NSS माजी विद्यार्थी ‘गेट टूगेदर २०२६’ उत्साहात; सिडनी पॉईंटवर स्वच्छता मोहिमेतून ‘स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी’चा संदेश ,▪️पाचगणी-महाबळेश्वर येथे माजी स्वयंसेवकांच्या आठवणींना उजाळा; १५ स्वयंसेवकांसह १० महिला स्वयंसेवकांचा सहभाग
![]()
NSS माजी विद्यार्थी ‘गेट टूगेदर २०२६’ उत्साहात; सिडनी पॉईंटवर स्वच्छता मोहिमेतून ‘स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी’चा संदेश
▪️पाचगणी-महाबळेश्वर येथे माजी स्वयंसेवकांच्या आठवणींना उजाळा; १५ स्वयंसेवकांसह १० महिला स्वयंसेवकांचा सहभाग
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) माजी स्वयंसेवकांचा ‘गेट टूगेदर २०२६’ स्नेहमेळावा पाचगणी-महाबळेश्वर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देत सामाजिक बांधिलकीची भावना जपत या स्नेहमेळाव्यात स्वच्छता मोहिमेसह योगसत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजन समितीचे अध्यक्ष सय्यद मुस्ताक, खजिनदार विनायक महाजन, सल्लागार डॉ. मुकेश कुलकर्णी, उपाध्यक्ष सुबोधकुमार पाटील आणि महिला अध्यक्ष मनीषा मानकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या स्नेहमेळाव्यात NSS चे १५ स्वयंसेवक तसेच १० महिला स्वयंसेवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात NSS शिबिराच्या धर्तीवर करण्यात आली. सकाळी योगगुरू डॉ. भालचंद्र सर यांच्या मार्गदर्शनाखाली योगसत्र घेण्यात आले. त्यानंतर पाचगणी नगरपरिषद व नेस्ले प्रणित ‘हिलदरी’ अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध सिडनी पॉईंट येथे स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली. डॉ. मुकेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी परिसराची स्वच्छता करत तब्बल १५० किलोपेक्षा अधिक कचरा संकलित केला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच ‘स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी’ असा सामाजिक संदेश देण्यात आला. दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम, सहभागी स्वयंसेवकांचा सत्कार आणि मनोगतांचा कार्यक्रम झाला. शेरो-शायरीच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे बेताब बादशहा दिलशाद शेख तसेच आपल्या मनमोहक नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकणाऱ्या ‘धकधक गर्ल’ कांचन पडळकर यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढली. रात्रीच्या सत्रात किशोर रणदिवे यांच्या सुमधुर गीतांची मैफल रंगली. यावेळी अनेक स्वयंसेवकांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. NSSच्या कार्यकाळातील जुन्या आठवणी, शिबिरातील अनुभव आणि आपुलकीच्या नात्यांना उजाळा देणारा ‘भावबंध’ हा कार्यक्रम उपस्थितांच्या भावविश्वाला स्पर्शून गेला. या संपूर्ण स्नेहमेळाव्यातील विशेष आकर्षण ठरला तो छोटा स्वयंसेवक आर्तरुल गाझी. त्याच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमात आणखी उत्साह निर्माण झाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खजिनदार विनायक महाजन यांनी केले. NSS च्या माध्यमातून रुजलेली सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम आणि स्वयंसेवकांमधील भावबंध यांचा सुंदर संगम या ‘गेट टूगेदर २०२६’च्या निमित्ताने पाहायला मिळाला. माजी स्वयंसेवकांच्या या अनोख्या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळण्यासोबतच सामाजिक कार्याची नवी प्रेरणाही मिळाली.

