शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य शुभारंभ , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते बोधडी परिसरात उद्घाटन; आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याची नवी दिशा
1 min read

शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य शुभारंभ , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते बोधडी परिसरात उद्घाटन; आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याची नवी दिशा

Loading

शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य शुभारंभ

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते बोधडी परिसरात उद्घाटन; आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याची नवी दिशा

किनवट प्रतिनिधी : किनवट तालुक्यातील मौजे बोधडी (परिसर) येथे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेवगा उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य शुभारंभ सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. नांदेडचे जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल कर्डिले यांच्या हस्ते या प्रक्रिया युनिटचे उद्घाटन करण्यात आले.

वनश्री आदिवासी शेतकरी उत्पादक गट, बोधडी बु. यांच्या पुढाकारातून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट, कृषी विभाग तसेच अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प महाराष्ट्र (HIMWP-MH) यांच्या समन्वयातून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. शेतीमालाचे केवळ उत्पादन न करता त्यावर प्रक्रिया, मूल्यवर्धन, पॅकिंग आणि बाजारपेठेची जोड देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून नावीन्यपूर्ण उपक्रम

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीमालाचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविणे आवश्यक आहे. हीच संकल्पना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनातून शेवगा प्रक्रिया युनिट उभारणीला चालना मिळाली.
या युनिटच्या माध्यमातून शेवग्यापासून पावडर तयार करून त्याचे पॅकिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठेशी जोडणी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना कच्च्या मालाच्या विक्रीपेक्षा मूल्यवर्धित उत्पादनातून अधिक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

६० रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचा समारोप

याच कार्यक्रमादरम्यान दि. ७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू असलेल्या दोन रेशीम प्रशिक्षण वर्गांचा समारोप करण्यात आला. या प्रशिक्षणात सुमारे ६० रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

HIMWP-MH प्रकल्पाच्या माध्यमातून शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतकरी उत्पन्नवाढ आणि ग्रामीण उपजीविका बळकटीकरण यांना जोड देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शेवगा प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

उद्घाटन सोहळ्यास मा. श्री. डॉ. बी. सरवनन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, किनवट हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी मा. श्री. कैलास जायभाये, SBI RSETI संचालक, नांदेड; मा. श्री. डॉ. अशोक वडवळे, जिल्हा रेशीम अधिकारी, नांदेड; मा. श्री. विक्रांत देहानकर, B.R.L.F. राज्य समन्वयक, नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच मा. श्रीमती डॉ. शारदा चोंडेकर, तहसीलदार, किनवट; मा. श्री. बाबुराव सोनेकांबळे, एल.डी.एम., एस.बी.आय., नांदेड; श्रीमती जयश्री वाघमारे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती किनवट; मा. श्री. प्रदीप नाईक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, किनवट; मा. श्री. चंद्रकांत निमोड, तालुका कृषी अधिकारी, किनवट; मा. श्री. तुषार पाटील, प्रकल्प संचालक, RAES शाखा किनवट आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी शेतकऱ्यांसाठी उद्योगाची नवी दिशा

शेवगा पावडर प्रक्रिया युनिट हे केवळ प्रक्रिया केंद्र न राहता ‘शेतीपासून उद्योगाकडे आणि कच्च्या मालापासून मूल्यवर्धित उत्पादनाकडे’ जाणाऱ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रभावी मॉडेल ठरू शकते. शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून सामूहिक पद्धतीने उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठ व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना मिळू शकते.
विशेषतः आदिवासी भागातील शेतकरी, महिला आणि युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

बोधडी परिसरातील शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा शुभारंभ हा किनवटच्या कृषी, मूल्यवर्धन आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

निमंत्रक : वनश्री आदिवासी शेतकरी उत्पादक गट, बोधडी बु., ता. किनवट, जि. नांदेड तथा अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प (राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्था, अमळनेर शाखा किनवट).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *