कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे ” शिक्षक दिन ” उत्साहात साजरा!
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे ” शिक्षक दिन ” उत्साहात साजरा!
नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे)
आज दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ” शिक्षक दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा मा. ताईसाहेब सौ. हौसाबाई तुकाराम माळी यांनी धुरा सांभाळली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी व सचिव मा. एकनाथ बळीराम महाजन, मुख्याध्यापक मा. काशिनाथ माळी, जेष्ठ कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री. बाजीराव निकुंभ, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे व असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची संपूर्ण आखणी, फलक लेखन सांस्कृतिक व सहशालेय समिती प्रमुख जेष्ठ कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षा सौ. हौसाताई तुकाराम माळी व उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. आज कार्यक्रम नियोजनानुसार आपल्या गुरुवर्यांना एक दिवस ” गुरु शिष्य परंपरा कृतज्ञता नमन ” म्हणून शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मिळून एक दिवस अध्ययन अध्यापनाचा अनुभव घेतला. आदल्या दिवशी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे पद बहाल करून मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विषय शिक्षक, शिक्षिका, लिपिक, शिपाई या नुसार आप आपल्या भूमिका साकारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार वेळापत्रक, अध्यापन पाठ नियोजन, नेमून दिलेले वैयक्तिक व गट कार्य या सर्व बाबींसह अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तासिकेनुसार दिवसभर कामकाज सुरू होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून इ. १० वी ची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री शरद कोरे हिने मुख्याध्यापिका म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांच्यामधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक समिती व सहशालेय समिती प्रमुख जेष्ठ कलाशिक्षक श्री हिरामण सोनवणे यांच्या तर्फे ” आदर्श शिक्षक – शिक्षिका पुरस्कार ” कु. भाग्यश्री शरद कोरे इ. १० वी, धनंजय महेंद्र कुवर इ.१० वी, योगेश छगन गावीत इ.७ वी, कु. लक्ष्मी बालू पवार इ. १० वी यांना प्रत्येकी ५० रु रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी शिक्षक दिनानिमित्त एक आदर्श संकल्प केला की, शाळेत शिक्षक संख्या खूपच कमी असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे, केवळ दोन शिक्षक सहा वर्ग सांभाळणे खूप कठीण आहे, त्यामुळे मी आता जोपर्यंत नवीन शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत हक्काची एकही दिवस रजा टाकणार नाही !” या संकल्पनेचे मान्यवरांनी कौतुक केले. व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी ” थ्यॅंक यू सर !” म्हणत जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री. बाजीराव निकुंभ यांच्या तर्फे ” आदर्श सेवक पुरस्कार ” म्हणून अमित सुरेश देसाई इ. १०वी, सुमिरन गांगुर्डे इ.१० वी या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रीडा शिक्षक श्री. बाजीराव निकुंभ यांनी आजच्या शालेय कामकाजाचे निरीक्षण करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले की, ” आज खरोखरच शाळा उत्कृष्ट पद्धतीने तासिकेनुसार एक ही वर्ग रिकामा न राहता सुरू पाहून आनंद झाला ! प्रत्येक वर्गात शांतपणे अध्ययन अध्यापन सुरू होते. कोणत्याही वर्गात गोंधळ, गोंगाट आढळला नाही. प्रत्येक वर्गात काय शिकवले जात आहे हे स्पष्टपणे ऐकू येत होते. एकमेकांना उत्कृष्ट प्रतिसाद दिला जात होता. हे चित्र पाहून खूप आनंद झाला! प्रत्येक वर्गाला शिक्षक लाभले तर शाळा पूर्वीप्रमाणे अशीच सुंदर बहरत जाईल. शासनाने लवकरात लवकर शिक्षक भरती करून विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळाले पाहिजे !” अशी खंतही व्यक्त केली. तसेच सर्व यशस्वी निवड केलेल्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. हौसाताई तुकाराम माळी यांच्या तर्फे रोख बक्षीसे व चॉकलेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. हौसाताई तुकाराम माळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर वृंदांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, “गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद होती, एक -एक शिक्षक सेवानिवृत्त होत गेले. आज केवळ दोन शिक्षक व एक मुख्याध्यापक शाळा चालवत आहेत तरीही आपल्या आदिवासी माळमाथा परिसरातील शंभर टक्के गोरगरीब विद्यार्थ्यांना इतक्या सुंदर पद्धतीने सुसंस्कार दिले जात आहेत याचा संस्थेला अभिमान आहे !, असेच योगदान देत रहा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत, शासनातर्फे लवकरच नवीन शिक्षक भरती केली जाईल अशी आशा व्यक्त करते. तसा आमचा प्रयत्न सुरू आहे!” असे आवाहन केले. कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आप आपल्या भूमिका कशा साकारल्या व काय अनुभव आला हे सर्वांनी मनोगतातून व्यक्त केले. व भविष्यात शिक्षक होण्याचा संकल्प केला ! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजच्या कार्यक्रमाच्या मुख्याध्यापिका म्हणून भूमिका साकारणारी विद्यार्थिनी कु. भाग्यश्री शरद कोरे इ. १० वी हिने केले. तर आभार प्रदर्शन विद्यार्थी लिपिक आकाश लहू देसाई इ. १० वी याने केले. कार्यक्रम यशस्वी केल्यामुळे मान्यवरांकडून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले!*


वाह दादासाहेब अप्रतिम बातमी प्रसिद्ध केली हृदयापासून प्रणाम !🌹🌹🌹🌹👏👏👏👏🫡🫡🫡