पशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा – पंकजाताई मुंडे
1 min read

पशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा – पंकजाताई मुंडे

Loading

पशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा – पंकजाताई मुंडे

श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे कणेरी येथे लोकार्पण व पशुपालक मेळावा साजरा; विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा उद्योजकतेला प्राधान्य देण्याचे आवाहन

मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे )
दि. ३ सप्टेंबर रोजी श्री सिद्धगिरी मठ, कणेरी येथे श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे लोकार्पण मा. ना. पंकजाताई प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, मंत्री, पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल, महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच पशुपालक मेळावा आयोजित करण्यात आला. तसेच ह्या कार्यक्रमादरम्यान मा. ना. पंकजाताई प्रज्ञा गोपीनाथ मुंडे शुभ हस्ते महाविद्यालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. पशुवैद्यकीय विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचा थेट उपयोग पशुपालकांच्या जीवनमानात व उत्पन्नात वाढ करण्यासाठी झाला पाहिजे. पशुधनाचे आरोग्य, उत्पादकता आणि व्यवस्थापन सुधारल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे पशुवैद्यकीय महाविद्यालयांनी केवळ पदवी देणाऱ्या संस्था न राहता पशुपालकांच्या समस्या सोडविणारे ज्ञान व तंत्रज्ञान केंद्र म्हणून काम करावे, असे प्रतिपादन मा. ना. पंकजाताई प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले. परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, श्री सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “पशुपालकांच्या दारापर्यंत आधुनिक पशुवैद्यकीय सेवा आणि तंत्रज्ञान पोहोचणे ही आजची गरज आहे.” पशुधनातील आजारांचे वेळेवर निदान, प्रतिबंधात्मक लसीकरण, संतुलित पशुआहार, प्रजनन व्यवस्थापन आणि आधुनिक पशुपालन पद्धतींचा अवलंब यामुळे पशुपालकांच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्यावर स्थानिक पातळीवर व्यवहार्य उपाय विकसित करण्यासाठी संशोधन करावे. पदवी मिळाल्यानंतर केवळ शासकीय किंवा खासगी नोकरीच्या संधींच्या मागे न लागता स्वतः रोजगार निर्माण करणारे पशुवैद्यकीय उद्योजक घडणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक पशुवैद्यकीय क्लिनिक, निदान केंद्रे, मोबाईल पशुवैद्यकीय सेवा, डेअरी फार्म व्यवस्थापन, पशुखाद्य व पोषण सल्ला, प्रजनन सेवा, पशुधन विमा, डिजिटल सल्ला सेवा आणि दुग्धजन्य पदार्थांचे मूल्यवर्धन या क्षेत्रांत तरुण पशुवैद्यकांसाठी मोठ्या संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण युवकांसोबतच महिलांना पशुपालन व दुग्धव्यवसायातील निर्णयप्रक्रियेत आणि आर्थिक उपक्रमांमध्ये अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी विज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट मानवकल्याण आणि समाजसेवा असले पाहिजे, असा संदेश दिला. गाय व पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून पशुधन आधारित आर्थिक उपक्रमांना आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेची जोड देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी दुग्धव्यवसायासोबत शेण-गोमूत्र आधारित उत्पादने, जैविक निविष्ठा, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधींचा विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला. राज्यात पशूंधनाच्या संखेच्या तुलनेत पशुवैद्यक खूप कमी असल्यामुळे व पशुवैद्यक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी शास्त्रीय्दुष्ट्या चांगली मनुष्यबळाची आवश्यकता महाराष्ट्रात असल्यामुळे खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी मान्यता शासनाने दिल्याचे डॉ. नितीन पाटील , कुलगुरू, मपमविवि, नागपूर यांनी कार्यक्रमप्रसंगी संबोधित केले, कणेरी मठ येथे पशुधनाच्या आरोग्यासाठी पशुवैद्यक निर्माण होत असल्याचा आनंद कोल्हापूर दक्षिण चे आमदार मा. अमल महाडिक यांनी व्यक्त केला. डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक शिक्षण व अधिष्ठाता, सौ. प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष, सातारा; डॉ. के. एम. एल. पाठक, माजी कुलगुरू, पंडित दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विश्वविद्यालय, मथुरा; डॉ. विकास वासकर, सहयोगी अधिष्ठाता, शिरवळ; डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन, कोल्हापूर; डॉ. चंद्रकांत परुळेकर, गोकुळ दूध संघ आणि श्री. विश्वास चितळे, मे. बी. जी. चितळे डेअरी यांच्यासह यशवर्धन बारामतीकर, श्री. जी. पी. वड्ड, ए. मुरुगप्पा,सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील डॉ. रवींद्र सिंह, आदी मान्यवर उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमादरम्यान श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय व गोकुळ सहकारी दुध संघ यामध्ये पशुचिकीत्सालयीन सेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्यासाठी सामंज्यस्य करार करण्यात आला.
पशुपालक मेळावा कार्यक्रमामध्ये डॉ. मार्कंडेय यांनी अधिक दुधासाठी पशु व्यवस्थापन, डॉ. अंकुश परिहार यांनी शासणाच्या पशुपालक हितार्थ योजना, प्रशांत योगी यांनी उत्कृष्ठ पशुप्रक्षेत्र व्यवस्थापन, डॉ. दिनेश टाकळीकर यांनी पशुधनासाठी सकस आहार, डॉ. सुनील राउतमारे यांनी समृद्ध पशु आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी तर डॉ. विनोद प्रत्यारोपण तंत्रज्ञान यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *