बालभारतीच्या पानांतून थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला साहित्यिक!,  के. एल. पोंदा हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ उपक्रम; ज्येष्ठ साहित्यिका नीरजाजी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
1 min read

बालभारतीच्या पानांतून थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला साहित्यिक!, के. एल. पोंदा हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ उपक्रम; ज्येष्ठ साहित्यिका नीरजाजी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

Loading

बालभारतीच्या पानांतून थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला साहित्यिक!

के. एल. पोंदा हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ उपक्रम; ज्येष्ठ साहित्यिका नीरजाजी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

डहाणू प्रतिनिधी: पुस्तकांच्या पानांमध्ये भेटणारे साहित्यिक जेव्हा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर येतात, तेव्हा वाचनाचा आनंद अनुभवात रूपांतरित होतो. असाच साहित्यिक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाचा अनोखा अनुभव दि डहाणू एज्युकेशन ट्रस्टच्या के. एल. पोंदा हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना मिळाला. शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुपमा जाधव यांच्या संकल्पनेतून ‘बालभारतीच्या पानांतून प्रत्यक्ष भेटीपर्यंत! साहित्यिक आपल्या भेटीला’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. तरुणजी पोंदा, उपाध्यक्ष मा. श्री. अजयजी बाफना, मानद सचिव मा. श्री. सुधीरजी कामत, विश्वस्त मा. श्री. रोहित भन्साळी तसेच विश्वस्त, कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांनी प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव मा. श्री. सुधीरजी कामत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका नीरजाजी, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. रसिका घागस, उपमुख्याध्यापक मा. श्री. सुनील मोरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. वर्षा राऊत आणि पर्यवेक्षिका मा. सौ. मनिषा पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्याध्यापिका सौ. रसिका घागस यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका व उद्देश स्पष्ट केला.

‘प्रश्न विचारा, विचार करा आणि वाचनाची वाट धराः’ नीरजाजींचा विद्यार्थ्यांना संदेश

ज्येष्ठ साहित्यिका नीरजाजी यांनी आपल्या संवादातून विद्यार्थ्यांना शिक्षण, वाचन, विचार आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व पटवून दिले. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक कार्यावर प्रकाश टाकत त्यांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.
“टिळक, आगरकर व्हायचे असेल तर प्रथम विचार करायला आणि प्रश्न विचारायला शिका,” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना चिकित्सक विचारांची दिशा दाखवली. इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘आश्वासक चित्र’ या कवितेच्या अनुषंगाने त्यांनी लेखन व साहित्यनिर्मितीविषयीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करताना आजच्या काळातही मुलींकडून असलेल्या अपेक्षा, पुरुषप्रधान संस्कृती आणि सामाजिक रूढी यांवर त्यांनी भाष्य केले. ‘सती सावित्री’च्या कथेतून सामाजिक वास्तव समजावून सांगत त्यांनी धर्म, उत्सव आणि त्यामागील मूल्यांचीही उकल केली. साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेचा अर्थ विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वाचनातून ज्ञान, लेखनातून अभिव्यक्ती!

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सुधीरजी कामत यांनी विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचन आणि लेखन करण्याची गरज अधोरेखित केली. एखाद्या विषयावर वक्तृत्व करायचे असेल, तर त्या विषयाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
संविधानाचे वाचन केल्याने मिळणाऱ्या ज्ञानाचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याचे आवाहन केले. अशा प्रकारच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन होणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी विविध उदाहरणे व मिश्कील किस्स्यांनी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. त्यांच्या संवादामुळे कार्यक्रमस्थळी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि हास्याचे फवारेही उडाले.

शिक्षकांच्या नियोजनातून उपक्रमाला यशस्वी आकार

या उपक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रा. श्री. विक्रमसिंग राजपूत, सौ. मनिषा गोसावी, श्री. चंद्रकांत खुताडे, श्री. बाळासाहेब चव्हाण, श्री. तुषार मडवे आणि श्री. सुनील मोरे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शीला सुरती यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ. वंदना कांकड यांनी केले.
साहित्यिकाशी झालेला थेट संवाद, विचारांना मिळालेली नवी दिशा आणि वाचनाची प्रेरणा यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. बालभारतीच्या पुस्तकांमध्ये वाचलेले साहित्य प्रत्यक्ष साहित्यिकाच्या संवादातून अनुभवता आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *