व्हॉईस ऑफ मीडिया’च्या केडर कॅम्पला उत्साहात सुरुवात , पत्रकारितेत तंत्रज्ञानाची कास धरा — गगन महोत्रा , विकसित पत्रकारितेसाठी पावले उचला — सारिका पन्हाळकर
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या केडर कॅम्पला उत्साहात सुरुवात
पत्रकारितेत तंत्रज्ञानाची कास धरा — गगन महोत्रा
विकसित पत्रकारितेसाठी पावले उचला — सारिका पन्हाळकर
पत्रकारितेची मूलभूत मूल्यांचे महत्त्व समजून घ्या-विलास बडे
संघटितपणे काम आणि भविष्याचा विचार -अनिल म्हस्के
नांदेड, (प्रतिनिधी) पत्रकारितेचे भविष्य अधिक सक्षम, आधुनिक आणि विकसित करायचे असेल तर पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे. पत्रकारितेला चांगले दिवस आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा लागेल, असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय चीफ गगन महोत्रा यांनी केले.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या वतीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा स्तरीय कॅडर कॅम्पला साडेचारशेहून अधिक पदाधिकारी उपस्थित असून, पत्रकारिता, संघटनात्मक बांधणी, आधुनिक तंत्रज्ञान, पत्रकारितेची मूल्ये आणि पत्रकारांच्या भविष्यासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर या कॅम्पमध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कॅम्पमध्ये मार्गदर्शन करताना गगन महोत्रा यांनी पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या वेगवान युगात पत्रकारांनी केवळ पारंपरिक माध्यमांवर अवलंबून न राहता डिजिटल माध्यमे, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संवादप्रणालींचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “पत्रकारितेला चांगले दिवस आणायचे असतील, तर पत्रकारांनी तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. बदल स्वीकारणारी पत्रकारिताच भविष्यात अधिक सक्षमपणे उभी राहील,” असे गगन महोत्रा यांनी सांगितले.
गगन महोत्रा म्हणाले,व्हॉईस ऑफ मीडिया च्या पदाधिकारी आणि केवळ सदस्य पत्रकारांसाठी आम्ही आगामी काळात नवीन व्यावसायिक संधी घेऊन येत आहोत. या संधीच्या माध्यमातून पत्रकारांना पत्रकारितेचे काम करता करता आर्थिक उत्पन्नही मिळवता येईल, असा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. आता मोठ्या शहरांमध्ये जाऊनच काम करण्याची गरज नाही, तर आपल्या गावातून, आपल्या परिसरातून आणि आपल्या गल्लीतून काम करूनही चांगले उत्पन्न मिळविण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी अशाच नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने व्हॉईस ऑफ मीडिया पावले उचलत आहे.
पत्रकारितेची ओळख कायम ठेवत पत्रकारांना आर्थिकदृष्ट्याही सक्षम करण्याचा हा उपक्रम केवळ व्हॉईस ऑफ मीडिया च्या पदाधिकारी आणि सदस्य पत्रकारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी देशाच्या राष्ट्रीय संघटक सारिका पन्हाळकर यांनी विकसित पत्रकारितेची संकल्पना स्पष्ट करताना पत्रकारितेच्या विकासासाठी नवीन विचार, कौशल्यवृद्धी आणि बदलत्या काळानुसार ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. “विकसित पत्रकारितेचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे असेल, तर आजपासूनच ठोस आणि सकारात्मक पावले उचलावी लागतील,” असे सारिका पन्हाळकर यांनी स्पष्ट केले.
विलास बडे यांनी पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, माध्यमांचे स्वरूप कितीही बदलले तरी पत्रकारितेतील सत्य, विश्वासार्हता, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये कायम जपली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. “तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी पत्रकारितेची खरी ताकद तिच्या मूल्यांमध्ये आहे. पत्रकारांनी पत्रकारितेची मूल्ये अंगीकारून समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे,” असे विलास बडे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी जगभरात सुरू असलेले काम कसे चालते हे समोर ठेवले.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी पत्रकारांच्या हितासाठी आगामी काळात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याबरोबरच त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ठोस उपक्रम राबविण्यावर संघटनेचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी कॅडर कॅम्पच्या व्यापक आयोजनाची माहिती दिली. परभणी येथून सुरू झालेल्या कॅडर कॅम्पच्या मालिकेने आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना कवेत घेतले आहे. मराठवाड्यानंतर ही कॅडर कॅम्पची चळवळ राज्यभर विस्तारत असून, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागांमध्येही कॅडर कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. या संपूर्ण राज्यव्यापी कॅडर कॅम्प मालिकेचा भव्य समारोप २७ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मराठवाडा स्तरीय कॅडर कॅम्पचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी आयोजन करण्यात आले आहे. कॅडर कॅम्प यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि राज्यस्तरीय नेतृत्व एकजुटीने काम करत असून, त्यांच्या मेहनतीमुळे नांदेडमध्ये संघटनात्मक शक्तीचे प्रभावी दर्शन घडत आहे.
या कॅडर कॅम्पमध्ये प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख, राज्य सरचिटणीस चेतन कात्रे, नांदेडचे अध्यक्ष तुकाराम सावंत, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम, परभणीचे जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, लातूरचे जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जालन्याचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेराव आणि बीडचे जिल्हाध्यक्ष जालिंदर धांडे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी सहभागी झाले आहेत. नांदेड चे आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.
तसेच राज्याचे सरचिटणीस गजानन देशमुख, सहसरचिटणीस श्रीनिवास भोसले, मराठवाडा संघटक ऋषीकेश कोंडेकर, मराठवाडा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे आणि मराठवाडा सरचिटणीस सुनील जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी या कॅडर कॅम्पच्या यशासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
नांदेड येथे सुरू असलेल्या या मराठवाडा स्तरीय कॅडर कॅम्पने केवळ पत्रकारांना मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली नसून, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणून संघटनात्मक बांधणीला नवी ऊर्जा दिली आहे. तंत्रज्ञानाचा स्वीकार, विकसित पत्रकारिता, पत्रकारितेची मूल्ये, पत्रकारांचे भविष्य आणि संघटनात्मक ताकद या महत्त्वपूर्ण सूत्रांवर झालेल्या मार्गदर्शनामुळे हा कॅडर कॅम्प पत्रकारितेला नवी दिशा देणारा ठरत आहे.
—————-

