वैद्यकीय सेवेसोबत साहित्य-संस्कृतीचेही दीपस्तंभ , डॉ. अविनाश रघुराज जोशी यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
1 min read

वैद्यकीय सेवेसोबत साहित्य-संस्कृतीचेही दीपस्तंभ , डॉ. अविनाश रघुराज जोशी यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

Loading

वैद्यकीय सेवेसोबत साहित्य-संस्कृतीचेही दीपस्तंभ

डॉ. अविनाश रघुराज जोशी यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

अमळनेरच्या वैद्यकीय, साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे डॉ. अविनाश रघुराज जोशी (एम.डी.). आपल्या ज्ञान, सेवाभाव, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे त्यांनी गेल्या अनेक दशकांत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही संपूर्ण अमळनेरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

पुण्यातील एस.पी. कॉलेज येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कार्डिओ-डायबिटीस तज्ञ म्हणून गेल्या ३२ वर्षांपासून ते रुग्णसेवेत कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अनुभवसंपन्न सेवेमुळे हजारो रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.

अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय वैद्यकीय संघटनांशी त्यांचा सक्रिय संबंध असून विविध संघटनांचे ते कायमस्वरूपी सदस्य आहेत. वैद्यकीय शिबिरे, जनजागृती अभियान, व्याख्याने, ऑनलाईन वेबिनार आणि परिषदांमधून त्यांनी आरोग्यविषयक ज्ञान समाजापर्यंत पोहोचविले आहे. अमळनेर आय.एम.ए.चे सलग १५ वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले, तर २५ वर्षांहून अधिक काळ सेंट्रल कौन्सिल मेंबर, दिल्ली म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

वैद्यकीय क्षेत्रापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित नाही. सामाजिक उपक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम आणि विविध जनकल्याणकारी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विशेषतः तरुण पिढीला व्यवसाय, करिअर आणि जीवनातील संधींबाबत मार्गदर्शन करून त्यांनी अनेक युवकांना प्रेरणा दिली आहे.

साहित्य, संस्कृती आणि भाषेप्रती असलेल्या प्रेमामुळे त्यांनी मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर या महाराष्ट्रभर नावाजलेल्या संस्थेचे गेली ११ वर्षे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक साहित्यिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले आहेत.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यामागे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान. या भव्य संमेलनाच्या आयोजन, नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी कार्याध्यक्ष म्हणून समर्थपणे पार पाडली. या संमेलनातून खानदेशातील साहित्यिक, कवी, कलाकार आणि लोकसंगीत परंपरेला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

सौजन्य, विद्वत्ता, समाजाभिमुख दृष्टिकोन आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम असलेले डॉ. अविनाश जोशी हे अमळनेरच्या वैचारिक जीवनातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी, आनंदी, यशस्वी आणि दीर्घायुष्य लाभो, तसेच त्यांच्या हातून समाजसेवा, वैद्यकीय सेवा आणि साहित्य-संस्कृतीची अखंड सेवा अशीच घडत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

शब्दांकन :
ईश्वर आर महाजन
पत्रकार, अमळनेर.

9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *