राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी गाजवले मैदान! धावणे, लांब उडी अन् गोळाफेक स्पर्धेत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; विजेत्यांना रोख बक्षिसांनी गौरव
![]()
राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी गाजवले मैदान!
धावणे, लांब उडी अन् गोळाफेक स्पर्धेत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; विजेत्यांना रोख बक्षिसांनी गौरव
नंदुरबार प्रतिनिधी : (भगवान सोनवणे)
ब्राम्हणवेल येथील कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मैदानावर उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले क्रीडा कौशल्य दाखवून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब तुकाराम बळीराम माळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन तसेच सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर बापुसाहेब पितांबर बोरसे उपस्थित होते.
क्रीडा शिक्षक बाजीराव निकुंभ यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शालेय मैदानावर धावणे, लांब उडी आणि गोळाफेक आदी स्पर्धांसाठी मैदानाची आखणी केली. विद्यार्थ्यांना खेळांचे नियम समजावून देत प्रत्यक्ष कृतीतून सराव करून घेण्यात आला.
कलाशिक्षक हिरामण सोनवणे यांनी, “जीवनात खेळ आणि व्यायामाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे आपले निरामय स्वास्थ्य दीर्घकाळ टिकून राहते,” असे प्रतिपादन केले.
स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
धावण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन प्रतिष्ठित नागरिक धनराज नामदेव महाजन यांच्या हस्ते झाले. यामध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी असे दोन गट करण्यात आले. मुलींच्या स्पर्धेत रंजना प्रकाश शेंडाळे, शेषा संभाजी अहिरे, राशी छगन गावीत व सोनाली विजय शिंदे, तर मुलांच्या गटात गोरखनाथ देवा ठाकरे, सोमनाथ खंडू माळचे, येशूनाथ देवा ठाकरे व विशाल बबलू माळचे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
लांब उडी स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक काशिनाथ माळी यांच्या हस्ते झाले. मुलांमध्ये राहुल बबलू माळचे, सोमनाथ खंडू माळचे, आकाश लहू देसाई व अमित सुरेश देसाई, तर मुलींमध्ये रंजना प्रकाश शेंडाळे, वर्षा शामसिंग माळचे, राशी छगन गावीत व सोनाली विजय शिंदे यांनी बाजी मारली.
गोळाफेक स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले. मुलींमध्ये रंजना प्रकाश शेंडाळे, नाजमीन मुबारक खाटीक, सोनाली विजय शिंदे व कामिनी गणेश सूर्यवंशी, तर मुलांमध्ये सोमनाथ खंडू माळचे, स्वराज ताथू चौधरी, धनंजय महेंद्र कुंवर व विशाल बबलू माळचे यांनी यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी कौतुक करून रोख बक्षिसे देत त्यांचा गौरव केला.
वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भेट; रक्षाबंधनाने वाढली आपुलकी
मुख्याध्यापक मा. काशिनाथ माळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय कंपास पेटी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मिठाईसह भोजन देण्यात आले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापकांचा वाढदिवस साजरा केला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी विद्यार्थी, शिक्षक व संस्थाचालक मान्यवरांना राखी बांधत उत्स्फूर्त सहभाग घेतला. कलाशिक्षक हिरामण सोनवणे यांनी रक्षाबंधनाचे सांस्कृतिक महत्त्व आणि शालेय जीवनातील पवित्र भावनांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे फलक लेखन व सूत्रसंचालन हिरामण सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक बाजीराव निकुंभ यांनी केले. संस्थेच्या वतीने उपक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
क्रीडा, संस्कार, स्नेह आणि आनंदाचा संगम घडविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. दप्तरमुक्त शनिवार विद्यार्थ्यांनी अक्षरशः खेळत, बागडत आणि आनंदात साजरा केला.
काही क्षणचित्रे







वाह दादासाहेब अप्रतिम बातमी! 🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏🫡🫡🫡🫡🫡