कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
नंदुरबार प्रतिनिधी
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीचा उत्साह, सांस्कृतिक वैविध्य आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या मनमोहक सादरीकरणाने जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रगतशील शेतकरी मा. विलास तुकाराम माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु. हेमलता जव्हेरी, राशी गावित, कामिनी सूर्यवंशी व भाग्यश्री कोरे यांनी वंदे मातरम्, जन गण मन, जय जय महाराष्ट्र माझा तसेच विजयी विश्व तिरंगा प्यारा या देशभक्तिपर गीतांचे सुरेल गायन सादर केले.
स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. देवेंद्र विष्णु कुलकर्णी (एक्झिक्युटिव्ह परचेस, अशोका बिल्डकॉन लिमिटेड, नाशिक) यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, संस्थेचे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, आदिवासी समाजसेवक मा. अंबर माळचे, ह.भ.प. श्री. अनिल हरी चौधरी, श्री. कल्पेश पोपट कुंवर, ब्राम्हणवेलच्या सरपंच सौ. रेखाताई सुरेश देसाई, ग्रामसेवक मा. गायकवाड आप्पासाहेब, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. वळवी सर, अहिरे सर, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका सौ. बागुल ताई, देवरे ताई, नवापाडा पी.एस.सी. सेंटरच्या सौ. जाधव मॅडम, तलाठी आप्पासाहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. शासनाच्या आदेशानुसार देशभक्तिपर संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत सादर केली. यासोबतच विविध मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे, आदिवासी निसर्गगीते, देशभक्तिपर रेकॉर्ड डान्स, वैयक्तिक व सामूहिक नृत्य, गीतगायन तसेच वेशभूषा स्पर्धेचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कलाविष्काराला उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दाद देत भरभरून कौतुक केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून मा. देवेंद्र विष्णु कुलकर्णी यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “नव्व्याण्णव टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या आदिवासी विभागातील या शाळेत उत्कृष्ट सुसंस्कार, शिस्त, कला-कौशल्य विकास तसेच विविध शासकीय ज्ञानात्मक स्पर्धा परीक्षांसह सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक जडणघडणीतून विद्यार्थी घडविले जात आहेत. माळमाथा परिसरातील ही एकमेव उत्कृष्ट आदर्श शाळा आहे.” त्यांच्या या गौरवोद्गारांनी विद्यालयाच्या कार्याचा विशेष सन्मान झाला.
माजी विद्यार्थी श्री. कल्पेश पोपट कुंवर यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले, “या शाळेमुळे मी उत्तम नागरिक झालो. शिक्षकांनी मला खूप सहकार्य केले. माझ्या कलागुणांना वाव दिला. त्यामुळेच आज मी चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहे.”
कार्यक्रमाची संपूर्ण आखणी व सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ कलाशिक्षक तथा सांस्कृतिक समिती प्रमुख श्री. हिरामण सोनवणे यांनी केले. कवायत संचलन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री. बाजीराव निकुंभ यांनी केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्याध्यापक मा. काशिनाथ माळी यांनी आपले व्याही श्री. जीवन छगन चौधरी, माजी उपसरपंच,मांडळ यांच्या कडून त्यांचे बंधू कै. तात्यासाहेब छगन भबूता चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “स्टील डायज ” शाळेला सप्रेम भेट देण्यात आला.
कार्यक्रमास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ माळी, ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री. बाजीराव निकुंभ, श्री. रविंद्र सूर्यवंशी, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार व श्री. सुनील ठाकरे यांच्यासह ब्राम्हणवेल माजी विद्यार्थी युवा-युवती मित्र मंडळ, पालक, ग्रामस्थ बंधू-भगिनी, प्राथमिक, अंगणवाडी व माध्यमिक विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमात तंबाखू मुक्त शाळा व कॉपी मुक्त शाळा शपथ प्रतिज्ञा सामुदायिक रीत्या घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे चहापानाने स्वागत करण्यात आले, तर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. देशभक्ती, संस्कार, कला आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडविणारा हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहिला.


वाह अतिशय उत्कृष्ट बातमी!