क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी वाटचाल; सुनील वाघ , खेळाडू घडविण्यापासून विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत पोहोचविण्यापर्यंत उल्लेखनीय कार्य
![]()
क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी वाटचाल; सुनील वाघ
खेळाडू घडविण्यापासून विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत पोहोचविण्यापर्यंत उल्लेखनीय कार्य
अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, शेकडो खेळाडूंना घडविणारे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा, स्पर्धा परीक्षा, पोलीस व सैन्य भरतीसाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे श्री. सुनील प्रभाकर वाघ यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या आनंददायी दिनानिमित्त त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
श्री. सुनील वाघ यांनी सन २००९ मध्ये जी. एस. हायस्कूल, अमळनेर येथे क्रीडा शिक्षक म्हणून रुजू होऊन आपल्या कार्याची सुरुवात केली. क्रीडा शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना खेळ शिकविले नाही, तर त्यांच्या अंगी असलेली गुणवत्ता ओळखून त्यांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. १ सप्टेंबर २०२५ रोजी डी. आर. कन्या शाळेत पर्यवेक्षक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.
क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या
श्री. वाघ हे अमळनेर तालुका क्रीडा स्पर्धांचे संयोजक, अमळनेर क्रीडा समितीचे सचिव, क्रीडा शिक्षक, डी. आर. कन्या शाळेचे पर्यवेक्षक, जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष तसेच अमळनेर तालुका शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष म्हणून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आहेत.
या माध्यमातून तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला चालना देणे, विद्यार्थ्यांना स्पर्धेची संधी उपलब्ध करून देणे आणि गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
जी. एस. हायस्कूलमध्ये उल्लेखनीय क्रीडा कार्य
जी. एस. हायस्कूलमध्ये कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली २२ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर सहभाग व प्राविण्य मिळविले, तर तब्बल ४०० खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या मार्गदर्शनातून एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावरही सहभाग नोंदविला.
डी. आर. कन्या शाळेतही त्यांच्या मार्गदर्शनाची फलश्रुती दिसून येत असून २ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग व प्राविण्य, ३ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर सहभाग आणि ६ खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
धुळे व शिरपूर येथेही क्रीडा क्षेत्रात ठसा
धुळे येथे कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी राष्ट्रीय खो-खो स्तरावर पदके प्राप्त केली. शिरपूर येथेही त्यांच्या मार्गदर्शनातून ५ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पदके, तर २५ खेळाडूंनी राज्यस्तरीय स्तरावर सहभाग नोंदविला.


त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू नेहमीच ‘खेळाडू घडविणे’ हा राहिला आहे.
शासकीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरव
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री. सुनील वाघ यांना विविध मान-सन्मान प्राप्त झाले आहेत. सन २००५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा मानाचा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर सन २००९-१० मध्ये महाराष्ट्र शासनाचा अतिशय मानाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला.
सन २०१० मध्ये जळगाव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार बोदवड येथे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे सन २०१० मध्ये तत्कालीन क्रीडा मंत्री अॅड. पद्माकर वळवी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पुणे येथे सन २०२३ मध्ये राष्ट्रीय स्वामी दयानंद सरस्वती पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. सन २०१० पासून त्यांच्या कार्याची दखल घेत १२ जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच २२ राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे त्यांच्या कार्याची व्यापकता अधोरेखित करते. १५ मे २०२६ रोजी अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
स्वतःही उत्कृष्ट खेळाडू म्हणून कामगिरी
श्री. सुनील वाघ यांनी स्वतःही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर सहभागी होत एकूण ३२ पदके मिळविली असून ४०० राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे.
अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत कर्णधार म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पहिले पदक मिळवून देण्याचा मान त्यांनी मिळविला. त्यांनी एकूण १० विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. खो-खो, फुटबॉल, मैदानी स्पर्धा, हँडबॉल, क्रॉस-कंट्री, कबड्डी, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, रनिंग, हॉकी आदी विविध खेळांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सदैव धडपड
श्री. वाघ यांच्या कार्याची खरी ओळख त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशातून दिसून येते. विद्यार्थ्यांना दररोज संध्याकाळी सराव करून घेणे, त्यांच्या शारीरिक क्षमतेचा विकास करणे, स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे आणि योग्य मार्गदर्शन करणे हा त्यांच्या कार्याचा अविभाज्य भाग आहे.
पोलीस व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ते सातत्याने मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू झाले, तर अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पदापर्यंत मजल मारली. आज २०० पेक्षा अधिक विद्यार्थी विविध शासकीय पदांवर विराजमान असल्याचे त्यांच्या मार्गदर्शनाचे मोठे यश मानले जाते.
अमळनेर तालुका क्रीडा चळवळीला नवी दिशा
अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष म्हणून श्री. वाघ दरवर्षी तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. विजयी आणि गुणवंत खेळाडूंना बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढविणे, विविध क्रीडा कार्यक्रम आयोजित करणे आणि क्रीडा समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविणे, यामुळे अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे.
क्रीडा, संस्कार आणि करिअरचा त्रिवेणी संगम
खेळातून शिस्त, शिस्तीतून आत्मविश्वास आणि आत्मविश्वासातून यश हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे श्री. सुनील प्रभाकर वाघ हे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले खेळाडू विविध स्तरांवर अमळनेरचे नाव उज्ज्वल करत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
वाढदिवसाच्या या विशेष दिनी श्री. सुनील प्रभाकर वाघ यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद आणि क्रीडा क्षेत्रात आणखी मोठे यश लाभो, तसेच त्यांच्या हातून भविष्यातही असंख्य गुणवंत खेळाडू घडोत, ही मनःपूर्वक शुभेच्छा!
शब्दशः नव्हे, तर कर्तृत्वाने घडविले शेकडो खेळाडू — श्री. सुनील वाघ यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम!
शब्दाकंन
ईश्वर आर महाजन पत्रकार
अमळनेर
9860352960


