहता त्या पावसाचा पिकांना किती फायदा झाला, उत्पादनावर त्याचा काय परिणाम झाला आणि पाऊस जमिनीत किती मुरला, याचा विचार झाला पाहिजे.”
त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसून आकडेवारीचा आढावा घेण्यापेक्षा प्रत्यक्ष वावराच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष शेतात गेल्यानंतरच खरी परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास येईल आणि त्यानुसार योग्य निर्णय घेता येईल, असा दावा काँग्रेस कमिटीने केला आहे.
सरसकट हेक्टरी मदतीची मागणी
तालुक्यातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनाने तत्त्वाच्या चौकटीत अडकून न राहता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करून सरसकट हेक्टरी आर्थिक मदत किंवा अनुदान जाहीर करावे, अशी आग्रही मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुलोचना वाघ, मनोज पाटील, प्रा. श्याम पवार, रामकृष्ण पाटील, शरद पाटील, डॉ. प्रकाश सोनवणे, कन्हैयालाल कापडे, रोहिदास कापडे, दिलीप पाटील, पी. वाय. पाटील, बन्सीलाल भागवत, शालिग्राम पाटील, राजेंद्र चौधरी सर, हर्षल जाधव, धोंडू महाजन, भगवान संधान शिव, सुभाष शिंदे, सुधाकर भैसे, पितांबर पाटील, गजेंद्र साळुंखे, राजेंद्र भाट, डॉ. रवींद्र पाटील, भिकाजी पाटील, अशोक पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

